অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फणसाड अभयारण्य

कोकणाला 720 किमी चा अथांग निळाशार समुद्र किनारा लाभला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील सागर किनाऱ्यावरील मुरुड-जंजिरा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध आहे. मुरुडच्या अलीकडे असलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील पर्यटक व पक्षीप्रेमी येथील निसर्ग सौंदर्य वनसंपदा व वन्यजीव, प्राणी व पक्षी यांच्या सान्निध्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर भेट देत असतात.

मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर व मुरुडच्यामध्ये 55 चौ.कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या ह्या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र होते. संस्थानाचे नवाब सिद्धी यांच्या मालकीचे शिकार स्थळ म्हणून सदर जंगलाचा वापर होत असे. या ठिकाणच्या जैवविविधतेचे संरक्षण व्हावे व निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. जंगल संरक्षण, वन्यजीवांचे संवर्धन व व्यवस्थापन यासाठी पुढे हे अभयारण्य वन विभाग अलीबाग यांचेकडून वन्य जीवन विभाग ठाणे, यांचेकडे सन 1994 मध्ये हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर या अभयारण्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला.

शुष्क पानगळीची वने, सदाहरित वने, मिश्र सदाहरित वने व नदीकाठची वने अशा या वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. पश्चिम घाटाअंतर्गत येणाऱ्या या भूप्रदेशाचे उष्णकटीबंधीय हवामान असून तापमान किमान 25 ते कमाल 35 अंश सेल्सीयस इतके असते. सरासरी 2800 मिलीमीटर पावसाची नोंद येथे घेण्यात आली आहे.

वृक्षसंपदा

‘फणसाड’ अभयारण्यात नवाब सिद्धीकालीन साग व निलगिरीची रोपवने यासह 718 प्रकारचे दुर्मिळ व औषधी वृक्ष आढळतात. यामध्ये प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या यासह उक्षी, सर्पगंधा, कुरडु मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सीता अशोक अतिशय उपयुक्त वनौषधी म्हणून ओळखली जाते. याचे कुळ ‘फॅबेसिया’ आहे. ही झाडे 10 मी. उंचीपर्यंत वाढतात. या झाडाची साल, फुले आणि बिया औषधी गुणांनीयुक्त असतात. फुले अतिशय मोहक दिसतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेलींचा समावेश आहे. जगातील सर्वांत लांबीची गारंबीची वेल हे तर येथील वैशिष्ट्य. याची लांबी 100 मीटर पेक्षा जास्त असून शेकरु मोठ्या आवडीने गारंबीच्या शेंगांमधील गर खातात शेंगेच्या आतील गर स्नायुदुखीवर उपचारार्थ वापरतात. आयुर्वेदात गणलेले सीता अशोक हे झाड फणसाड अभयारण्यात असून ते सदाहरीत प्रकारात मोडते. वृक्षसंपदेला साजेशी 90 प्रकारची फुलपाखरे येथे आनंदाने उडताना दिसतात. ज्यात प्रामुख्याने ब्ल्यू मॉरमॉन, मॅप, कॉमन नवाब यांचा उल्लेख करता येईल.

प्राणी संपदा

फणसाड वन्यजीव अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले ‘शेकरु’ येथे हमखास दृष्टीस पडते.

महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेला हा झुबकेदार शेपटीचा प्राणी उंच झाडांवर आढळतो. याची घरटी वैशिष्ट्यपूर्ण असतात. शेकरु विशिष्ट अशा शिळेप्रमाणे आवाज करतो. सकाळी व सायंकाळी त्याचे दर्शन घडते. कोवळ्या उन्हात याच्या हालचाली मोहक असतात. येथील उल्लेखनीय पिसोरी हे जगातील सर्वात लहान हरीण म्हणून ओळखले जाते. या प्राण्यांची उंची सुमारे 6 इंचापासून 1 फुटापर्यंत असते. ‘पिसोरी’ अतिशय चपळ असतात. कमी उताराच्या भागात याचा प्रामुख्याने आढळ असतो.

याबरोबर नाग, फुरस, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, तस्कर यासारखे अनेक बिनविषारी साप येथे आढळतात. क्वचितच दृष्टीस पडणाऱ्या अजगर व घोरपड या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावरही येथे आहे.

पक्षी संपदा

पक्षांच्या 164 प्रजाती या ठिकाणी आढळतात. ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे इत्यादी शिकारी पक्षी व सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरीयाल (हिरवे कबुतर) कोकीळ यासारखे गाणारे व रंगीबेरंगी पक्षी व खास करुन ओरीएंटल डवार्फ किंगफिशर जंगलातील सकाळच्या भटकंतीचा आनंद द्विगुणित करतात. याशिवाय येथील जंगलातील घनदाट भागात वास्तव्य असणारा खास पक्षी श्रीलंकन फ्रांगमाऊथ रात्रीच्या वेळी क्रियाशील असतो. याचे बेडकाच्या चेहऱ्यासारखे दिसणारे डोके वैशिष्ट्यपूर्ण असते. याचा आवाज कर्कश असतो. श्रीलंकेत प्रामुख्याने याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातील आणखी एक आकर्षक पक्षी म्हणजे धनेश. ‘ओम्नीवोरस’ कुळातील हा पक्षी याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे ओळखणे सोपे जाते. ‘ग्रे हॉर्नबील’ , ‘मलबार पाईड’ या दोन जाती येथे आढळतात. हा पक्षी जोडीने राहतो. या पक्षाच्या घरट्यात पिलांचे संगोपन करताना नर व मादी जंतू संसर्ग होवू नये म्हणून विशेष काळजी घेताना तज्ज्ञांच्या निरीक्षणात आढळले आहे. पर्यटकांचे खास आकर्षण असलेला बिबट्या येथे अगदी सहजपणे पहावयास मिळतो.

कुठे काय पहाल ?

फणसाड गाण व सावरट तलाव यांच्या नयनरम्य परिसरात बिबट्याची गुहा पाहणे हा एक थरारक अनुभव आहे. टायगर अँट, पॅगोडा अँट, हारवेस्ट अँट यांची वैशिष्ट्यपूर्ण घरटी पाहून पावले आपोआपच थांबतात. भांडव्याचा माळ, भोमाचा माळ, चाकाचा माळ या ठिकाणी ससाणा, सर्प गरुड यासारखे शिकारी पक्षी हमखास डोक्यावरुन घिरट्या घालताना दिसतात. दांडा मनोऱ्यावरुन होणारे अथांग समुद्राचे दर्शन मन सुखावते. तर दुसऱ्या बाजूला दूरपर्यंत पसरलेली घनदाट वनराई मनाला भुरळ पाडते. नशीब बलवत्तर असेल तर कधी कधी समुद्र गरुडही नजरेस पडतो. चिखलगाणीत पाण्यातील माशाची अचूकपणे शिकार करणारा खंड्या व स्वर्गीय नर्तक या देखण्या पक्ष्यांची आंघोळ निसर्गाच्या किमयेची ग्वाही देतात. झुपकेदार शेपटी डौलाने हलवित इकडून तिकडे भटकणारे शेकरु मधूनच आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते. धुण्याच्या माळावर अंधाराची चाहूल लागताच बिबट्याचे दर्शन होणे हा तर नशीबाचाच भाग. आजवर अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे. या सर्वांचा आनंद लुटावयाचा असेल तर येथे किमान एक दिवसाचा मुक्काम करणे अपरिहार्य आहे.

निवास, भोजन व अन्य सुविधा

पर्यटकांच्या व अभ्यासकांच्या वास्तव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग, ठाणे मार्फत येथे तंबू व व्हाईटहाऊस नामक स्वच्छ गेस्टहाऊसमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. आवारात सुरुवातीसच असलेल्या भागात उभारलेल्या प्रत्येक तंबूमध्ये 6 ते 8 माणसे आरामात राहू शकतात. यासाठी लागणाऱ्या सर्व मुलभूत सुविधांनी हे तंबू व गेस्टहाऊस परिपूर्ण आहेत. ग्राम परिस्थितीकीय विकास योजनेअंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून खास घरगुती चवीच्या भोजनाचा आस्वाद येथे घेता येतो. अभयारण्यातील प्रवेश वाहनव्यवस्थेसाठी शासकीय नियमाप्रमाणे ठराविक शुल्क आकारले जाते.

महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिकच्या वापरास येथे सक्त मनाई असल्याने परिसराची स्वच्छता, अंतर व माहिती यांचे सूचना फलक उभारुन वन्यजीवांच्या अधिवासाला धोका वा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते. स्थानिक माहितीपूर्ण निसर्ग परिचय केंद्रही येथे आपल्या ज्ञानात भर घालते. समुद्रकिनाऱ्यालगत हिरव्यागर्द झाडीतील निसर्गाच्या परीसस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपले मन:पूर्वक स्वागत !

 

लेखक:  महेंद्र देशपांडे, नाशिक

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 8/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate