অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मॅनहाइम

मॅनहाइम

मॅनहाइम

प. जर्मनीच्या बाडेन-व्ह्यूर्टंबेर्क राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र व नदीबंदर, लोकसंख्या ३,०४,१०० (१९८१). हे फ्रँकफुर्टच्या नैर्ऋत्येस सु. ७१ किमी. ऱ्हाईन-नेकार नदीसंगमाजवळ ऱ्हाईन नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. प्रमुख अंतर्देशीय नदीबंदर म्हणून यास विशेष महत्त्व आहे.

इ. स. ७६४ मध्ये अस्तित्वात आलेले मच्छिमारांचे हे छोटे खेडेगाव; परंतु जलवाहतुकीच्या सोयीमुळे त्याची वेगाने भरभराट झाली. इलेक्टर चौथा फ्रीड्रिख याने यास १६०६ मध्ये तटबंदी केली; पुढच्याच वर्षी त्यास शहराची सनद मिळाली. तीस वर्षाच्या युद्धकाळात (१६१८–४८) शहराचे अतोनात नुकसान झाले (१६२२); पुढे १६८९ मध्ये फ्रेंचांनीही शहराची पुन्हा हानी केली.

१७२० मध्ये पलॅटिनेटचा इलेक्टर चार्ल्‌स फिलिप याने आपले मुख्यालय हायडल्‌बर्गहून या शहरी हलविले व शहराची पुनर्रचना केली. १७९५ च्या फ्रेंच युद्धात व पुढे दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणावरील बाँबहल्ल्यांमुळे शहराची प्रचंड हानी झाली. महायुद्धोत्तर काळात शहराची पुनर्रचना करण्यात आली; येथील व्यापार व उद्योग वाढले आणि शहराचा विकास घडून आला.

. स. १८३४ पासून यूरोपमधील एक प्रमुख नदीबंदर म्हणून यास महत्त्व असून त्यामधून होणारा कोळसा व लोखंड यांचा व्यापार विशेष महत्त्वाचा ठरतो. हे प्रमुख औद्योगिक केंद्र असून कार्ल बेंट्स (१८४४–१९२९) याने आपले पहिले मोटारीचे एंजिन येथेच बनविले (१८७९); शहरात बेंट्स याचे स्मारक उभारण्यात आले आहे. येथे रसायने, खते, कापड, मोटारी, विद्युत् व लोहमार्ग साहित्य, पोलाद, साबण, कृषियंत्रे, कागद, सेल्यूलोज इ. उद्योगधंदे विकास पावले आहेत.

हे एक सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असून जर्मनीतील पहिले नॅशनल थिएटर १७७८ मध्ये येथे बांधण्यात आले; सुविख्यात जर्मन कवी व नाटककार फ्रीड्रिख शिलर (१७५९–१८०५) याच्या सुप्रसिद्ध ‘द रॉबर्स’ या नाटकाचा पहिला प्रयोग येथेच झाला (१७८२).

अठराव्या शतकात युरोपमधील सुविख्यात वाद्यवृंदांमध्ये मॅमहाइम वाद्यवृंदाचा प्रथम क्रमांक होता. सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन संगीतकार मोट्सार्ट (१७५६–९१) याचे येथे अल्पकाल वास्तव्य होते (१७७७–७८). संगीत, नाट्य, अभियांत्रिकी, उद्योग यांची येथे महाविद्यालये असून एक विद्यापीठही आहे. येथील बरोक शैलीतील राजवाडा, जेझुइट पंथाचे चर्च, नगरभवन तसेच राइस म्यूझीयम, पाण्याचे उंच कारंजे (वॉटर टॉवर), कलावीथी इ. प्रवाशांची प्रमुख आकर्षणे आहेत.

 

गाडे, ना. स.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate