অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्युनिशिया

ट्युनिशिया

(अरबी अल्-जम्हूरिया अत्-तूनिसिया). आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील छोटेसे अरब, मुस्लिम प्रजासत्ताक. क्षेत्रफळ १,६४,१५० चौ. किमी. लोकसंख्या ५५,०९,००० (१९७३). विस्तार २९° ५४' उ. ते ३७° २१' उ. व ७° ३३' पू. ते ११° ३८' पू. यांदरम्यान. दक्षिण–उत्तर जास्तीत जास्त अंतर ७२० किमी. पूर्व–पश्चिम ३२० किमी. किनारा १,२०० किमी. राजधानी ट्युनिस. अधिकृत धर्म इस्लाम, अधिकृत भाषा अरबी. याच्या उत्तरेस व पूर्वेस भूमध्य समुद्र, आग्नेयीस लिबिया, नैर्ऋत्येस व पश्चिमेस अल्जीरिया आहेत. उत्तर किनाऱ्यावर ट्युनिसचे आखात असून पूर्व किनाऱ्यावर हाम्मामेतचे आखात आणि गॅबेसचे आखात आहे. गॅबेसच्या आखातात जेर्बा, केर्केना व शेर्गुई ही बेटे आहेत. ट्युनिसच्या व हाम्मामेतच्या आखातांदरम्यानच्या केप बॉन द्वीपकल्पाजवळ झेंब्रा व उत्तर किनाऱ्यापासून काही अंतरावर ला गालीट ही छोटी बेटे आहेत. सुएझ कालवा व जिब्राल्टर यांदरम्यानचे ट्युनिशियाचे स्थान मोक्याचे समजले जाते.

भूवर्णन

ट्युनिशियातील प्रमुख पर्वतश्रेणी म्हणजे मोरोक्को-अल्जीरियाकडून आलेल्या अ‍ॅटलास पर्वताच्या टेल अ‍ॅटलास आणि सहारा अ‍ॅटलास या दोन शाखा. त्या नैर्ऋत्य ईशान्य दिशेने ट्युनिसच्या आखाताकडे जातात. अल्जीरियाच्या सरहद्दीजवळील तेबेसा श्रेणीतील काफ अश-शनाबी किंवा जेबेल चंबी (१,५४४ मी.) आणि ट्युनिसच्या नैर्ऋर्त्येस सु. ४८ किमी. वरील जेबेल झाग्‌वान (१,२९५ मी.) ही त्यांतील प्रमुख शिखरे होत. वायव्येकडे क्रूमीरी व उत्तर किनाऱ्याजवळ मोगोद पर्वत आहेत.

ॲटलासच्या दोन्ही शाखांच्या मधून ट्युनिशियाची प्रमुख नदी मेजेर्दा ईशान्येकडे वाहत जाऊन ट्युनिसच्या आखातात भूमध्य समुद्राला मिळते. तिच्याप्रमाणे तिची उपनदी मेलेग ही अल्जीरियातूनच येते. मेजर्दाचे खोरे प्राचीन सरोवरांच्या द्रोणीत गाळ साठून निर्माण झालेले असल्यामुळे रोमन काळापासून ते धान्याचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

या सर्व डोंगराळ प्रदेशाला डॉरसेल म्हणतात. त्याच्या दक्षिणेला २०० ते ५०० मी. उंचीचा पठारी स्टेप गवताळ प्रदेश असून त्याच्याही दक्षिणेस सखल गवताळ प्रदेश आहे. त्यानंतर दक्षिणेस शॉट या खाऱ्या सरोवरांचा अंतर्गत जलवाहनाचा प्रदेश आहे. त्यातील जेरीद सरोवर समुद्रसपाटीखाली १५ मी. आहे. यांच्या दक्षिणेस सहारा मरुप्रदेशाचा भाग असलेला देशाचा सु. दोन पंचमांश भाग व्यापणारा मरुप्रदेश आहे.

लिबियाच्या हद्दीकडे भूभाग पुन्हा सु. ७६० मी. पर्यंत उंचावत जातो. अगदी उत्तरेस किनारा तुटक असून काही ठिकाणी डोंगर समुद्रात घुसले आहेत. यामागे चिंचोळी किनारपट्टी आहे. पूर्वेकडील आखातांच्या मागे केप बॉनपासून दक्षिणेकडे साहेल नावाचा विस्तृत सपाट सखल भूप्रदेश आहे. अरबीत टेल म्हणजे डोंगर व साहेल म्हणजे मैदान असा अर्थ आहे.

निजे

ट्युनिशियाचे प्रमुख खनिज फॉस्फेट हे देशाच्या मध्यभागात सापडते. अल्जीरियाच्या सरहद्दीजवळ लोखंड आणि उत्तर भागात शिसे, पारा व जस्त मिळतात. दक्षिणेकडे अल बोर्मा येथे खनिज तेल सापडले असून ते महत्त्वाचे ठरत आहे. पूर्व किनाऱ्यावरील स्फाक्सजवळ व गॅबेसच्या आखातात तेल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वामान

ट्युनिशियाचे हवामान सामान्यतः भूमध्यसागरी म्हणजे सौम्य, आर्द्र हिवाळे व उष्ण, कोरडे उन्हाळे असे आहे. जवळजवळ वर्षभर अस्थिर पश्चिमी वारे वाहतात. मात्र कधी कधी दक्षिणेकडून सहारातून सिरोको हे अत्यंत उष्ण व कोरडे वारे येतात. यांना ट्युनिशियात ‘शेहेली ’ म्हणतात. त्यांनी वनस्पती अगदी वाळून जातात. समुद्रसान्निध्याचा परिणाम तपमानावर होतो.उदा., किनाऱ्यावरील सूस येथे जानेवारीचे किमान सरासरी तपमान ७° से. व ऑगस्टमधील कमाल सरासरी तपमान ३२° से. असते. अंतर्भागातील केरवाँ (अल् कायरवान) येथे ही तपमाने अनुक्रमे ४° से. व ३७° से. असतात.

ट्युनिस येथे हिवाळ्यात किमान ६·६° से., कमाल १८·३° से. व सरासरी ११·१° से. तपमान असते. उन्हाळ्यात ते किमान १८·३° से., कमाल ३३·९° से. व सरासरी २६·१° से. असते. अंतर्भागात आणि दक्षिणेकडे कमाल तपमान यापेक्षा जास्त व किमान तपमान यापेक्षा कमी असते. सिरोकोमुळे किनारी भागातही तपमान ५०° से.पर्यंत जाते. दक्षिणेकडे कमाल तपमान ६०° से. पर्यंत जाते. अशा वेळी वाळूचे तपमान ६४·४° से. असते.

सामान्यतः ऑक्टोबर ते मे पावसाचे महिने असले, तरी खरोखर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळातच बहुधा पाऊस येतो. तो अनिश्चित स्वरूपाचा असतो. उत्तर भागात सु. ४० सेंमी. तर गवताळ प्रदेशात १५ ते ४० सेंमी. पाऊस पडतो. दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण वेगाने कमी होत जाते. सरोवर प्रदेशात फार १२ सेंमी. पाऊस पडतो. मात्र तेथे मरूद्यानात भूमिगत पाणी मिळते. दक्षिण साहेलमध्ये फक्त २० ते २५ सेंमी. पाऊस पडतो. उत्तर साहेलमध्ये तो सु. ४० सेंमी. पडतो.

नस्पती

उत्तरेकडील डोंगराळ भागात आणि क्रूमीरी विभागात दाट अरण्ये आहेत. त्यात बुचाचा ओक, ओक, चीड, थूया, अलेप्पो, पाइन, जेतून व जुजुबे, गम इ. वृक्ष आहेत. त्यांखाली नेचे उगवलेले असतात. गवताळ प्रदेशात आल्फा व विशेषकरून एस्फार्टो गवत होते. ते कागदासाठी उपयोगी पडते. दक्षिण भागात मरुदेशीय वनस्पती होतात.मरूद्यानात व सरोवरांभोवतीच्या प्रदेशात खजूर, साहेलच्या दक्षिण भागात ऑलिव्ह व उत्तर भागात आणि देशाच्या ईशान्य भागात द्राक्षे, लिंबू जातीची फळे यांस अनुकूल परिस्थिती आहे.

प्राणी

अरण्यात रानडुकरे, गवताळ भागात छोटे प्राणी, अस्वले, प्लोव्हर, चित्ते, क्वचित तरस व कोल्हे तर दक्षिणेकडे कुरंग आढळतात. कुरंगाच्या शिकारीला बंदी करण्यात आली आहे. सर्वत्र विंचू पुष्कळच आहेत. सर्पांपैकी शिंगांचा व्हायपर व फड्या नाग आढळतात. रुक्ष प्रदेशातून कधी कधी टोळधाडी येतात. देशात विविध प्रकारचे पक्षीही भरपूर आहेत. समुद्रात सार्डीन, ट्यूना इ. मासे भरपूर मिळतात.

तिहास

ट्युनिशियातील मूळचे लोक बर्बर हे होत. इ.स. पू. बाराव्या शतकात फिनिशियनांनी हल्लीचे ट्युनिस व बीझर्ट यांदरम्यान उटिका वसविले. टायरच्या वसाहतकऱ्यांनी इ.स. पू. नवव्या शतकात सध्याच्या ट्युनिसजवळ कार्थेज वसविले. त्यानंतर बर्बर व फिनिशियन यांचा संकर झाला. रोमबरोबरच्या तिसऱ्या प्यूनिक युद्धात कार्थेज पडले व नंतर तेथे रोमन, व्हँडाल व बायझंटिन यांच्या सत्ता एकामागोमाग आल्या.

रोमन काळात शहरे वसली व शेतीचा विकास होऊन हा भूप्रदेश ‘रोमचे धान्याचे कोठार’ बनला. आजही एल् जेम (थायसद्रस) येथील रोमच्या कलॉसियमच्या खालोखाल मोठे असलेले कलॉसियम, दूग्गा येथील मंदीरे, ट्युनिसमधील बार्दो संग्रहालयातील मोझेइकांचा संग्रह इ. अवशेष रोमन वैभवाची साक्ष देतात. चौथ्या शतकात येथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला होता; परंतु सहाव्या व सातव्या शतकात बायझंटिनांच्या कारकीर्दीत आपसातील धार्मिक कलह व बेबंदशाही वाढली.

सातव्या शतकात अरबांचीस्वारी होऊन त्यांनी केरवाँ शहर स्थापिले. मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया आणि लिबिया या पश्चिम अरबी राष्ट्रांचे ऐक्य दर्शविणाऱ्या ‘मागरिब’ प्रदेशातील हे पहिले शहर होय. बर्बरांनी अरबांना कडवा प्रतिकार केला; परंतु अखेर अरबी सत्ता दृढमूल झाली आणि इस्लामचा यशस्वी प्रसार झाला.

. स. ८०० मध्ये इब्राहिम इब्न अल् अगलब याने आपले राज घराणे स्थापले व राज्य वाढविले. नंतर फातिमी या खिलाफतीची महदिया येथे राजधानी केली व नंतर ईजिप्त जिंकून कैरो राजधानी केली. अकराव्या शतकात महदिया येथील राज्यपालाचे पारिपत्य करण्यासाठी कैरोच्या खलिफाने सैन्य पाठविले.

ही मागरिबवरील दुसरी अरबस्वारी होय. ११३५ मध्ये सिसिली घेऊन नॉर्मनांनी किनाऱ्यावर सत्ता स्थापिली होती. परंतु मोरोक्कोच्या अल्मोहेदांनी ११५९ मध्ये ट्युनिशिया जिंकून संपूर्ण मागरिब प्रदेश मोरोक्कोच्या अंमलाखाली आणला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/30/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate