অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्वेर्त रीको

प्वेर्त रीको

(कॉमनवेल्थ ऑफ प्वेर्त रीको). कॅरिबियन समुद्रातील अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा एक स्वतंत्र सहयोगी प्रदेश (फ्री ॲसोशिएटेड स्टेट). वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील या प्रदेशात प्वेर्त रीको हे प्रमुख बेट व इतर तीन लहान बेटे असून याच्या उत्तरेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस कॅरिबियन समुद्र, पश्चिमेस मोना पॅसेजच्या पुढे डोमिनिकन प्रजासत्ताक व हैती (हिस्पॅनिओला) आणि पूर्वेस ६४ किमी.वर व्हर्जिन बेटे आहेत.

जवळजवळ आयताकृती असलेल्या प्वेर्त रीकोची पूर्व-पश्चिम लांबी (प्वेर्का भूशिरापासून हीग्वेरो भूशिरापर्यंत) १७८ किमी., तर उत्तर-दक्षिण रुंदी (इझाबेलापासून कोलोन भूशिरापर्यंत) ६२ किमी. असून ब्येकेस (क्रॅब आयलंड), कूलेब्रा व मोना पॅसेजमधील मोना ही तीन बेटे मिळून प्वेर्त रीकोचे एकूण क्षेत्रफळ ८,८९७ चौ.किमी. व लोकसंख्या ३३·१९ लक्ष आहे (१९७७ अंदाज). राजधानी सॅन वॉन असून लोकसंख्या ५,१८,७०० (१९७७ अंदाज) आहे.

भूवर्णन

प्वेर्त रीकोचा तीन-चतुर्थांश भाग उत्तुंग पर्वत व डोंगर यांनी व्यापला असून किनारी प्रदेश व डोंगरखोऱ्यांचा काही भाग हाच काय तो थोडा सपाट आढळतो. प्वेर्त रीकोमधून पूर्व-पश्चिम गेलेली पर्वतरांग प्वेर्त रीकोचे उत्तर व दक्षिण असे दोन ठळक भाग करते. प्वेर्त रीकोच्या पूर्व भागातील एल् यूंग्के हा पर्वत प्रसिद्ध असून मौंट पूंता हे सर्वांत उंच शिखर (१,३३८ मी.) पश्चिमेकडील पर्वतराजीमध्ये आहे.

प्वेर्त रीकोच्या उत्तर भागातून दक्षिण भागापेक्षा अधिक वेगवान नद्या वाहतात. त्यांपैकी लॉईसा, बायामोन, आरेसीबा व ला प्लाता या प्रमुख नद्या अटलांटिक महासागराला मिळतात. यांपैकी एकही नदी नौवहनयोग्य नाही, तथापि जलसिंचन व वीज उत्पादन यांच्या दृष्टीने त्या उपयोगी आहेत. दक्षिण प्वेर्त रीकोमध्ये अतिशय लहान नद्या असून त्या वर्षातील बराचसा काळ कोरड्याच असतात, तथापि त्या या भागातील लोकांना व शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करतात; कारण दक्षिण भागातच अधिककरून सिंचनयोग्य जमीन उपलब्ध आहे.

वामान

आल्हाददायक हवामान हे प्वेर्त रीकोचे ठळक वैशिष्ट्य आहे. कमी उंचीच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय, तर उंचावरील प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय असे हवामान असून सबंध बेटाला ईशान्येकडून येणाऱ्या व्यापारी वाऱ्यांमुळे थंडावा मिळतो. साधारणतः जुलैमध्ये किमान तापमान २७° से., तर जानेवारीमध्ये किमान तापमान २४° से. असते. येथील तापमान १६° से.च्या खाली कधीही जात नाही. वर्षातील पाच-सहा दिवसच सूर्यप्रकाशरहित असून पर्जन्यप्रमाणही अल्पच आहे. वार्षिक सरासरी पर्जन्य उत्तरेकडे १५५ सेंमी व दक्षिणेकडे ९१ सेंमी. आहे. फेब्रुवारी-एप्रिल यांदरम्यान पर्जन्यप्रमाण अल्प असते.

प्वेर्त रीको हा हरिकेन वादळांच्या कक्षेत मोडतो. साधारणतः या वादळाचा कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर यांदरम्यान असतो. प्वेर्त रीकोच्या इतिहासात आतापर्यंत ७० हून अधिक हरिकेन वादळे उद्‌भवली, तथापि सर्वात विनाशकारी  वादळ ' सॅन सिरिअॅको ' हे असून ते प्वेर्त रीकोवर ८ ऑगस्ट १८९९ रोजी येऊन आदळले.

भीषण हरिकेन वादळे १९२८, १९३२ व १९५६ मध्ये उद्‌भवली. तथापि १९६० साली उद्‌भवलेल्या ‘सॅन लोर्रेसो’ ह्या हरिकेनमुळे मात्र मुसळधार पाऊस व पूर आले, त्यांयोगे १०० वर माणसे मरण पावली आणि ७५ लक्ष डॉ. किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या बेटावर भूकंपही झाले. १९१८ च्या भूकंपामुळे पश्चिम प्वेर्त रीकोमधील काही शहरांचे नुकसान झाले.

वनस्पती  व प्राणी

प्वेर्त रीकोमधील मृदांचे धूपक्रियेमुळे फार नुकसान झाले असून त्या कृषियोग्य होण्यासाठी खतांची व उर्वरकांची अतिशय आवश्यकता आहे. बेटांवरील मूळची अरण्ये नष्ट होत गेल्याने आता ३०,४०० हे. क्षेत्रातच शासकीय आरक्षित अरण्ये उरलेली आहेत. उष्ण कटिबंधीय वृक्षांचे (मॅहॉगनी, एवनी, लॉरेल, सॅटिनवुड) त्यांतून उत्पादन होते. नारळ व ताडवृक्षांच्या बागांचे किनारी प्रदेशात वैपुल्य असून बांबूही मोठ्या प्रमाणावर आढळतात.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/28/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate