অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-पाच)

महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

ठाणे

येऊर


मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. विविध प्रकारच्या वनस्पतींनी हे जंगल समृद्ध असून येथे बिबटे, हरीण, काळवी, मोर, ससे, कोल्हे, रानडुक्कर, सांबर, मगर आदी सर्व प्रकारचे प्राणी आढळून येतात. संजय गांधी उद्यानाच्या 110 कि.मी. जंगलापैकी 40 किलोमीटरचा परिसर येऊरमध्ये मोडतो. येथे विवेकानंद आश्रम, आयुर्वेद पंचकर्म केंद्र आहे. एका दिवसाच्या जंगल सफारीसाठी येऊर एक उत्तम ठिकाण आहे.
कसे पोहोचाल?
ठाणे शहरातील उपवन येथून येऊरकडे जाणारा रस्ता आहे. ठाणे रेल्वे स्थानकालगत येऊरकडे जाणारी बस ठरावीक अंतराने सुटते. पाटोणपाड्यापार्यंत बसने येऊन पुढे जंगलात चालत जावे लागते.

अंबरनाथचे शिवमंदिर


शिलाहार राजा शिवभक्त असल्याने त्यांनी 12 शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख सापडतो. त्यातील अनेक मंदिरे आता भग्न अवस्थेत असली तरी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष देत उभे आहे. मंदिरातील शिलालेखातील उल्लेखानुसार इ.स. 1050 मध्ये या मंदिराची उभारणी पूर्ण झाली. गेल्या वर्षी या मंदिराने 953 व्या वर्षात पदार्पण केले. या मंदिरावरील अप्रतिम कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
कसे पोहोचाल?
मध्य रेल्वेवरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून पूर्व विभागात मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.

माळशेज घाट


कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर आणि माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून ते विकसित होत आहे. एम.टी.डी.सी. आणि वन विभागाने घाट परिसरात विकास कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे पर्यटकांना सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
कसे पोहोचाल?
कल्याणहून माळशेजमार्गे पुणे अथवा नगर जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस नियमित उपलब्ध आहेत. कल्याणहून अडीच तासात माळशेजला येता येते.

वसई किल्ला


पोर्तुगिजांच्या दृष्टीने गोव्याला जितके महत्त्व आहे तितकेच वसई किल्ल्यालाही आहे. वसई किल्ला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. अनेक इमारती, तटबंदी, बुरूज पेक्षणीय आहेत.
कसे पोहोचाल ?
पश्चिम रेल्वेवर वसई स्टेशन असून स्टेशनलगतच किल्ल्यावर जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस तसेच रिक्षांची सोय आहे.

केळवा समुद्र


पालघर जिल्ह्यातील केळवे हा समुद्र किनारा पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडतो. मुंबईच्या जवळ असूनही शांत व स्वच्छ असा हा समुद्रकिनारा आहे. या परिसरात मिठागरे, केळीच्या बागा नजरेस पडतात.
कसे पोहोचाल?
केळवे हे मुंबई डहाणूरोड या उपनगरी रेल्वे मार्गावरील केळवे रोड या स्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे.

 

स्रोत - महान्युज

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate