अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील डेड परगण्याचे मुख्य ठिकाण, बंदर आणि जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ. लोकसंख्या ३,८२,७२६ (१९८२ अंदाज), महानगर १६,२५,७८१ (१९८०). अटलांटिक महासागरापासून ५·६ किमी. वर बिस्केन उपसागराला मिळणाऱ्या मिआमी नदीच्या मुखाशी हे वसलेले आहे.
पर्यटन या मुख्य व्यवसायाला पूरक अशी हॉटेले आणि क्रीडा व खेळ यांच्या-उदा., जलतरण, गोल्फ, शीडजहाज नौका, घोड्यांच्या व कुत्र्यांच्या शर्यती इ. सुविधा येथे आहेत.‘विश्वसुंदरी’ या पदासाठी जागतिक सौंदर्यस्पर्धा येथे भरविण्यात येतात. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून उत्तर दक्षिण अमेरिकेच्या हवाई मार्गावरील हे प्रवेशद्वार ठरते. जगप्रसिद्ध मिआमी पुळण या शहरापासून ४ किमी. अंतरावरील एका बेटावर आहे. डिस्नेलँडच्या धर्तीवर उभारलेले डिस्नेवर्ल्ड मिआमीजवळ आहे.
येथील फोर्ट डॅलासजवळ १८७० च्या सुमारास पहिली वसाहत झाली. १८९६ मध्ये येथे रेल्वे आली व बंदर सुविधाही वाढल्या. याच वर्षी त्यास शहराची सनद मिळाली. पर्यटनकेंद्र म्हणून १९२०–३० च्या दरम्यान शहराचा वेगाने विकास झाला. बृहन्मिआमी किंवा मिआमी महानगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय विभागात डेड परगण्याचा बराचसा भाग अंतर्भूत होतो.
शहरातील बिस्केन बूलेव्हार व त्याच्या परिसरातील उद्याने-बगीचे, जलविहार व जलक्रीडा यांसाठी प्रसिद्ध असलेले मरीन स्टेडियम, अनेक कलावीथी आणि रंगमंदिरे ही आकर्षक पर्यटनस्थळे होत. नववर्षदिनाचे ‘ऑरेंज बोल’ नावाने ओळखले जाणारे वार्षिक फुटबॉलचे सामने प्रसिद्ध असून ते पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतात.
क्रँडन पार्क प्राणी संग्रहालय, फेअर चाइल्ड ट्रॉपिकल गार्डन, मत्स्यालय, तसेच इतर संग्रहालयेही उल्लेखनीय आहेत. मिआमी महानगराच्या हद्दीतच मिआमी विद्यापीठ (स्था. १९२५) असून, तेथील महासागर विज्ञानाची संख्या-रोझेन्स्टिअल-ही प्रसिद्ध आहे.
अन्नधान्य प्रक्रिया, जहाज बांधणी, विमान बांधणी व दुरुस्ती, ॲल्युमिनियम उत्पादने, काचेच्या व लाकडी वस्तू इ. उद्योगधंदे विकसित झालेले आहेत. तथापि कापड, धातूच्या वस्तू, फर्निचर, वाहतूक साधने आणि छपाई हे येथील विशेष महत्त्वाचे उद्योग होत. कापडवस्त्रनिर्मितिउद्योगाच्या बाबतीत न्यूयॉर्क शहराखालोखाल मिआमीचा दुसरा क्रम लागतो.
शहरात ३३% क्यूबन विशेषतः कुशल कामगार आणि व्यापारी आहेत. १९७० च्या दशकात बेकारी आणि घरांची चणचण या समस्यांना शहराला तोंड द्यावे लागले. ‘मेट्रो’ (१९५७) नावाने ओळखले जाणारे नऊ लोकप्रतिनिधींचे मंडळ महानगरीय प्रशासन पाहते.
जाधव, रा. ग.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/27/2020