नाशिकपासून 127 कि.मी. अंतरावर 54.46 चौ.कि.मी चे ममदापूर संवर्धन राखीव काळवीटांसाठी विकसित करण्यात आले आहे. भारतीय उपखंडाचं प्रतीक म्हणून ज्या काळवीटांकडे पाहिलं जातं त्या काळवीटांना या संवर्धन राखीवमध्ये विस्तृत स्वरूपात नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या परिसरात हे संवर्धन राखीव पसरलेले आहे. काळवीट हा फार लाजाळू, चपळ आणि देखणा प्राणी आहे. शुष्क मोकळी माळरानं आणि खडकाळ जमीन हेच काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण आहे.
काळवीट ही अतिशय धोक्यात असलेल्या 26 प्रजातींपैकी एक प्रजात. नामशेष होण्याच्या स्थितीत असलेल्या या प्राण्याचे संरक्षण होऊन त्यात वृद्धी व्हावी म्हणूनच वन विभागाने पाच गावातील काही क्षेत्र राखीव घोषित केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात रेहकूरी येथे हे काळवीट अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या तालुक्यात तसेच सोलापूर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात आणि हरियाणातही काळवीटांचे अस्तित्त्व आढळते. या सर्वांमध्ये येवला तालुक्यातील ममदापूर- राजापूर क्षेत्र हे काळवीटांसाठी योग्य असं ठिकाण आहे. इथे काळवीटांचा अगदी स्वच्छंद वावर आहे.
येथे 25 पेक्षा अधिक कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सोलर बोअरवेल, गणवेशधारी वन कर्मचारी, पर्यटनासाठी पूरक सायकल अशा अनेक सुविधांनी हे अभयारण्य सुसज्ज करण्यात आले आहे. यातून स्थानिकांना रोजगार देखील मिळाला आहे. या परिसरात काळवीटाबरोबर लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, उदमांजर, ससा, मुंगूस, साळींदर अशा इतर वन्यजीवांची रेलचेल आहे.
नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये इथल्या काळवीटांच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे एक शुभवर्तमान आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने काळवीटांचे जंगलातून बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
संपूर्ण भारतात सहा प्रकारचे कुरंगवर्णिय (ॲन्टीलोप) प्राणी आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात चार जातींचा वावर आहे. या चार जाती म्हणजे नीलगाय, चौशिंगा, चिंकारा आणि काळवीट. काळवीटाचे नर पिल्लू एक वर्षाचे झाले की त्याला शिंगे फुटतात. दुसऱ्या वर्षापासून तो जसा प्रौढ होत जाईल तस तसा त्याच्या शिंगांना गोलाकार पीळ पडत जातो. तिसऱ्या वर्षानंतर त्याला प्रौढ समजण्यात येते. त्याचा सुरुवातीचा गडद तपकीरी रंग नंतर अगदी काळा होतो. मात्र मानेचा आणि पोटाचा भाग पांढराच राहातो. मादी जन्मापासून फिकट तपकिरी रंगाची असते तिच्या रंगात बदल होत नाही. काळवीट हा कळपाने राहणारा प्राणी, एका कळपात साधारणत: पंधरा ते तीस अशी संख्या असते. त्यांच्या कुटुंबकबिल्यात नर-मादी, पिल्लू असे सगळेजण गुण्यागोविंदाने राहातात. असं असलं तरी नर आपलं क्षेत्र राखून ठेवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून संघर्ष करतांनाही दिसून येतो. मादी 20 ते 22 महिन्यांची झाली की ती प्रजोत्पादनक्षम होते. कळपात राहून सतत सावध राहणारे, हलकी चाहूल लागताच ऊंच झेप घेत धुम्म ठोकणारे आणि चुटूचुटू गवत खाणारे काळे मृग (काळवीट) ममदापूर संवर्धन राखीवमध्ये आपल्याला सहज पहायला भेटतात.
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, रेणूका देवी मंदिर, चांदवडचा रंगमहाल, शिर्डी, येवल्याचे पैठणी केंद्र, नस्तनापूरचे शनिपीठ, कोटमगावचे जगदंब देवी मंदिर, तात्या टोपेंची जन्मभूमी, अंकाई-टंकाई लेणी व किल्ला, माणिकपूंज धरण, सावरगाव-धानोऱ्याचा उभा हनुमान, लोहशिंगचे शाकंभरीमाता मंदिर ही काही जवळची प्रेक्षणीय स्थळं आहेत, त्यांनाही आपण वेळात वेळ काढून भेट देऊ शकतो. नांदगावला वन विभागाचे तर येवल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. नांदगाव, मनमाड, येवला येथे खासगी हॉटेल्सही उपलब्ध आहेत.
जवळचे रेल्वेस्टेशन मनमाड - 35 किमी., नांदगाव 25 कि.मी, नगरसूल 15 कि.मी, शिर्डी 52 कि.मी.
राजापूरपर्यंत रस्त्याने अंतर- नाशिक 110 कि.मी, औरंगाबाद 110 कि.मी. नांदगाव 25 कि.मी, मुंबई 300 कि.मी, शिर्डी 52 कि.मी, पुणे 245 कि.मी, गौताळा औटामघाट 110 कि.मी, त्र्यंबकेश्वर- 140 कि.मी, वणी (सप्तशृंगी गड)- 170 कि.मी
काळवीटांची बारमाही वस्ती असल्याने येथे केंव्हाही जाता येते. निरीक्षणासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम. ज्याला ब्लॅकबग सफारीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी ममदापूर संवर्धन राखीवला जायलाच हवे.
लेखक- डॉ.सुरेखा म. मुळे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 5/2/2020