অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अक्कलकोट संस्थान

अक्कलकोट संस्थान

अक्कलकोट संस्थान

ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम प्रतीचे असल्यामुळे त्यास तोफेच्या सलामीचा मान नव्हता.

सोळाव्या व सतराव्या शतकांत विजापूर व अहमदनगर येथील मुसलमान सत्ताधीशांत अक्कलकोट प्रदेशाबद्दल तंटे चालू असत. विजापूरच्या बादशहाने शहाजीस हा प्रदेश जहागीर म्हणून दिला होता. पुढे १६८७ च्या सुमारास औरंगजेबाने हा प्रदेश जिंकला. १६९९मध्ये त्याने शाहूच्या लग्नप्रसंगी त्यास जहागीर म्हणून अक्कलकोट परगणा दिला होता. दौलताबादच्या पारद गावचा पाटील शहाजी लोखंडे हा मोगलांतर्फे लढत असता शाहूकडून एका चकमकीत मारला गेला. तेव्हा त्याच्या विधवेने आपला मुलगा राणोजी यास शाहूच्या पायावर घातले. शाहूने या मुलाचा सांभाळ करण्याचे अभिवचन देऊन त्यास अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली व त्याचे नाव फत्तेसिंग ठेवले. हाच या संस्थानाचा संस्थापक होय. याने शाहूबरोबर अनेक लढायांत भाग घेतला. या घराण्यातील पाचवा राजा दुसरा शहाजी ( १८२८-१८५७) याचा काळ धामधुमीचा गेला. १८२८मध्ये हा लहान असल्यामुळे या संस्थानचा कारभार साताऱ्याचा प्रतापसिंह पहात असे. १८३० मध्ये बोरगावच्या शंकरराव सरदेशमुखाच्या नेतृत्वाखाली रयतेने बंड केले. रयतेच्या प्रतापसिंहाविरुद्धच्या तक्रारी रास्त असल्याचा निर्णय घेऊन इंग्रजांनी संस्थानचा कारभार प्रतापसिंहाकडून काढून इंग्रज रीजंटाकडे सोपविला. १८४८ साली साताऱ्याचे राज्य खालसा झाले आणि अक्कलकोटकर ब्रिटिशांचे मांडलिक बनले.

स्वातंत्र्योत्तर काळात अक्कलकोट संस्थानाने विलीनीकरणास नकार दिला होता. श्री. रत्नाप्पा कुंभार त्यांनी तेथे सत्याग्रह सुरू केला. परिणामी हे संस्थान १९४८ मध्ये त्या वेळच्या मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. या घराण्यातील श्रीमती निर्मलाराजे भोसले या १९५२ पासून मुंबई विधानसभेच्या सदस्य, १९५६ ते १९६० पर्यंत शिक्षण खात्याच्या उपमंत्री आणि १९६२ ते १९६५ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण खात्याच्या मंत्री होत्या.


संदर्भ: पटवर्धन, वि. अ. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांच्या विलीनीकरणाची कथा, पुणे, १९६६.

कुलकर्णी, अ. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate