অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झाइडर झी

झाइडर झी

झाइडर झी

( दक्षिणेकडील समुद्र). नेदर्लंड्‌सच्या उत्तर किनाऱ्यावरून आत दक्षिणेकडे शिरलेले उत्तर समुद्राचे एक आखात. क्षेत्रफळ सु. ३,७०४ चौ.किमी. याच्या शाखा फ्रीझ्‌लँड, ओव्हराइसल, गेल्डरलँड, उत्रेक्त व नूर्ड हॉलंड ह्या नेदर्लंड्‌सच्या जिल्ह्यांत खोलवर शिरल्या आहेत. रोमन काळात येथे उथळ सरोवर व दलदलीचा भाग होता.

प्लिनी, टॅसिटस आदी लेखकांनी याला फ्लीव्हो सरोवर म्हटले आहे. या सरोवरातून ऱ्हाईन नदीचा एक फाटा पुढे समुद्राला मिळत असे. तेराव्या शतकात समुद्राचे पाणी या सरोवरात शिरले. येथे समुद्राचा सपाट तळ जेमतेम ५ मी. खोल असे. वाढती लोकसंख्या व उपजीविकेची अपुरी साधने यांमुळे समुद्र मागे हटवून जमीन मानवोपयोगी करण्याचे प्रयोग नेदर्लंड्‌समध्ये कित्येक शतकांपासून झालेले आहेत. झाइडर झी प्रकल्प यांपैकी महत्त्वाचा प्रयोग आहे. झाइडर झी पैकी आयसल्‌मेर सरोवर हा सु. ४०% भाग ठेवून बाकीचा भाग मानवोपयोगी केला जावा असे झाइडर झी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

१९१८  मध्ये नेदर्लंड्‌सच्या विधिमंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिली व तदनुसार १९२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या योजनेनुसार नेदर्लंड्‌सच्या नॉर्थ हॉलंड व फ्रीझ्‌लँड यांना जोडणारा सु. तीस किमी. लांबीचा बांध घालून आयसल्‌मेर हे गोड्या पाण्याचे सरोवर निर्माण करण्यात आले. यालाच आता पुष्कळदा झाइडर झी म्हणतात. बांधाबाहेरचा झाइडर झीचा भाग व्हाडं झी हा असून त्याच्या उत्तरेकडील फ्रिझियन बेटांपलीकडे खुला उत्तर समुद्र आहे.

बांधाची उंची सु. ८ मी. म्हणजे सर्वांत उंच वादळी लाटांपेक्षा सु. ३ मी. जास्त आहे. त्याच्या माथ्याची रुंदी सु. १३३ मी. असून त्यावरून मोटारींसाठी ३४ मी. रुंद रस्ता व पुढे होणाऱ्या दुहेरी लोहमार्गासाठी जागा ठेवलेली आहे. बांधाच्या दोन्ही टोकांस जादा पाणी सोडण्यासाठी दारे व नौवहनासाठी पाणशिडीमार्ग ठेवले आहेत. बांधाच्या आतील पाणी हटवून जमिनीतील क्षार काढून टाकून मानवोपयोगी जमिनीचे चार विस्तृत पट्टे (यांना पोल्डर म्हणतात ) निर्माण करावयाचे, तसेच मुख्य बंधाऱ्याशिवाय अनेक लहान बंधारे व पोल्डरवर कालवे बांधावयाचे अशी ही योजना आहे.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा १९३२ मध्ये पूर्ण झाला. यात वर उल्लेखिलेला बांध व सु. २०,००० हेक्टरचे व्हीरिंगन सरोवराचे पोल्डर पूर्ण करण्यात आले. त्याचे सु. २० हेक्टरचा एक असे भाग पाडून ते कुशल शेतकऱ्यांस देण्यात आले. तेथे प्रथम राय आणि नंतर गहू, बटाटे इ. पिके काढण्यात आली. तसेच चराऊ रान ठेवून दूधदुभत्याचा किफायतशीर धंदा सुरू करण्यात आला. वीज, पाणी, शाळा, चर्च इ. सर्व सोयींनी युक्त अशी टुमदार गावे वसविण्यात आली. १९४२ मध्ये सु. ४७,६०० हेक्टरचे ईशान्य पोल्डर व १९५७ मध्ये सु. ५३,२०० हेक्टरचे पूर्व फ्लीव्होलँड पोल्डर पूर्ण झाले. सु. ५९,२०० हेक्टरचे मार्करवॉर्ड पोल्डर व सु. ३९,६०० हेक्टरचे दक्षिण फ्लीव्होलँड पोल्डर १९८० पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्त सैन्यांची आगेकूच थोपविण्यासाठी ह्या बांधाचा बराच भाग जर्मनांनी फोडल्यामुळे खूपच नुकसान झाले; परंतु वर्षाच्या आताच सर्व पडझड बुजवून आत शिरलेले पाणी काढून टाकण्यात येऊन हा प्रदेश लागवडीयोग्य करण्यात आला. पुनर्वसन होण्यास १९५३ साल उजाडले. पोल्डरची जमीन आता उद्योगधंद्यांसाठी, राहण्यासाठी व मनोरंजनस्थानांसाठीही उपलब्ध होऊ लागली आहे.

निसर्ग व मानव यांमधील पुरातन संघर्षाच्या इतिहासात समुद्राला बांध घालून आतील भूमी मानववस्तीस योग्य करण्याचे जे अनेक प्रयोग नेदर्लंड्‌समध्ये झाले, त्यांना फारच महत्त्व आहे. त्यात झाइडर झी प्रकल्पाला अग्रस्थान दिले जाते, ते त्यासाठी झालेल्या दीर्घ प्रयत्नांवरून सर्वथैव योग्य वाटते.

 

ओक, द. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate