অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तैवान

तैवान

चीनच्या मुख्य भूमीपासून सु. १६० किमी. वरील बेट. याला पोर्तुगीज फॉर्मोसा (फर्मास = सुंदर) म्हणत. याच्या जवळची १३ लहान बेटे, तसेच पंगहू किंवा पेस्कदोरझमधील ६४ बेटे, किमॉय गटातील ४ बेटे आणि माद्‍झू बेटे तैवानमध्ये समाविष्ट होतात. पैकी एकट्या तैवान बेटाचे क्षेत्रफळ ३५,७६३ चौ. किमी., पेस्कदोरझ बेटांचे सु. १२७ चौ. किमी., सर्व बेटांसह तैवानचे क्षेत्रफळ ३५,९८१ चौ. किमी. आहे. लोकसंख्या १,५५,७०,००० (१९७३ अंदाज).

ही सर्व बेटे ११८° २३पूर्व ते १२२° ६ २५पूर्व व २१° ४५ २५ उत्तर ते २६° ९ उत्तर यांदरम्यान पसरली आहेत. फक्त तैवान बेट २१° ५४उ. ते २५° १८ उ. यांत असून त्याची दक्षिण–उत्तर लांबी सु. ३७६ किमी. व पूर्व–पश्चिम रूंदी सु. १४४ किमी. आहे. त्याच्या जवळजवळ मध्यातून  कर्कवृत्त जाते.

ध्या तैवान ‘राष्ट्रीय चीन’, ‘नॅशनॅलिस्ट चायना’ किंवा ‘रिपब्‍लिक ऑफ चायना’ म्हणून ओळखले जाते; परंतू हे शासन संपूर्ण चीनवरच हक्क सांगते. चीनच्या मुख्य भूमीवरील कम्युनिस्ट शासनही तैवानसह संपूर्ण चीनवरच हक्क सांगते.

 

भूवर्णन

 

 

 

 

टर्शरी कालखंडानंतरच्या वलीकरणाच्या काळात हो बेट पश्चिमेकडे तीव्रतेने कलले. यामुळे पूर्वेकडे तीव्र उतारांचे समुद्रकडे असून पूर्व किनाऱ्यावर सखल प्रदेश फारसा नाही; परंतु पूर्व किनाऱ्यावर काही नद्यांची मुखे आहेत.

प्रस्तरभंगामुळे आणि नंतर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे जुंग यांग शानमो पर्वताच्या रांगा तयार झालेल्या आहेत. त्यांची जास्तीत जास्त उंची ‘मौंट मॉरिसन’ किंवा ‘यू शान’ येथे ३९९७ मी. आहे. ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीची पुष्कळ शिखरे आहेत. पर्वत स्लेट व शिस्टयुक्त आहेत. एकुण क्षेत्रफळापैकी ३८% भूमी संपूर्णपणे डोंगराळ म्हणूनच ओळखली जाते. २५% जमीन ही डोंगरउतरणीची आहे. डोंगराळ प्रदेशाभोवती सु. १,५०० मी. उंचीच्या कित्येक अलग टेकड्या आहेत.

पश्चिमेकडील प्रदेश सौम्य उताराचा असून पश्चिम किनारी प्रदेश जलोढ मैदानी आहे. डोंगराळ भागात नद्यांचे प्रवाह वेगवान असून सखल प्रदेशात त्यांचा वेग बराच कमी झालेला आढळतो. त्यामुळे सुपीक खोरी बरीच आढळतात.

टर्शरी कालखंडात तयार झालेले खडक तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात असून जांभा (लॅटेराइट)आणि लाव्हांचे खडकही डोंगराळ भागात आढळून येतात. या प्रदेशात वारंवार भूकंपाचे लहान धक्के बसतात.

जॉश्‍वे नदी १८२ किमी. लांब असून सर्वांत मोठी हीच आहे. बहुतेक नद्या लहान व उथळ असून त्यांस पावसाळ्यात पूर येतात; एरवी त्या कोरड्याही पडतात. त्या नौसुलभ नाहीत. उत्तरेकडील दानश्‍वे मात्र तैपे राजधानीपर्यंत नौसुलभ आहे.

मृदा

बेटाच्या २५% भूप्रदेशावर म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर व नद्यांच्या खोऱ्यांत सुपीक जलोढ मृदा आहेत. बाकीच्या उंच प्रदेशात अती क्षरणामुळे मृदा अपक्षालित, आम्‍ल व नापीक आहेत.

खजिन संपत्ती

अलोहित धातूंपैकी तांबे, सोने व चांदी तैवानमध्ये थोडी आढळतात. बॉक्साइट, गंधक व मीठ यांचेही साठे येथे असून वायव्य तैवानमध्ये थोडे खजिन तेल व नैसर्गिक वायू सापडते. तेल व नैसर्गिक वायू नळांच्या साहाय्याने औधोगिक केंद्रांना पुरवला जातो. कीलुंग व तैपे येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

संगमरवर, चुनखडक, डोलोमाइट पूर्व किनाऱ्यावर मिळतात. फॉस्फरस, लोहधातुक, मँगॅनीज, अ‍ॅसबेस्टॉस, संगजिरे, काच–वाळू व इतर काही खनिजे अल्प प्रमाणात आहेत. समुद्रातून मीठ मिळते. बरेच खनिज पदार्थ जपानला निर्यात केले जातात.

हवामान

हे बेट मोसमी हवामानाच्या प्रदेशात मोडते. कर्कवृत्तावर हे बेट असल्याने उन्हाळे बेताचे उष्ण आहेत. जून व सप्टेंबर उन्हाळी तपमान किनाऱ्यावर सुमारे ३०° से. असून अंतर्गत भागात उंचीनुसार ते कमी होत जाते. जानेवारीत तपमान १५° से. च्या आसपास असते.

प्रदेश समुद्रवलयांकित असल्याने व जवळून कुरोसिवो हा उबदार प्रवाह वाहत असल्याने एकूण हवामान सौम्य आणि हिवाळे उबदार आढळतात.

तथापि हिवाळ्यात मध्यवर्ती पर्वतांच्या माथ्यावर हिम असते. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मे ते सप्टेंबर महिन्यांत किनाऱ्यावर १५० सेंमी. पासून अंतर्गत भागांत ३०० सेंमी पर्यंत पाऊस पडतो. पर्वतीय भागात ७२२·५ सेंमी. पर्यंत पाऊस पडल्याची नोंद आहे.

ईशान्य तैवानमध्ये पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हिवाळ्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होते. हंगामकाल वर्षभर असून मे व नोव्हेंबरनंतर विशेषतः जुलै ते सप्टेबरपर्यंत तुफानांचा त्रास होतो. दोन्ही मोसमी वारे जोरदार असतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate