অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लातूर जिल्हा

लातूर जिल्हा

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील एक जिल्हा. त्याचा विस्तार १८°०५’ उत्तर ते १९°१५’ उत्तर अक्षांश आणि ७६°२५’ पूर्व ते ७७°३५’ पूर्व रेखांशांदरम्यान आहे. क्षेत्रफळ ७,३७२ चौ. किमी. असून त्याची पूर्व - पश्‍चिम लांबी सु. ११२ किमी. व उत्तर दक्षिण रूंदी ११३ किमी. आहे.लोकसंख्या

१२,९३,३५४ (१९८१). उस्मानाबाद जिल्ह्यातील पूर्वेकडील लातूर, अहमदपूर, उदगीर निलंगा व औसा या पाच तालुक्यांचा एक समूह १६ ऑगस्ट १९८२ रोजी वेगळा करण्यात येऊन लातूर जिल्हा निर्माण करण्यात आला. त्याचा पश्‍चिमेस उस्मनाबाद, वायव्येस बीड, उत्तरेस परभणी, ईशान्येस नांदेड हे जिल्हे आणि आग्नेयीस कर्नाटक राज्य आहे. हा प्रदेश पूर्वीचा हैदराबाद संस्थानचा भाग असून स्वांतंत्र्योत्तर काळात तालुक्यांची पुर्नरचना करण्यात आली.

१९५६ च्या राज्यपुनर्रचनेनुसार बीदर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा व उदगीर हे तालुके त्या वेळच्या उस्मनाबाद जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. लातूर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाई तालुक्यातील रेणापूर महसूल मंडळातील ५४ गावे आणि वाड्या लातूर तालुक्यात समाविष्ट करण्यात आल्या.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या २·४० टक्के आणि लोकसंख्या राज्याच्या जवळजवळ २·०६ टक्के आहे. जिल्ह्यात पाच तालुके आणि ९०४ गावे आहेत. त्यांपैकी ८८५ गावांत वस्ती असून १९ गावे निर्जन आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय लातूर(लोकसंख्या १,१२,०००- १९८१) येथे आहे.

भूवर्णन

या जिल्ह्याचे सर्वसाधारण दोन नैसर्गिक भाग पडतात. तेरणा नदीच्या उत्तरेकडील बालाघाट पर्वतश्रेणीने व्यापलेला पठरी प्रदेश आणि नदीच्या दक्षिणेकडील सखल मैदानी प्रदेश. यांत अहमदपूर - उदगीर भागातील मन्याड - लेंडी नद्यांचा मैदानी प्रदेश, मांजरा व तावरजा नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आणि तेरणा व तिच्या उपनद्यांचा प्रदेश अंतर्भूत होतो.

बालघाटची एक शाखा अहमदनगर जिल्ह्यातून येथे येते. तिने लातूर, निलंगा व औसा तालुक्यांचा उत्तरेकडील काही भाग व्यापला असून बालाघाटची दुसरी शाखा अहमदपूर व उदगीर तालुक्यातील दक्षिण भागात वायव्येकडून आग्नेयीकडे जाते. उदगीर तालुक्यात पर्वतरांगांना विभागणारी खोरी असून पठारी प्रदेश सस.पासून सरासरी ६०९ मी. उंच आहे.

जिल्ह्यातील जमिनीचे मुख्यतः दोन भाग पडतात. एका भागात सर्वसाधारण हलकी व मध्यम हलकी जमीन असून ती कमी आर्दता शोषणारी आहे. याच भागात काही ठिकाणी तांबड्या रंगाची जांभा मृदा आढळते. दुसऱ्या भागातील जमीन काळी व कसदार असून काही ठिकाणी हलक्या प्रतीची आहे. तीत काळी कन्हार व थोडे क्षारयुक्त पातळ थर असलेले मृदा प्रकार आढळतात. कन्हार जमिनीचे, (गाळाची सुपीक जमिन) प्रमाण नदीखोऱ्यात आढळते.

मृदा चिकट, चांगल्या पोताची व आर्द्रता टिकवून धरणारी असल्याने तीत वर्षातून दोन पिके घेतली जातात. नद्यांपासून थोड्या उंचवट्याच्या भागात भरड पोताची जमीन आहे. य मृदेत वाळू, चुना किंवा दोन्हींचे मिश्रण आढळते. कन्हार व भरड पोताची जमीन मुख्यतः तेरणा, मांजरा व तावरजा नद्यांच्या परिसरात आढळते. डोंगर पायथ्याच्या व डोंगर-उताराच्या भागांत कमी प्रतीची वाळू मिश्रित रेताड जमीन आहे.

मांजरा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असून तेरणा, तावरजा व धरणी या उपनद्यांसह ती बालाघाट पठारावरून जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. तेरणा ही उपनदी औसातालुक्यातून जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सरहद्दीवरून वाहत जाते आणि पुढे निलंगा तालुक्यात पूर्व सरहद्दीवर मांजरा नदीस मिळते. मन्याड व लेंडी या लहान उपनद्या असून मन्याडअहमदपूर तालुक्यात उगम पावते व उत्तरेकडे नांदेड जिल्ह्यात जाते, तर लेंडी अहमदपूर व उदगीर तालुक्यांतून वाहते. धरणी नदी वडवळ-राजूरच्या उत्तरेकडे तीन किमी. वर उगमपावून दक्षिणेकडे राजूरा, धरणी, नळेगाव या गावावरून वाहत जाऊन पुढे जळगावजवळ मांजरा नदीस मिळते.

हवामान

जिल्ह्याचे हवामान सौम्य व कोरडे आहे. साधारणतः डिसेंबर-जानेवारी हे थंड महिने तर मे व जून हे सर्वात उष्ण महिने असतात. मात्र विदर्भातील अति-उष्ण हवमान येथेआढळत नाही. उन्हाळ्यात दैनिक सरासरी कमाल तापमान ४०° से. व किमान २५° से. एवढे असते. काही वेळा उन्हाळ्यातील तापमान ४५° से. पर्यंत जाते. तर हिवाळ्यात ते १३° से.पर्यंत उतरते. या जिल्ह्यात ९०° टक्के पाऊस नैॠत्य मॉन्सूनचा पडतो.

जूनच्या मध्यास पर्जन्यवृष्टीस प्रारंभ होऊन पावसाळा ऑक्टोबरअखेर संपतो. औसा व निलंगा तालुक्यांतसरासरी पर्जन्यमान ८० सेंमी. असून लातूर, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यांत ते सरासरी ९० सेंमी. आहे. एकूण जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७४ सेंमी. आढळते. उन्हाळ्यातचक्रवात आणि नैॠत्य मोसमी वाऱ्यांच्या सुरूवातीच्या काळात झंझावत येतात.

निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे जिल्ह्यात जंगलाखालील क्षेत्र अगदीच नगण्य म्हणजे ०·१६टक्के अवर्गीकृत जंगलक्षेत्र (१,१४० हेक्टर) असून जो काही जंगलाचा प्रदेश आहे तो प्रामुख्याने वनाच्छिदित डोंगररांगांवर आढळतो. त्यात बाभूळ, पळस, कडुनिंब, जांभूळ, डिकेमालीइ. वनस्पती प्रकार आढळतात; मात्र झाडे विखुरलेली आहेत आणि पठारी भागात डोंगर-उतारावर गवत उगवते. अहमदपुर तालुक्यात वडवळ गावाजवळ बेट नावाच्या डोंगरावर अनेकप्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. जंगलात हरीण, मुंगूस, तरस, कोल्हा, वानर, माकड इ. प्राणी व विविध पक्षी आहेत. एकूण वन्य प्राणी कमी आहेत. वनक्षेत्र नसल्यामुळेवनउत्पादनसुध्दा अगदी अल्पच आहे; तथापि तेंदूच्या पानांपासून १९८८-८९ या आर्थिक वर्षात २२० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate