অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मार्शल बेटे

मार्शल बेटे

मार्शल बेटे

पश्चिम पॅसिफिकमधील मायक्रोनीशियाच्या चार प्रमुख द्वीपसमूहांपैकी अगदी पूर्वेचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या आधिपत्याखालील द्वीपसमूह. विस्तार ४° ३० उ. ते १४° ४५ उ. व १६०° ५० पू. ते १७२° पू. यांदरम्यान. लोकसंख्या ३३,६८५ (१९८० अंदाज). आग्येय-वायव्य दिशेने पसरलेल्या या १,१३६ प्रवाळी बेटांमध्ये ३४ कंकणद्वीपे आहेत.

एकूण सु. १८१ चौ. किमी. क्षेत्राच्या या बेटांवर, कुजलेल्या वनस्पतींनी बनलेली थोडीशी माती आहे. ही बेटे म्हणजे, समुद्रतळावरील ५,५०० मी. उंचीच्या घुमटी ज्वालामुखींच्या माथ्यावर साचलेली सु. १·६ किमी. खोलीची प्रवाळी आच्छादने आहेत. या बेटांच्या प्रत्येकी सु. १,३०० किमी. लांबीच्या दोन समांतर रांगा असून त्या एकमेकींपासून २४० किमी. वर आहेत.

पूर्वेची राटाक (सूर्योदय) आणि पश्चिमेची रालिक (सूर्यास्त) अशी त्यांची नावे आहेत. यांतील क्वाजालेन समूह २८३ किमी. लांब व ३२ किमी. रूंद असून क्वाजालेन हे जगातील सर्वात मोठे कंकणद्वीप आहे. त्याच्या १८ द्वीपिका आहेत. इतर काही समूह असे

(१) जालूइट – ६१ X ३४ किमी. (५० द्वीपिका),

(२) एनिवेटॉक -३७ कि.मी. लांब व ४० द्वीपिकांचे वर्तुळाकार बेट,

(३) बिकीनी – २२ X ११ किमी. (३६ द्वीपिका).

कंकणद्वीपाच्या मध्यातील खारच्छांचे तळ ११० मी. ते ७५ मी. खोल आढळतात. काही बेटे भरती-लाटेपेक्षा जेमतेम ६ मी. उंच आहेत. काही बेटे खचत असून काहींचे उत्थान होऊन त्यांची खारकच्छे उथळ वा कोरडी होत आहेत.

या बेटांवर पहिली वस्ती केव्हा झाली, ते ज्ञात नाही. यूरोपीयांपैकी व्हान दे सालाथार व आल्व्हारो दे साआव्हेद्रा या स्पॅनिश दर्यावर्दींनी १५२९ मध्ये यांतील काही बेटे प्रथम शोधिली. १७८८ मध्ये गिल्बर्ट व मार्शल या ब्रिटिश नाविकांनी समन्वेषण करून काही बेटांना नावे दिली. मात्र क्रूझेन्श्टेर्न (१७७०–१८४६) व ऑटो फोन कोट्‌सेबू या रशियनांनी १८०३, १८१५ व १८२३ मध्ये ही बेटे नकाशांवर आणली होती.

१८८६ मध्ये स्पेनने या बेटांवर हक्क सांगितला व तो मान्यही झाला. परंतु १८९८ च्या स्पॅनिश–अमेरिकन युद्धानंतर स्पेनने ती जर्मनीस विकली. त्याआधीच जर्मनांनी तेथे पाय रोवले होते.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी १९१४ मध्ये जपानने ही बेटे जिंकली आणि १९१९–२० मध्ये राष्ट्रसंघाच्या महादेशाने याला मान्यताही मिळाली. दुसऱ्या महायुद्धात क्वाजालेन व एनिवेटॉक बेटांवर घनघोर लढाई होऊन १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून ती अमेरिकेच्या अंमलाखाली आली.

मेरिकेने येथे शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला; परंतु मार्शली लोकांना अमेरिकन कारभार नापसंत होता. बिकीनी व एनिवेटॉक बेटांवर, तेथील लोकांचे स्थलांतर करून अमेरिकेने अणुबाँब व हायड्रोजन बाँबच्या (१९४६ नंतर) चाचण्या केल्या, तेव्हा तेथील लोक बिथरले. त्यांना अमेरिकेने पाच लक्ष डॉलर नुकसानभरपाई दिली. तथापि क्वाजालेन बेटावर क्षेपणास्त्रांच्या चाचण्या चालूच राहिल्या.

लोक अधिकच चिडले. त्यांनी अमेरिकेवर आर्थिक दुर्लक्षाचा आरोप केला. १९७८ मध्ये लोकांनी अमेरिकेशी मुक्त संबंध ठेवणाऱ्या मायक्रोनीशियन संघराज्याचा सदस्य होण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. १९८० मध्ये विदेशसंबंधाबाबत स्वायत्तता, परंतु सैनिकी हक्क, संरक्षण व सुरक्षा यांबाबत अमेरिकेचा हक्क मान्य या मुद्यांवर उभयपक्षी मान्यतेचा करार झाला. मेअरिॲना द्वीपसमूहातील सायपान येथील आयोगाच्या हाती सध्या येथील प्रशासन आहे. निर्वाचित सदस्यांचे विधिमंडळ स्थानिक कारभार पाहाते.

क्वाजालेन या रालिक रांगेतील प्रमुख बेटावर सैनिकी संशोधन केंद्र आहे. माजूरो हे राटाक रांगेतील प्रमुख बेट राजधानी असून तेथे व्यापारी विमाने नेहमी थांबतात; तेथे शासकीय नियंत्रण कक्ष आहे. जालूइट हे उत्तम नैसर्गिक बंदर असून प्रमुख व्यापार केंद्र आहे.

येथील लोकांत प्राचीन काळी आग्येय आशियातून आलेल्या लोकांचे व पॉलिनीशियन लोकांचे मिश्रण आढळते. ते उत्तम नावाडी असून १८७१–८० या दशकात त्यांनी सागरी प्रवास करताना बेटे, वारे, प्रवाह इ. दाखविणाऱ्या लाकडी पट्‌ट्यांच्या नकाशांचा उपयोग केला होता.

हे लोक मलायो–पॉलिनीशियन भाषाकुलातील मार्शली भाषा बोलतात. येथील हवामान उष्ण व आर्द असून वार्षिक सरासरी पाऊस २०६ सेंमी., दक्षिणेकडे ४०६ सेंमी. व उत्तरेकडे २०३ सेंमी. पडतो. मूळचे प्राणी घुशी, वटवाघळे, पाली, सरडे असे थोडेच आहेत.

नारळ व त्यापासून अन्य उत्पन्ने घेणे हा प्रमुख व्यवसाय असून येथील येथील लोकांच्या रोजच्या आहारात नारळ, विलायती फणस (ब्रेडफ्रुट), केळी, पपया, सुरण, आर्वी, केवडा, आरारूट, कॉफी यांचा प्रामुख्याने समावेश असतो. यांशिवाय खारकच्छ व बाहेरील समुद्र यांतून मिळणारे मासे, मृदुकाय व कवचधारी प्राणी तसेच आयात केलेल्या कोंबड्या व डुकराचे मांस यांचाही वापर केला जातो. येथील निर्वाह शेतीमुळे फक्त थोडेसे खोबरे निर्यात केले जाते. काही हस्तकला वस्तूही होतात.

र्यादित उत्पन्न आणि अवजारे, बांधकाम, भांडी यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची कमतरता यांच्या जोडीला भरमसाट लोकसंख्यावाढ हा येथील भेडसावणारा प्रश्न आहे. सामुदायिक देशांतर करूनही हा प्रश्न सुटेना; म्हणून येथे बालहत्याही होऊ लागल्या होत्या. पॅसिफिकमधील मोक्याचे स्थान, एवढेच या बेटांचे सध्या महत्त्व आहे.

 

चौधरी, वसंत; कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate