অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोकण

कोकण

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अरुंद किनारी प्रदेशाचा मुख्यतः महाराष्ट्रातील भाग. महाराष्ट्रातील याचे क्षेत्रफळ ३०,४०० चौ. किमी. व लोकसंख्या एकट्या बृहन्मुंबईची ५९,७०,५७५ धरून १,०४,९३,३२३ (१९७१) आहे.

पूर्वीच्या अनेक उल्लेखांप्रमाणे उत्तरेकडे दमणगंगा व दक्षिणेकडे काळी नदी असा याचा विस्तार मानला, तर दमणचे क्षेत्र ७० चौ. किमी. व लोकसंख्या ३८,७४१ गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०० चौ. किमी. व लोकसंख्या ७,९४,५७०; कारवारची लोकसंख्या २७,७७७ आणि गोवे व कारवार यांदरम्यानच्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या यांची त्यात भर घालावी लागेल.

याच्या पूर्वेस सह्याद्री आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. याची दक्षिणोत्तर लांबी सु. ५०० ते ६०० किमी. व रूंदी ५५ ते ६५, क्वचित ९६ किमी. पर्यंत आहे.

भूवर्णन

कोकणाचे ठाणे जिल्हा व बृहन्मुंबई मिळून झालेला उत्तर कोकण आणि कुलाबा व रत्नागिरी जिल्हे मिळून झालेला दक्षिण कोकण, असे दोन स्वाभाविक विभाग पडतात.

दक्षिण कोकणात सह्याद्रीचे फाटे जवळजवळ समुद्रापर्यंत आलेले आहेत. उत्तर कोकणात त्यामानाने वालुकामय किनाऱ्याला समांतर सलग गाळजमिनीचा पट्टा असून त्याच्या पूर्वेस डोगरांची रांग व तिच्या पलीकडे वैतरणा नदीचे खोरे आहे. महाडच्या दक्षिणेस रत्नागिरी जिल्ह्यात जांभा खडक आढळतो. बाकी सर्वत्र बेसाल्ट खडक आहे.

दक्षिण कोकणचा किनारा खडकाळ असून खाड्या व लहानलहान आखाते, उपसागर व काही ठिकाणी सुंदर पुलिने यांनी भरलेला आहे. किनाऱ्याजवळ मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, घारापुरी, अंजदीव ही बेटे आहेत. मुंबई व मार्मागोवा यांशिवाय मोठी नैसर्गिक बंदरे नाहीत. लहान लहान बंदरे पुष्कळ आहेत.

सह्याद्रीमुळे पठारी भागाशी आलेला तुटकपणा व मिळणारे संरक्षण आणि डोंगरांच्या आश्रयाने छोट्या बंदरांतून मिळणारा निर्वेध आसरा, यांमुळे किनाऱ्यावर चाचेगिरीला नेहमीच वाव मिळत आला आहे आणि आजही चोरट्या व्यापाराला अनुकूल जागा या किनाऱ्यावर पुष्कळ आहेत. मुंबईजवळच्या समुद्रात बुडालेल्या अरण्यांच्या अवशेषांवरून तेथील किनाऱ्याचे निमज्जन झाले असावे असे दिसते.

प्राचीन ज्वालामुखी क्रियेचे अवशेष कोकणात गरम झऱ्यांच्या रूपाने अनेक ठिकाणी दिसतात. त्यात वज्रेश्वरीजवळचे झरे विशेष प्रसिद्ध आहेत.

मणगंगेपासून दक्षिणेस वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, भोगावती, सावित्री, गायत्री, वाशिष्ठी, शास्त्री, मांडवी, जुआरी व कारवारजवळील काळी या कोकणातील लहान मोठ्या प्रमुख नद्या होत. त्या लांबीला कमी, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या, उन्हाळ्यात शुष्कप्राय होणाऱ्या आहेत. वैतरणा व तानसा यांचे पाणी अडवून मुंबईला पुरविले आहे.

काळी नदीवर कर्नाटकात मोठी योजना मूर्त स्वरूप घेत आहे. इतर नद्यांचा अधिक उपयोग करता येण्याजोगा आहे. ठाणे जिल्ह्यात पोखरण, विहार, तुळशी, रत्नागिरी जिल्ह्यात धामापूर, सावंतवाडीचा मोती हे तलाव आहेत. खोपोली, भिरा, भिवपुरी, पोफळी इ. वीजघरांतून सोडलेले पाणीही उपयोगी पडते.

कोकणाचे हवामान उष्ण व दमट आहे. ते डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सुखद-शीतल असते. एरवी तपमान सामान्यतः २१ - २२ से. असते. जोरदार नैर्ऋत्य मोसमी वारे हे येथील वैशिष्ट्य आहे. या वाऱ्यांमुळे समुद्र इतका खवळतो, की किनारी सागरी वाहतूक त्यावेळी बंद ठेवावी लागते. हे वारे कोकणाला भरपूर पाऊस देतात. तथापि त्याचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. गोव्यास ३०० सेंमी., रत्नागिरीला २५० सेंमी., तर मुंबईस १७५ सेंमी. पाऊस पडतो. डोंगरउतारावर अधिक पाऊस पडतो. महाबळेश्वर येथे ५०० ते ६२५ सेंमी. पाऊस पडतो.

कोकणातील सु. ४० टक्के भाग अरण्यमय आहे. त्यात सदाहरित व पानझडी अशी दोन्ही प्रकारची झाडे आढळतात. साग, ऐन, खैर, शिसवी, बांबू, धावडा, किंजळ, हिरडा, अष्टा, पिंपळ, उंबर, उंडिणी, आवळा, सागरगोटा इत्यादींबरोबर जांभूळ, आंबा, फणस, काजू, कोकम वगैरे अनेक प्रकारची फळझाडे व समुद्रकिनाऱ्याजवळ नारळ व सुपारीची झाडे येथे आहेत. उत्तर कोकणात ताडाची व खजुरीचीही बने आहेत.

सर्पगंधा, गुळवेल, बाहावा, अनंतमूळ, वावडिंग, बेहडा, बिब्बा, जितसाया, कुडा इ. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि काही विषारी वनस्पतीही येथे आढळतात. खाडीमुखांजवळील खारकच्छ वनस्पती जळण म्हणून उपयोगी येतात. लोणारी कोळसा, जळण, इमारती लाकूड, आपट्याची व टेंभुर्णीची पाने, मध, मेण, डिंक, इ. पदार्थ जंगलात मिळतात. गोवे निसर्गसौंदर्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. उत्तर कोकणचा उत्तरभाग गवताळ आहे.

या जंगलात वाघ, अस्वल, रानडुक्कर क्वचित गवा, कोल्हा, तरस, खोकड, वानरे, माकडे, मुंगूस, खार, साळिंदर, ससा, हरिण व सांबर वगैरे वन्यपशू; नाग, फुरसे, नन्नाटीसारखे विषारी सर्प; घार, गिधाड, चित्तर, मोर इ. पक्षी आणि विविध प्रकारचे कीटक, असे बहुविध प्राणी आढळतात.

रेडीजवळ आणि मालवण व रत्नागिरीजवळ लोहधातुक सापडते.

बांदा व फोंड्याजवळ मँगॅनीज व ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्यांत बॉक्साइट मिळते. कणकवलीजवळ क्रोमाइट, रत्नागिरीजवळ इल्मेनाइट व अनेक ठिकाणी काचेसाठी लागणारी वाळू ही इतर खनिजे आहेत. बेसाल्ट व जांभा दगड यांचा उपयोग रस्ते व घरे बांधण्यासाठी होतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate