অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मरूद्यान

मरूद्यान

( ओअँसिस ). वाळवंटातील हिरवळीचा सुपीक प्रदेश. सामान्यपणे याचा विस्तार मऱ्यादित असतो, आर्टेशियन विहिरी किंवा साध्या विहिरी यांच्याद्वारे येथे वर्षभर गोडे पाणी मिळू शकते त्यामुळे येथे वनस्पती वाढू शकतात व पिके घेता येतात. म्हणून येथे शेती करून वसाहत करणे शक्य होते. परिणामी इतर वाळवंटी भागांच्या मानाने या प्रदेशात वस्ती अधिक असते. ( उदा., सहारा वाळवंटातील ६६ % वस्ती मरूद्यानांभोवती आहे. )

पाणवठ्याएवढ्या छोट्या प्रदेशापासून ( थोडी झाडी वस्ती ) ते मोठ्या वसाहतीपर्यत ( सु. ९ लाख वस्ती ) विस्तार असलेली मरूद्याने आहेत. मध्यपूर्व भागातील दूरदूरची पुष्कळ गावे व शहरे मरूद्यानांभोवती वसलेली आहेत ( उदा., समरकंद, कँश्गार, बूखारा, तामान्‍रासेट, दमास्कस इ. ) काही छोटी मरूद्याने ही भटक्या व व्यापारी लोकांच्या तांड्यांची विश्रांतिस्थाने असून त्यांपैकी काही व्यापार केंद्रेही बनली आहेत ( उदा., लिबियातील मूर्झूक, सौदी अरेबियातील बुरैद इ. ).

इंका संस्कृतीच्या काळात पेरूमधील मरूद्यानांमध्ये मका, गहू, ऊस इ. पिके घेत असत तर सोनोरन वाळवंटात ( उ. मध्य अमेरिका ) इंडियन लोक शेती करीत असत. नष्ट वा बेपत्ता झालेल्या प्राचीन मरूद्यानांभोवती एक प्रकारचे गूढतेचे वलय असल्याने साहसी संशोधकांची त्यांचा शोध घेण्यास प्रयत्‍न केले. तेव्हा त्यांना लिबियन वाळवंटात आदिमानवांनी गुहांमध्ये काढलेल्या चित्रांसारखे प्राचीन संसकृतीचे अवशेष आढळले. यांतून नव्या क्षेत्रांचे सर्वेक्षणही झाले उदा., झरझुग मरूद्यानाचा शोध घेताना नाईलच्या पश्चिमेकडील वाळवंटाचे सर्वेक्षण करण्यात आले.

कोलंबिया या अवकाश विमानाच्या १९८१ साली झालेल्या उड्डाणाच्या वेळी त्यावरील ग्‍डारच्या साहाय्याने भूपृष्ठांची चित्रे मिळविण्यात आली. त्यांवरून पूर्व सहारातील जमिनीखालील जलप्रवाहांचे स्वरूप व वैशिष्ट्ये यांची माहिती मिळाली. १९८२ साली ईजिप्तमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रात अभ्यास करून ही माहिती ताडून पाहण्यात आली. हल्लीची मरूद्याने कशी बनली हे तिच्यावरून कळू शकेल ; तसेच त्या भागातील खनिज संपत्तीच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही ही माहिती उपयुक्त आहे.

हवामान व शेतजमीन

या प्रदेशात पाऊस कमी पडतो; तो पिकांना पुरेसा नसतो. आफ्रिका व आशिया खंडांतील पुष्कळ मरूद्याने अतिशुष्क प्रदेशात येतात. म्हणजे तेथे वार्षिक पर्जन्यमान ५ सेंमी. पेक्षा कमी असते. तथापि बहुतेक मरूद्यानांचे हवामान उबदार असते. वाळवंटातील जमिनींचा विशेष विकास झालेला नसतो. सर्वसाधारणपणे त्या सुपीक असतात व मरूद्यानाच्या प्रदेशात पाणी असल्याने तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकते व पिकेही घेता येतात.

पाणीपुरवठा येथील बहुतेक पाणी जमिनीखालून वर आलेले वा आणलेले असते झरे नैसर्गिक वा खोदलेल्या आर्टेशियन विहिरी साध्या वा फोगारा विहिरी यांच्याद्वारे या भागात पाणीपुरवठा होतो. या पाण्याचे उगमस्थान किंवा पाणलोट क्षेत्र मरूद्यानापासून दूर ( १, ५०० किमी. पर्यत ) असू शकते. उदा., ईजिप्तमधील एल्‍खारिजा ( एल्‍खार्ग वा ग्रेट ओअँसिस ) व दाखला ही मरूद्याने पाणलोट क्षेत्रापासून ८०० किमी. अंतरावर आहेत.

उंच डोंगराळ भागात मुख्यत्वे हे पाणलोट क्षेत्र असते. तिबेस्ती ते दार्फूर हा डोंगराळ भाग सहारातील महत्त्वाचे पाणलोट क्षेत्र आहे. पावसाचे पाणी झिरपून डोंगरातील भेगा, पोकळ्या वगैरेंत साचते, तसेच तेथील वालुकाश्मांत ( कधीकधी चुनखडकांत ) मुरते. नंतर सावकाशपणे झिरपत ते सखल भागाकडे जाते. पाणी साठवून ठेवणाऱ्या वा वाहून नेणाऱ्या खडकाच्या थराला जलमृत स्तर म्हणतात. वरील डोंगरांवर पडलेले पाणी अशा स्तरांतून सावकाशपणे लिबिया – ईजिप्तपर्यत वाहत वा झिरपत जाते.

जलभृत स्तर उघडा पडला की, पाणी मिळते. भेगांतून ( उदा., विभंग-तडा ), आर्टेशियन परिस्थितीमुळे ( झरा किंवा विहीर ),विमुखनतीमुळे ( कमानीसारख्या घडीमुळे ) हा थर उचलला जाऊन अथवा वाऱ्यामुळे त्याच्यापर्यत झीज होऊन त्यातील पाणी भृपृष्ठावर येते व मरूद्यान बनते ( आकृती पहा ).

काही ठिकाणी पाणीपुरवठा बोगद्याने जोडलेल्या विहिरींच्या मालिकेद्वारे होतो. अशा विहिरींना निरनिराळ्या भागांत ‘फोगारा’, ‘कनात’, ‘गनात’ वा ‘करिझ’ अशी नावे आहेत. पर्सेपलिस शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेला बोगदा हा अशा प्रकारचा पहिला बोगदा असावा. इ. स. ७०० पासून यांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला व अजूनही ते वापरात आहेत. उदा., तिंबक्तू ( माली ) येथे असे नमुनेदार बोगदे आहेत.

मरूद्यान बनविण्यास अनुकूल परिस्थिती : ( १ )मरूद्यान,( २ )जलभूत स्तर,(३) विभंग.मरूद्यान बनविण्यास अनुकूल परिस्थिती :

( १ )मरूद्यान,

( २ )जलभूत स्तर,

(३) विभंग.

काही वेळा डोंगरावर पडलेले पावसाचे पाणी झिरपून खोऱ्याच्या तळापर्यत जाते व साचते. उत्तर अमेरिकेतील पुष्कळ मरूद्यानांना मिळणारे पाणी अशा प्रकारे साचलेले आहे.

वनश्री, शेती व अर्थव्यवस्था : मरूद्यानांतील मूळच्या वनस्पती पुढील तीन प्रकारच्या असतात. जलभृत स्तरातून पाणी मिळवून जगणाऱ्या भूमिजल- वनस्पती : कमी पाण्यात जगणाऱ्या मरूवनस्पती आणि लवणे जास्त असणाऱ्या जमिनीत येणाऱ्या लवणवनस्पती. खजूर, झाऊ, काटैल, सेज, विलो, रश, डुम पाम, बाभूळ, बोर, कॅक्टस व खुरट्या वनस्पती ह्या येथील स्थानिक वनस्पती आहेत.

मरूद्यानालगतच्या भागात शेकडो हेक्टर जमिनीत सघन शेती केली जाते. त्याकरिता अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. विशेषत: मोठ्या मरूद्यानालगत शेतीची खूप विकास झाला असून तेथील उत्पादनक्षमता कमाल पातळीपर्यत पोहोचली आहे.

⇨ खजूर हा सहारा व अरबस्तानातील मरूद्यानांमधील कल्पवृक्ष म्हणता येईल. हा तेथील सर्वात महत्त्वाचा वृक्ष होय. याची झाडे सामान्यपणे ५ मी. अंतरावर लावतात व त्यांच्यामधील भागात छोटे – छोटे वाफे करून त्यांत विविध प्रकारची पिके घेण्यात येतात.

गहू, सातू, राय, मका, ज्वारी, भात इ. तृणधान्यांची ; जरदाळू, अंजीर, तुती, सप्ताळू, नासपती, डाळिंब, द्राक्षे, संत्री, टरबूज, शेंदाड इ. फळझाडांची आणि आर्टिचोक, घेवडे, वाटाणा, गाजर, कांदे बटाटे, मुळे, टोमॅटो, भोपळे, कारली इ. भाजीपाल्यांची लागवड येथे केली जाते. शिवाय कोठेकोठे कापूस, तंबाखू, बडीशेप, पुदिना, ऑलिव्ह, वेखंड, मेंदी, क्लोव्हर, अल्फाल्फा गवत, लाजाळू, डेझी इत्यादींचीही लागवड करतात.

मरूद्यानांतील जीवनपद्धती शेकडो वर्षापासून पुष्कळ प्रमाणात आहे तशीच टिकून राहिली आहे. अर्थात पूर्वी मरूद्यानांकडे जाण्यासाठी केवळ उंटाचाच उपयोग होत असे. आता मरूद्यानांपर्यंत जाणाऱ्या पक्क्या सडका व लोहमार्गही झाले आहेत, तर काही ठिकाणी विमानसेवाही उपलब्ध झाली आहे.

मात्र पुष्कळ छोट्या मरूद्यानांचा व्यापार अजूनही फिरस्त्या व्यापाऱ्यामार्फत चालतो. तेथे आठवड्यातून एकदा बाजार भरतो. वाळवंटी प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत मरूद्यानांतील शेती अजूनही महत्त्वाची आहे. तथापि अलीकडील

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate