অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यू गिनी

न्यू गिनी

न्यू गिनी

जगातील ग्रीनलंडनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट. क्षेत्रफळ ८,१०,००० चौ. किमी; लोकसंख्या ३४,०६,००० (१९७१ अंदाज). हे नैर्ऋत्य पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीपासून उत्तरेस सु. १६० किमी. वर वायव्यआग्नेय पसरले आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ०° २०द. ते १०° ४५ द. व १३१° पू. ते १५१° पू. यांदरम्यान. वायव्यआग्नेय कमाल लांबी २,४०० किमी. व उत्तरदक्षिण कमाल रुंदी ८०० किमी. आराफूरा समुद्र, टॉरस सामुद्रधुनी व कोरल समुद्राने हे बेट ऑस्ट्रेलियापासून अलग झाले असून याच्या पश्चिमेस सेराम समुद्र, वायव्येस खेल्व्हिंग्क उपसागर, ईशान्येस बिस्मार्क समुद्र, पूर्वेस सॉलोमन समुद्र आणि आग्नेयीस पापुआचे आखात आहे.

स्ट्रेलियाच्या यॉर्क भूशिरावर पश्चिमेकडे तोंड करून बसलेल्या पक्ष्याप्रमाणे या बेटाचा आकार दिसतो. बेटाच्या मध्यातून वायव्य–आग्नेय पसरलेल्या ८०–२४० किमी. रुंदीच्या पर्वतात नॅसॉ, ऑरेंज, स्टार, दिगुल, हायडनबर्ग, व्हिक्टर ईमॅन्यूअल, मलर, बिस्मार्क, ओवेन स्टॅन्ली या प्रमुख पर्वतरांगांचा समावेश होतो. पश्चिम न्यू गिनीतील जाय (पूर्वीचे कार्स्टेन्झ; ५,०३० मी.) या बेटावरील अत्युच्च शिखराच्या खालोखाल ट्रकोर (पूर्वीचे व्हिल्हेल्म; ४,७३० मी.) व आयडनबर्ग, यूलीआना, अ‍ॅल्बर्ट एडवर्ड यांसारखी ३,९६२ मी. उंचीवरील इतर शिखरे आहेत.

पूर्व भागात काही जागृत ज्वालामुखी असून १९५१ मध्ये लॅमिंग्टन (१,७८३ मी.) शिखरावरील ज्वालामुखीच्या उद्रेकाने बरीच प्राणहानी झाली. पुराजीव, मध्यजीव व तृतीयक या तिन्ही कालखंडांतील खडक या बेटावर आढळतात. मध्यवर्ती पवर्तरांगांमुळे निर्माण झालेल्या उत्तर व दक्षिणवाहिनी नद्यांनी पर्वतभागांतून अनेक निदऱ्या निर्माण केल्या आहेत. फ्लाय, दिगुल, मांबेरामो, सेपिक, पूरारी, कीकॉरी, मार्कम, रामू या प्रमुख नद्यांपैकी फ्लाय ८०० किमी., सेपिक ४८३ किमी. तर इतर काही नद्या १६० किमी. पर्यंत नौकागमनयोग्य आहेत.

र्वतीय भाग वगळता बेटावरील हवामान प्रामुख्याने उष्ण आणि दमट असून सरासरी तपमान २७° से. असते. पर्वतरांगांच्या दिशा व ऋतू यांनुसार स्थलपरत्वे पर्जन्यमान १५० ते ५०० सेंमी. आढळते. वायव्य मोसमी (नोव्हेंबर–एप्रिल) व आग्नेय मोसमी (मे–ऑक्टोबर) वाऱ्यांच्या वाहण्याच्या कालानुसार येथे ऋतू मानले जातात. अतिपर्जन्यवृष्टीमुळे जमिनीची धूप होऊन ती नापीक बनते. विषुववृत्तानजीक असूनही बेटावरील उंच पर्वतशिखरे बर्फाच्छादित असतात. अतिपर्जन्य, घनदाट अरण्ये, उष्ण आणि दमट हवामान, दलदलयुक्त प्रदेशांचे आधिक्य यांमुळे काही ठिकाणी हिवताप, टायफस ज्वर, महारोग, आमांश इ. रोग फैलावतात.

बेटाचा सु. दोन-तृतीयांश भाग जंगलवेष्टित असून १,८३० मी. पेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात विषुववृत्तीय वर्षारण्ये, मध्यम व जास्त उंचीच्या प्रदेशांत आल्पीय व सूचिपर्णी अरण्ये, नदीखोऱ्यांत विस्तीर्ण कुरणे व दलदली, तर समुद्रकिनाऱ्यांवर कच्छ वनश्री व नारळाची झाडे आढळतात. साबूदाणा, ताड, चंदन, एबनी, कॅझुरिना, सीडार, ब्रेडफ्रूट इ. वृक्षप्रकार येथे आहेत. फिरत्या शेतीपद्धतीमुळे जंगलाखालील क्षेत्र कमीकमी होत आहे. येथील प्राणी व पक्षिजीवन मुख्यतः ऑस्ट्रेलिया आणि मलेशियातील प्राणी व पक्ष्यांच्या कुलांशी मिळतेजुळते आहे. वृक्ष-कांगारू, ऑस्ट्रेलियन आपॉसम, एकिड्ना, सुसरी, मगरी, साप, रानडुकरे व कुत्रे, सरडे, वटवाघूळ, उंदीर व घुशी इ. प्राणी आणि शहामृग, पॅरडाइस, पोपट व काकाकुवा यांसारखे सु. ६५० पेक्षा जास्त प्रकारांचे पक्षी येथे आढळतात.

आंतोन्यो दे अ‍ॅब्रिया या पोर्तुगीज मार्गदर्शकाने १५११ मध्ये सर्वांत प्रथम न्यू गिनीच्या किनाऱ्याची पाहणी केली असली, तरी बेटाच्या शोधाचे श्रेय १५२६ मध्ये बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर उतरणाऱ्या हॉर्हे दे मेनेसेस या स्पॅनिशाकडे जाते. मेनेसेसने याचा ‘इस्लास दोस पापुआज’ (पापुआ लोकांचे बेट) असा, तर येथील सोन्याच्या संभाव्य साठ्यामुळे आल्व्हारो दे साआव्हेद्राने (१५२८) ‘इस्ला देल ओरो’ (सोन्याचे बेट) असा या बेटाचा उल्लेख केला. आफ्रिकेतील गिनीचा किनारा आणि या बेटाचा किनारा यांच्यातील साम्यामुळे स्पॅनिशांनी याला दिलेल्या न्यू गिनी नावानेच डच लोकही ओळखू लागले; तर पोर्तुगीजांनी याला पापुआ हे नाव दिले.

अनेक डच, पोर्तुगीज, स्पॅनिश, जर्मन, ब्रिटिश खलाशांनी या बेटाच्या समन्वेषणाचा प्रयत्‍न केला. स्पेन, डच ईस्ट इंडिया कंपनी, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी, नेदर्लंड्स, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया यांनी हे बेट आपापल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचे आटोकाट प्रयत्‍न केले. बेटाचा ईशान्य भाग पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियन सैन्याने, तर दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने काबीज केला.

बेटाच्या तीन राजकीय विभागांपैकी पश्चिम न्यू गिनी अथवा ईरीआन बारत किंवा पश्चिम ईरीआन या नावाने ओळखला जाणारा बेटाचा पश्चिमेकडील अर्धा भाग डचांच्या वर्चस्वाखाली होता व इंडोनेशिया स्वतंत्र झाल्यावर इंडिनेशियाने त्या भागावर दावा केला आणि हा भाग १ मे १९६३ पासून इंडोनेशियामध्ये विलीन झाला; तर पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ताब्यात असणारा पूर्वेकडील ट्रस्ट टेरिटरी ऑफ न्यू गिनी (ईशान्य न्यू गिनी) व पापुआ हे दोन विभाग मिळून १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनी या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली.

प्रतिकूल प्राकृतिक भूरचना व कार्यक्षम मजुरांच्या अभावामुळे न्यू गिनी बराच काळ अविकसितच राहिले. निर्वाह व भटकी शेती या पद्धतींद्वारे रताळी, आर्वी, सुरण, केळी इ. खाद्यपिकांचे उत्पादन घेतले जाते. यांशिवाय नारळ, कोको, जायफळ, रबर, ऊस, तंबाखू, चहा, कॉफी ही नगदी पिकेही घेतली जातात. प्रामुख्याने नदीखोऱ्यांत व्यापारी शेतीपद्धती प्रचलित आहे. डुकरे, मेंढ्या, कोंबड्या व गुरे पाळण्याचा व्यवसाय स्वतंत्र रीत्या करतात. किनाऱ्यावर मासेमारी केली जाते. बेटावर तांबे, ऑस्मिरिडियम, प्लॅटिनम, जस्त, दगडी कोळसा, सोने, चांदी, निकेल, कोबाल्ट, खनिज तेल इत्यादींचे साठे असले, तरी सोने व खनिज तेलाचे उत्पादन अधिकांशाने करण्यात येते.

हान प्रमाणावरील बाजारपेठ, शक्तिसाधनांच्या व वाहतुकीच्या सोयींच्या अभाव, कुशल मजुरांचा तुटवडा यांमुळे बेटावरील औद्योगिक प्रगती उल्लेखनीय नाही. खोबरे व कोको यांवरील प्रक्रिया, लाकूड कापणे, प्लायवुड उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण, तागापासून दोर तयार करणे इ. स्थानिक कच्च्या मालावर आधारित उद्योगांशिवाय खाद्यपेये व पदार्थनिर्मिती, ऑक्सिजन-वायुनिर्मिती, जहाजबांधणी इ. इतरही उद्योगधंदे चालतात.

निर्यातीत प्रामुख्याने खोबरे, खोबरेल, कोकोच्या बिया, सोने, प्लायवुड, खनिज तेल, जायफळ इत्यादींचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर रस्त्यांची अधिकाधिक उपलब्धता होत असली, तरी परदेशी व्यापार, वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने जलवाहतूकच महत्त्वाची आहे.

बेटावर मेलानीशियन, पिग्मी लोकांशी साम्य असणारे नेग्रिटो व आफ्रिकेतील निग्रोंसारखे दिसणारे पापुअन इ. वंशांचे लोक अधिकांशाने असून मेलानीशियन व पापुअन या दोन भाषा प्रचलित आहेत. येथे जरी सांस्कृतिक भिन्नता असली, तरी आर्थिक, सामाजिक व राजकीय समानता आढळते. अलीकडे रेडिओ व दूरध्वनी, बँका व शैक्षणिक सोयींची अधिकाधिक उपलब्धता होत आहे. बहुतेक गावे लहानलहान असून लाए, राबाउल, पोर्ट मोर्झ्‌बी, मानक्‌वारी, सॉराँग, सुकार्नापुरा, सालामाउआ, सामाराई, कोटाबारू, माराउका, मादांग ही शहरे उद्योगधंदे, वाहतूक व दळणवळण यांच्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत.

 

पहा : ऑस्ट्रेलिया; इंडोनेशिया; पापुआ न्यू गिनी.

संदर्भ : Gardner, Robert; Heider, K. G. Gardens of War, New York, 1968.

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate