অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हलेट्टा

व्हलेट्टा

ग्रँड हार्बर, व्हनलेट्टा.

व्हलेट्टा

 

 

 

भूमध्य समुद्रातील मॉल्ट प्रजासत्ताकाची राजधानी व प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या ७,०४८ (२०००). हे मॉल्ट बेटाच्या ईशान्य किनाऱ्यावर खडकाळ अशी मौंट सेबेरास भूशिरावर वसले आहे. पूर्वेस ग्रँड हार्बर व पश्चिमेस मार्सामूशेट्टो हार्बर अशी दोन मोठी नैसर्गिक बंदरे शहराच्या दोन्ही बाजूंस आहेत.

तुर्की सुलतान सुलेमानच्या प्रचंड सैन्याचे इ. स. १५६५ मध्ये या बेटाला वेढा घातला होता. तो येथील जेरूसलेमच्या सेंट जॉनच्या धर्मप्रसारक सरदारांनी परतवून लावला. १५३० पासूनच या धर्मप्रसारक सरदारांच्या ताब्यात हे बेट होते. पुन्हा वेढा पडण्याच्या शक्यतेमुळे व्हलेट्टा शहरासाठी तेथील भूशिराचा खडकाळ भाग निवडण्यात आला व १५६६ मध्ये व्हलेट्टा शहराच्या उभारणीस सुरुवात झाली.

सुलेमानचा हल्ला परतवून लावण्याच्या कामी मोठी कामगिरी बजावणारा सरदारांचा प्रमुख ग्रँड मास्टर व्हलेट्टा याचे नाव शहराला देण्यात आले. १५७० मध्ये ही मॉल्टाची राजधानी बनली. सरदारांच्या सु. दोन शतकांच्या कारकिर्दीत अनेक भव्य व सुंदर इमारती येथे उभारण्यात आल्या. त्यांपैकी १५७३-७८ या काळात बांधलेले सेंट जॉनचे को-कॅथीड्रल व ग्रँड मास्टरचा राजवाडा (१५७४) उल्लेखनीय आहेत. त्यांशिवाय ऍरगॉन ओबेर्झ, प्रॉव्हिन्स ओबेर्झ, कॅस्टील व लीआँ ओबेर्झ या येथील महत्त्वाच्या वास्तू आहेत.

१७९८ मध्ये फ्रेंचांनी ताबा घेऊन येथील धर्मप्रसारक सरदारांना बेटाबाहेर घालवून दिले. मॉल्टामधील लोकांनी येथील फ्रेंच सत्तेविरुद्ध उठाव केला. त्याला ब्रिटिशांनीही पाठिंबा दिला; परंतु १८०० मध्ये ब्रिटिशांनीच याचा ताबा घेतला. १८१४ पासून १९७९ पर्यंत व्हलेट्टा येथे ब्रिटिशांचा भूमध्य सागरी नौसेना व लष्करी तळ होता. दुसऱ्या महायुद्धकाळात मोठ्या प्रमाणात झालेल्या बॉंबहल्ल्यामुळे शहरातील इमारतींचे खूप नुकसान झाले. येथील आरमारी गोदीचे रूपांतर व्यापारी गोदीमध्ये करण्यात आले.

व्हलेट्टामध्ये उद्योगधंदे कमीच आहेत. परंतु मॉल्टामधील हे एक प्रशासकीय, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र आहे. मॉल्टा विद्यापीठ (१५९२), मॅन्वेल थिएटर (१७३१-३२), अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील मॉल्टा ग्रंथालय, ललित कलाविषयक राष्ट्रीय संग्रहालय (१९७४) इ. संस्था शहरात आहेत. येथील चुनखडीमध्ये बांधलेल्या व वृत्तजाळीप्रमाणे दिसणाऱ्या इमारती, भूशिराची चढण चढणारे तीव्र उताराचे अरुंद रस्ते, कलाकुसरीच्या वस्तूंचा संग्रह, सौम्य व आल्हाददायक हवामान, ऐतिहासिक वास्तू व स्मारके इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate