অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोलापूर जिल्हा

सोलापूर विषयी

सोलापूर शहर व जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे वसलेला आहे. या जिल्ह्यात एकूण ११ तालुके असून उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे प्रशासकीय कार्यालय सोलापूर शहरामध्येच आहेत. पंढरपूर आणि अक्कलकोट यासारखी धार्मिक शहरे या जिल्ह्यात आहेत. बार्शीतील श्री. भगवंताचे मंदिर आणि मंगळवेढ्यातील संत दामाजीपंत यांचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहेत. एकेकाळी सोलापूर शहर सूत गिरण्यांमुळे कापडाची राजधानी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. कामगारांचे शहर म्हणून सुद्धा त्याची ख्याती होती. महामार्ग व रेल्वे मार्गांनी हे शहर अनेक महत्वाच्या जिल्हे व शहरांना जोडले गेलेले आहे. या शहरामधूनच राष्ट्रीय महामार्ग क्र. ९, १३ व २११ जातात. सोलापूर शहरापासून केवळ ४८ कि.मी. अंतरावर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे धार्मिक क्षेत्र वसलेले आहे. सोलापूरपासून ९८ कि.मी. अंतरावर विजापूर हे प्रसिद्ध ऐतिहासिक शहर वसलेले आहे.

सोलापूर : ऐतिहासिक स्थान


इतिहास काळापासून सोलापूर जिल्ह्यावर आर्यभट्ट, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव आणि बहामनी इत्यादी घराण्यांचे राज्ये होते. सोलापूर या शब्दाची निर्मिती "सोळा + पूर" (खेडेगाव) या दोन शब्दापासून झालेली आहे. इतिहासातील संदर्भानुसार सोलापूर शहराचा विस्तार १६ खेड्यांनी व्यापलेला होता. त्या सोळा खेड्यांचे नावे अशी आहेत : आदिलपूर, अहमदपूर, फतेहपूर, जमादारवाडी, काळ्जापूर, खादारपूर, खान्देर्केव्डी, ममदापूर, रानापूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगे, सोनापूर आणि वैद्यकवाडी इत्यादी.
सध्याचा सोलापूर जिल्हा हा अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनातून बनला त्यावेळेला त्याचा क्षेत्रामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, ईंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. १८६४ मध्ये सोलापूरचा उपजिल्ह्याचा दर्जा रद्द करण्यात आला. व १८७१ साली या जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा व सातारा जिल्ह्यातील पंढरपूर व सांगोला हे उपविभाग जोडण्यात आले. १८७५ मध्ये माळशिरस हा उपविभाग सोलापूरला जोडण्यात आला. १९५६ च्या राज्य पुनर्रचना धोरणानुसार सोलापूरचा मुंबई राज्यात समावेश करण्यात आला. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात  समावेश झाला.
भारताच्या इतिहासामध्ये सोलापूरचे एक आगळे वेगळे स्थान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच या जिल्ह्यातील लोकांनी ०९ मे ते ११ मे १९३० या तीन दिवसांमध्ये स्वातंत्र्याचा आनंद घेतला होता. मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर ब्रिटीश सत्तेविरुद्ध मोठा प्रक्षोभ निर्माण झाला. सोलापूरमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उठले. अनेक ठिकाणी निषेध सभा व चळवळी सुरु करण्यात आल्या. पोलिसांच्या गोळीबारामध्ये अनेक सोलापूरकर मारले गेले . याचा परिणाम म्हणून सोलापूरातील प्रक्षोभीत तरुणांनी अनेक पोलीस केंद्रावर हल्ले केले. लोकांच्या भीतीमुळे ब्रिटीशांचे अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस सोलापूरातून पळून गेले. या कालावधीत सोलापूरातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षिततेची जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांवर होती. त्यावेळचे काँग्रेस अध्यक्ष श्री. रामकृष्ण जाजू व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या तीन दिवसांमध्ये सोलापूरातील कायदा व सुव्यवस्था यांचे नियंत्रण केले.
१९३० मध्ये भारताचा राष्ट्रध्वज सोलापूर नगरपरिषदेच्या इमारतीवर फडकविणारी पहिली नगरपरिषद मानली जाते. महात्मा गांधीच्या दांडीयात्रेपासून प्रेरणा घेवून सोलापूरातील स्वातंत्र्य सैनिकांनी पुण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा राष्ट्रध्वज ६ एप्रिल १९३० रोजी नगरपरिषदेच्या इमारतीवर फडकविला. त्यामुळे ब्रिटीश सरकार भयंकर खवळले व त्यांनी सोलापूरमध्ये मार्शल लॉ सारखा क्रूर कायदा लादला. अनेक नेत्यांना व नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात डांबले त्यामध्ये श्री. मल्लप्पा धनशेट्टी, श्री. कुर्बान हुसेन, श्री. जगन्नाथ शिंदे आणि श्री. किसन सारडा या चार स्वातंत्र्यसैनिकांना सोलापूरातील मंगळवार पेठ पोलीस स्टेशन मधील दोन पोलिसांचा निर्घुण खून केल्याबद्दल अटक करण्यात आली.
कनिष्ठ न्यायालयाने त्या चौघांना सजा सुनावली. उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. १२ जानेवारी १९३१ रोजी त्यांना फासावर लटकविण्यात आले त्या चार स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे चार पुतळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभे करण्यात आले असून त्या परिसराला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले आहे.
माहिती संकलक : अतुल पगार

 

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate