बीड ही संतांची भूमी समजली जाते. पासोडीकार दासोपंत अंबाजोगाईचे... येथेच विराजमान आहे माता रेणुका. परळीला आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथ. स्थानिक बीडच्या जवळ आहे कपिलधारचा मोठा धबधबा. नवगणराजूरीचा बहुमूखी आणि नामलगावचा श्रीगणेश इथल्या लोकांचं श्रद्धास्थान.
बीड शहराबाहेर आहे खंडेश्वरी मंदिर, त्याला लागून असलेल्या दीपमाळा, शिदोड गावची रेणुकामाता आणि तिथे असलेली हलती दीपमाळ. जुन्या बीडमध्ये आहे एका पाषाणात कोरलेलं हेमाडपंथी कंकालेश्वर मंदिर, राक्षसभूवनचे शनी महाराज, धारूरचा किल्ला, कधीही न आटणारी खजाना बावडी अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेलं हे शहर. या शहरात जो कुणी येईल त्याला पर्यटनाचा सर्वांगीण आणि तृप्त अनुभव आणि आनंद देणारं हे शहर आहे. यासर्वांबरोबर लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे नायगावचं मयूर अभयारण्य.
समजा आपण बसने किंवा कारने प्रवास करत आहोत आणि अचानक आपल्या गाडीसमोरून मोरांचे थवे उडत आडवे गेले तर? किंवा आपल्या दोन्हीबाजूंनी खिडकीबाहेर डोकावताच फुलवलेल्या पिसाऱ्यांनी नाचणारे, उडणारे मोर, मोरांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले तर? लॉटरी लागल्याचा आनंद होईल की नाही...
हा आनंद मी लहानपणापासून अनुभवलेला... कारण आम्हा बीडकरांच्या हाकेच्या अंतरावर आहे नायगावचे मयूर अभयारण्य.
पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेलं तर नायगावच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोड्याच जोड्या पहायला मिळतात.
पाणवठ्यावर आलेले मोर, झाडाच्या फांद्यांवर आपला भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून बसलेले मोर, डोंगराच्या पायथ्याशी बसलेले मोरांचे थवे, असे मोरच मोर आपल्याला पहायला भेटतात तरी मन शांत होत नाही. “दिल मांगे मोर” अशी आपली भावस्थिती झालेली असतांनाच एखादा मोर आपला देखणा फुलोरा नाचवत थुई थुई चालत आपल्यासमोर येतो आणि आपल्याही नकळत आपण या चितचोर मोराला पाहून म्हणून जातो “अहाहा...क्या बात है.”
मुंबईहून बीडला जातांना प्रवासानं आळसावलेलं मन वाट पहात असतं ते सौताड्याचा घाट येण्याची. या सौताड्याच्या घाटात एक सुंदर महादेवाचं (रामेश्वर) मंदिर आणि भला मोठा धबधबा आहे... पावसाळ्यात खोल दरीत कोसळणारा पाण्याचा प्रपात पाहतांना निसर्गाचं हे रुप किती पाहू आणि किती नाही असं होतं... थोड पुढं गेलं की पाटोद्याच्या पठारावर ऊंच ऊंच उड्या मारत हुंदडणारे हरणांचे कळप दिसून येतात. त्याच्या थोडं पुढं गेलं की, रोहतवाडी नावाचं गाव लागतं... काळी मैना अर्थात करवंदांसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव त्याच्या साधेपणानं लक्ष वेधून घेतं.
रोहतवाडीचा छोटेखानी घाट उतरतांना आपण आपणहून एकटक नजरेने बाहेर पाहू लागतो कारण नायगाव जवळ आलेलं असतं आणि आपण मोरांच्या साम्राज्यातून बीडला जाणार असतो...
बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर बीड-पाटोदा-नगर व बीड लिंबादेवी-डोंगरकिन्ही-नगर या दोन रस्त्याच्या बाजुला असलेल्या डोंगराळ भागात वसलेलं हे अभयारण्य. खुरट्या झाडोऱ्याने आणि गवताने आच्छादिलेलं. पावसाळ्यात हे डोंगर हिरवेगार झालेले असतात. या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येणारे मोर लक्षात घेऊन शासनाने २९.९० चौ.कि.मी चा हा प्रदेश ८ डिसेंबर १९९४ रोजी ‘नायगाव मयूर अभयारण्य’ या नावाने संरक्षित केला. या परिसरात मदारशा दर्गा, डोंगरीचे गुरुकूल, डोंगकरकिन्हीचे नागेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी स्थळे आहेत.
या अभयारण्यातील दररोजची सकाळ मोरांच्या केकारवाने गुंजत उगवते. विशेषत: पहाटेच्या गार वाऱ्यात मोर अगदी रहदारीच्या रस्त्यावर, रस्त्याकाठच्या झाडांवर येऊन बसलेले दिसतात.. जस-जसे ऊन वाढत जाते तस- तसे मोर दिसण्याचे प्रमाण कमी होते... हे मोर पुन्हा या झुडपांमध्ये दडून जातात..
नायगावचं मयूर अभयारण्याचं वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते.. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, लिंब, ग्लेरिसिडिया, शिरस, बोर, यासारख्या झाडांचा समावेश आहे. नैसर्गिकरित्या दिसणाऱ्या झाडांपैकी साग, तेंदू, सालई, मोवई, ऐन, बहावा, बेल, मोहा, आवळा, बिबा, पळस, खैर, मेडशिंग, बेहडा, चंदन यासारखी झाडं आपल्याला पहायला मिळतात.
अभयारण्याचे क्षेत्र हे डोंगर उताराचे आणि कमी पावसाचे क्षेत्र असल्याने डोंगरावरील झाडोराही खुरटा आहे. येथे कुसळी, पवना, शेडा, मारवेल यासारख्या गवताच्या प्रमुख जाती असून करवंद, घाणेरीची झडुपं आणि सीताफळाची जाळी दिसून येते.
या अभयारण्यात मोराबरोबर तरस, लांडगा, कोल्हा, खोकड, रानमांजर, काळवीट, ससे यासारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्त्व जाणवते. येथे मोरांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच या अभयारण्याला मयूर अभयारण्य असे नाव देण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात.
या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्याला लागून असलेल्या गावकऱ्यांची आणि मोरांची झालेली मैत्री. उन्हाळ्यात मोरांची तहान भागवण्याचे आणि त्यांची भूक भागवण्याचे काम गावकरी मोठ्या उत्साहाने करतात. हा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिलीमीटर आणि उन्हाळ्यातील कमाल तापमान ४५ अंश सेल्सियस, हिवाळ्यात हा पारा १० अंश सेल्सियस पर्यंत खाली जातो.
नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे असून बीड पासून या अभयारण्याचे क्षेत्र बीड-पाटोदा-अहमदनगर या मार्गावर २० कि.मी च्या अंतरावर आहे. या रस्त्यावर एस.टी बस सेवा तसेच खाजगी वाहनांची नेहमीच वर्दळ असते.
नायगांव येथे बांधकाम खात्याचे दोन विश्रामगृह आहेत. त्याचे आरक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांच्या कार्यालयात होते.
याशिवाय इतर निवास व्यवस्था येथे उपलब्ध नसली तरी बीड शहर अगदीच जवळ असल्याने शासकीय विश्रामगृहांबरोबरच खाजगी (हॉटेल्स) निवासव्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. - डॉ. सुरेखा म. मुळे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
माहिती स्रोत: महान्यूज, मंगळवार, ०९ जून, २०१५
अंतिम सुधारित : 10/7/2020