অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हेराक्रूझ

व्हेराक्रूझ

व्हेराक्रूझ

व्हेराक्रूझ याव्हे. मेक्सिकोमधील व्हेराक्रूझ राज्यातील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या ३,२८,६०७ (१९९०). मेक्सिकोच्या आखातावरील एका सखल, वालुकामय पुळणीवर वसलेले हे शहर मेक्सिको सिटीपासून पूर्वेस ३०० किमी. हवाई अंतरावर आहे. याचा परिसर वाळूच्या टेकड्या व दलदलीचा असून काही भागात समुद्र हटवून जमीन तयार केली आहे. येथील बंदर एका लहानशा बेटावर आहे.

व्हेराक्रूझ हे मेक्सिकोमधील स्पॅनिश वसाहतीचे पहिले ठाणे. एर्नांदो कोर्तेझ (१४८५ १५४०) या स्पॅनिश समन्वेषकाने हे वसविले (१५१९). तो त्याचा उल्लेख ‘ला व्हीया रीका द व्हराक्रूझ’ (सत्याचे शुभचिन्ह असलेले श्रीमंत शहर) असा करीत असे. १५९९ मध्ये शहराची पुनःस्थापना झाली.

स्पॅनिशांनी लढाऊ जहाजांचा ताफा ठेवण्यासाठी या बंदराचा उपयोग केला. सतराव्या व आठराव्या शतकांत चाचांनी शहराची लूट केली. १८२१ मधील स्वातंत्र्यानंतर अनेक क्रांतिकारी शासनांचा त्यावर अंमल होता. १८३८ मध्ये फ्रेंचांनी या ठिकाणाला वेढा घातला.

मेक्सिकन युद्धाच्या वेळी संयुक्त संस्थानांनी या शहरावर कब्जा मिळविला (१८४७). ते फ्रेंचांनी पुन्हा १८३१मध्ये जिंकले. १९१४ मध्ये पुन्हा ते अमेरिकेच्या ताब्यात आले. व्हेराक्रूझ राज्याचा गव्हर्नर (१८५७ – ६०) जनरल ईग्नास्यो दे ला याव्हे याच्या सन्मानार्थ शहरास व्हेराक्रूझ याव्हे असे नाव देण्यात आले. मेक्सिकोची दोन्ही संविधाने (१८५७ व १९१७) येथेच जाहीर करण्यात आली.

व्हेराक्रूझ हे मेक्सिकोमधील प्रमुख सागरी बंदर, तसेच प्रमुख दळणवळण केंद्र आहे. इतर शहरांशी महामार्ग, लोहमार्ग व हवाई मार्गांनी ते जोडलेले आहे. आधुनिक बंदरात उत्कृष्ट गोदीव्यवस्था, साठवणसुविधा व इतर अनेक प्रकारच्या सोयी आहेत. आयात-निर्यात व्यापाराचे हे केंद्र आहे.

लाटारोधक बांधकाम करून हे बंदर सुरक्षित केले आहे. येथून प्रामुख्याने कॉफी, चिकल व तंबाखू यांची निऱ्यात अधिक होते. रसायने, सिगारेट, चॉकोलेट, विविध प्रकारची मद्ये, फरशा, पादत्राणे, सिमेंट, कापड, तंबाखूचे प्रकार, पीठ, साबण, मेणबत्या इत्यादींच्या निर्मितीचे कारखाने येथे आहेत.

हरात जुन्या व नव्या वास्तूंचा सुरेख संगम साधला आहे. शहरात अनेक विस्तीर्ण प्लाझा (चौक) आहेत. त्यांपैकी प्लाझा कॉन्स्टिट्यूसिऑन येथे अठराव्या शतकातील चर्च आहे. सँटिआगो किल्ला, राष्ट्रीय सीमाशुल्क-गृह, नगरभवन ह्या इतर उल्लेखनीय वास्तू आहेत.

शहरालगतच्या गॅलेगा बेटावर स्पॅनिशांनी पंधराव्या शतकात बांधलेल्या किल्ल्याचा बंदराच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप उपयोग झाला. जवळच्या इझ्ला दे लॉस साक्रफिसीओस बेटावर पुरातत्त्वीय अवशेष आढळले आहेत. सुंदर व रम्य पुळणी, निवासाच्या उत्तम सुविधा यांमुळे हे शहर पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. सुधारणावादी विधिज्ञ व विचारवंत बेनितो हृरेस याचे स्मारक या शहरात आहे.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate