परभणी जिल्ह्याच्या हिंगोली तालुक्यातील तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ४,२७६ (१९६१). हे बालाघाट पर्वतराजीच्या कुशीत हिंगोलीच्या नैर्ऋत्येस १९ किमी. आहे. हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून मंदिर शिल्पकौशल्याने नटलेले आहे. मंदिर द्वादशकोनी उतरत्या कंगोऱ्याच्या चौथऱ्यावर हेमाडपंती पद्धतीनुसार बंधलेले असून मंदिराची उंची १८ मी. आहे. सभोवताली ६ मी. उंचीचा तट असून त्याला चार प्रवेशद्वारे आहेत. देवळाच्या आतील व बाहेरील शिल्पपट्टीवर शिव, पार्वती, गणेश, बुद्ध, यती इत्यादींच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मधला वर्तुळाकार मंडप व त्यावरील घुमट आठ अष्टकोनी, कलाकुसरीच्या खांबांवर आधारलेला आहे. गावाच्या दक्षिणेकडील मंदिरातील कनकेश्वरी ही नागनाथपत्नी मानली जाते.पूर्वी औंढ्याला आमर्दकक्षेत्र म्हणत असल्याचा उल्लेख राष्ट्रकुटांच्या ताम्रपटात आढळतो. नागनाथाच्या मूर्तीची पाठ दरवाजाकडे आहे. संत नामदेवांना नागनाथाचे दर्शन घेण्याची मनाई केली.त्यांनी मग देवळामागे भजन सुरू केले, म्हणून नागनाथांनी पाठ फिरविली अशी दंतकथा आहे. येथे संत नामदेव व त्यांचे गुरू विसोबा खेचर यांच्या समाध्या आहेत.
लेखक : चंद्रहास जोशी
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/26/2020
औंढा नागनाथ : परभणी जिल्ह्याच्या हिंगोली तालुक्यात...
माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी त...