অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुंबई

मुंबई

भारतातील एक प्रगत महानगर, अरबी समुद्र किनाऱ्यावरील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर व महाराष्ट्र राज्याची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ९०·०१ लक्ष (१९८१). क्षेत्रफळ ६०३ चौ. किमी. नवी दिल्लीच्या दक्षिण नैर्ऋत्येस १,१९१ किमी. वर, तर कलकत्त्याच्या पश्चिम नैर्ऋत्येस १,६४२ किमी. अंतरावर मुंबई वसलेले असून भारताचे प्रवेशद्वार म्हणून त्याला संबोधण्यात येते. लोकसंख्येच्या बाबतीत हे भारतातील कलकत्त्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर

भूवर्णन

मुंबई महानगर मुंबई बेट व साष्टी बेटाचा मोठा भाग मिळून तयार झाले आहे. मुंबई बेट हे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम या मूळ सात बेटांचे एकत्रीकरण होऊन तयार झाले आहे. या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०–७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे कटक आहेत. त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील कटक मलबार पॉइंटपासून वरळीपर्यंत पसरला आहे. या कटकाची मलबार हिल येथील सस. पासून उंची ५५ मी. असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे. दुसरा कटक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे. या कटकामुळे व नरिमन पॉईंट (भूशिर) मुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे. या दोन्ही कटकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, अँटॉप इ. लहानलहान टेकड्या आहेत. या दोन्ही कटकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार व नरिमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

मुंबई बेटाच्या उत्तरेकडील साष्टी बेटाचा मध्यवर्ती भाग टेकड्यांनी (उदा.,कान्हेरीचे डोंगर, घाटकोपर टेकड्या) व्यापला आहे. या टेकड्यांमधून अनेक लहानलहान नद्या (मिठी, पोईसर, दहिसर इ.) उगम पावून समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे साष्टी बेटावर अरीय नदीप्रणाली निर्माण झाली आहे. पश्चिमेला मिठी नदी व माहिमची खाडी, पूर्वेला एका लहानशा नदीमुळे तसेच ठिकठिकाणच्या दलदलीच्या भागांमुळे मुंबई बेट साष्टी बेटापासून वेगळे झाले आहे. साष्टी बेट मुख्य भूभागापासून पश्चिमेला वसईची खाडी व पूर्वेला ठाण्याची खाडी यांनी अलग झाले आहे. मोसमी पूल (कॉजवे), सडका, लोहमार्ग, खाडीवरील पूल इत्यादींनी मुंबई व साष्टी ही दोन बेटे आता एकमेकांशी जोडली गेली आहेत. मुंबईचा मोठा भाग समुद्रात भर घालून तयार केला गेला आहे व आजही बॅक बे, माहिम इ, ठिकाणी भरावकार्य दिसते.

पश्चिम भारतातील इतर भागांप्रमाणेच येथे दक्षिण ट्रॅप आहेत. पण मुंबईत या खडकांची क्षैतिजरेखा भंग पावते व हे खडक पश्चिमेकडे ५ ° ते १५ ° झुकलेले आढळतात. ज्वालामुखीनिर्मित या खडकांचे सर्वांत तळातील थर रावळी टेकड्या, अँटॉप हिल, शिवडी येथे दिसतात. हा ब्लॅक जॅस्पर अगर चर्ट या प्रकारचा कठीण खडक आहे. या खडकांच्यावर ज्वालामुखीय कोणाष्माचा थर आहे. गोलनजी हिल (परळ) व शीवचा किल्ला तसेच कान्हेरीची लेणी यांत हे थर दिसतात. यावरचा थर म्हणजे बदामी कुहरयुक्त करडे ट्रॅप होत. हा थर बेटावर ठिकठिकाणी आढळतो. त्यावरचा थर मुंबईतील अंतरा-ट्रॅपी हा आहे. यात अनेक प्रकारच्या अश्मस्थी किंवा जीवाश्म सापडल्याने भूवैज्ञानिक इतिहास समजण्याचे हे एक उत्तम साधन आहे. मुंबईत हा थर अनेक ठिकाणी आढळतो. या थरावरचा बेसाल्टचा थर मलबार हिलवर दिसतो.

ट्रॅपची निर्मिती झाल्यानंतर झीज होण्याचा काळ सुरू झाला. याचबरोबर जमिनीवर समुद्राचे आक्रमण होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे सखल भाग पाण्याखाली बुडून खाड्या बनल्या. मुंबईजवळच्या गोराई, मनोरी, मालाड इ. खाड्या याच भूवैज्ञानिक घडामोडींच्या साक्षी आहेत.

हवामान

मुंबईचे हवामान उष्ण, दमट व सम आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान हवामान साधारण थंड, तर मार्च ते मे यांदरम्यान हवामान उष्ण असते. जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते, तर मॉन्सूनच्या ऑक्टोबर-डिसेंबर या काळात हवा उष्ण असते. मुंबईचे जानेवारीतील सरासरी तपमान १९° से., तर मे महिन्यात ते सरासरी ३३° से. असते. वार्षिक पर्जन्यमान १८० सेंमी. असून त्यांपैकी सु. ६० सेंमी. पर्जन्य जुलै महिन्यात पडतो.

नारळ, ताड, आंबा, चिंच, वड इ. वृक्षप्रकार या भागात आढळतात. साष्टी बेटावर पूर्वी वाघ, चित्ता, कोल्हा, हरिण हे प्राणी आढळत. त्यामुळे शिकारीसाठी हे बेट प्रसिद्ध होते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate