गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य आहे. औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्यादृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. विविध प्रजातींची वृक्षराजी, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत केले. या अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचे 19706 हेक्टर तर जळगावचे 6355 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.
गौताळा औटराम घाट अभयारण्य कन्नड गावापासून 15 कि.मी अंतरावर आहे तर चाळीसगाव पासून 20 कि.मी अंतरावर. औरंगाबादपासून कन्नड 65 कि.मी अंतरावर आहे. हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो. कन्नडहून 2 कि.मी पुढे गेल्यानंतर एक फाटा लागतो. या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो. तेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवग्याची झाडं, प्राणी, पक्षी पाहू शकतो.
अभयारण्यात बिबट्या, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर यासह इतर 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.
प्रसिद्ध गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, केदारकूंड, सीताखोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते.
गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते ती उजवीकडे भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलिकडे मांजरमाळ डोंगर दिसतो.
या अभयारण्याजवळ पाटणा येथे निकूंभ राजवंशानी बांधलेले 12 व्या शतकातील पुरातन मंदिर आहे. चंडिकादेवी मंदिरापासून काही मीटर अंतरावर गणित आणि खगोल तज्ज्ञ भास्काराचार्यांचे पीठ आहे. जिथे बसून त्यांनी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात अनेक गणिती सिद्धांत मांडल्याचे बोलले जाते.
पाटणदेवीच्या हिवरखेडा प्रवेशद्वारातून पर्यटक अभयारण्यात प्रवेश करू शकतात. पुरणवाडी आणि पाटणादेवी येथे वन विभागाची विश्रांतीगृहेही पर्यटकांच्या सोईसाठी उपलब्ध आहेत. गौताळा औट्रमघाट अभयारण्य हे मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.
हे वन मंदिरे आणि पुरातत्वीय संपदेने समृद्ध आहे. कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर चंदन नाला लागतो. तिथे मोर पोपट यासह सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबूल, कोतवाल, चंडोल असे विविध रंगाचे पशुपक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते. पुढे एक मारूतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. या परिसरात पूर्वी गवळी लोक रहायचे, त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या त्यावरून या तलावाला गौताळा तलाव असे नाव पडले पुढे हेच नाव या अभयारण्यालाही मिळाले.
औरंगाबाद-कन्नड रोडला डावीकडे पितळखोऱ्याच्या लेण्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ डोंगररांगात कोरलेल्या या लेण्याही पर्यटकांना आकर्षित करतात. गौताळा तलावाच्या पुढे एक ऊंच टेकडी आहे. या टेकडीवर एक गुहा आहे. त्यात एक पाण्याची टाकी आहे. गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ऋषींनी तप केले असे म्हटले जाते. यामुळेच या टेकडीला गौतम टेकडी असं देखील म्हणतात. येथे मोठ्याप्रमाणात वनौषधी सापडतात. पवण्या, लव्हाळी, हरळी, कुसळी, नागरमोथा, सफेद मुसळी, शतावरी, अमरवेल, जंगली लवंग, गौळणा, हरणखुरी, रानकेळी, मनचंदी म्हाळू, गोमिळ्या, धोळ, म्हाकोडी, दौडी, तामूलकंद, खरबुरी, हामण, वढदावा, सुलेकंद अशा आयुर्वेदाला उपयुक्त वनस्पती अभयारण्यात विपुल प्रमाणात आहेत. पर्यटनाच्या सर्वांगाना स्पर्श करणारे हे ठिकाण त्यामुळेच खुप महत्वाचे आहे. औरंगाबाद-धुळे या रस्त्याला जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 211 याच अभयारण्यातून जातो. अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी जूलै ते जानेवारी असा आहे.
जवळचे शहर- चाळीस गाव- 20 कि.मी, कन्नड- 15 किमी
विमानतळ- औरंगाबाद- 75 कि.मी
रेल्वेस्थानक- चाळीसगाव – 20 कि.मी, औरंगाबाद- 65 कि.मी
इतर प्रेक्षणीय स्थळे- औरंगाबाद-मकबरा, पाणचक्की, खुलताबाद. दौलताबाद, अजिंठा वेरुळ, भद्रामारूती, औरंगाबाद लेणी, सोनेरी महल
लेखक-डॉ.सुरेखा मधुकर मुळे
माहिती स्रोत:महान्युज
अंतिम सुधारित : 2/4/2020