অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिमोनोसेकी

शिमोनोसेकी

शिमोनोसेकी

जपानच्या होन्शू बेटावरील यामागूची विभागातील एक शहर व सागरी बंदर. लोकसंख्या ,५२,००० (१९९७). होन्शू बेटाच्या नैर्ऋत्य टोकावर अगदी मोक्याच्या ठिकाणी हे वसले आहे. १९०२ पर्यंत हे शहर आकामागासेकी व बाकान या नावांनी ओळखले जाई. होन्शू व क्यूशू या बेटांच्या दरम्यान शिमोनोसेकी सामुद्रधुनी असून तिच्या उत्तर काठावर शिमोनोसेकी, तर दक्षिण काठावर किटा-क्यूशू ही शहरे आहेत.

१८६३ मध्ये या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या युरोपीय जहाजांवर बाँबहल्ला करण्यात आला. त्याचा बदला म्हणून अमेरिकन, ब्रिटिश, फ्रेंच व डच युद्धनौकांनी शिमोनोसेकी शहरावर बाँबहल्ला केला (५ ते ८ सप्टेंबर १८६४). पहिले चीनजपान युद्ध येथे झालेल्या ‘शिमोनोसेकी तहा’ने (१७ ऑगस्ट १८९५) संपुष्टात आले.

शिमोनोसेकी व कीटाक्यूशू या शहरांदरम्यान १९०५ मध्ये लोहमार्ग वाहतूकसेवा सुरू करण्यात आली. १९४० मध्ये शिमोनोसेकी, मोजी व कोकुरा बंदरांचे मिळून कामॉन या एकाच बंदरात रूपांतर करण्यात आले. १९४२ मध्ये शिमोनोसेकी व कीटाक्यूशू यांदरम्यान सामुद्रधुनीच्या खालून लोहमार्गाचा बोगदा, तर १९५८ मध्ये सडकेवरील वाहनांसाठी व पादचाऱ्यांसाठी बोगदा काढण्यात आला.

१९७० मध्ये शिमोनोसेकी व पुसान बंदर (दक्षिण कोरिया) यांदरम्यान आंतरराष्ट्रीय फेरी वाहतूकसेवा सुरू झाली. १९७० च्या दशकात शिंकानसेन (न्यू ट्रंक लाइन) हा टोकिओओसाका लोहमार्ग शिमोनोसेकीपर्यंत वाढविण्यात आला. हाच मार्ग शोमोनोसेकी सामुद्रधुनीच्या तळाखालून काढण्यात आलेल्या बोगद्यातून उत्तर क्यूशूपर्यंतही नेण्यात आला.

पूर्वीपासूनच हे एक मासेमारी बंदर म्हणून, तसेच ‘ग्लोबफिश’ माशांसाठी प्रसिद्ध आहे. १९४२ नंतर अवजड उद्योगधंद्यांचे हे केंद्र बनले. सागरीखाद्य प्रक्रिया, सिमेंट, खते, रसायने, धातुकाम, अभियांत्रिकी उद्योग, जहाजबांधणी इ. उद्योग या शहरात चालतात. व्यापारीकेंद्र व वाहतूककेंद्र म्हणूनही हे महत्त्वाचे आहे.

जपानमधील सर्वांत मोठे मत्स्यालय येथे असून ते पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथे सम्राट आंटोकू (११७८८५) याच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आकामागू हे प्रार्थनामंदिर असून दरवर्षी एप्रिलमध्ये एक मोठा महोत्सव तेथे साजरा करण्यात येतो.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate