অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव

महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव


नुकताच जागतिक व्याघ्र दिन साजरा झाला. महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची माहिती देश-विदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचावी, लोकांमध्ये जनजागृती होऊन व्याघ्र संवर्धनास चालना मिळावी आणि महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे या उद्देशाने मंत्रालयात एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ४ ऑगस्ट २०१५ रोजी मंत्रालयात तळमजल्यावर आयोजित होणाऱ्या या माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास वने मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्यातील व्याघ्र संवर्धन कार्यक्रमाचा घेतलेला हा आढावा...
भारताने व्याघ्र संवर्धनच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळी देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या ३८ वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ॲथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यात (डॉक्युमेंटेशन) ही आपला देश पुढे आहे.
स्टेटस् ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार देशात २००६ साली सुमारे १४११ च्या आसपास असलेली देशातील वाघांची संख्या २०१० साली १७०६ तर आज २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात ती २२२६ इतकी झाली आहे. वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे. कारण वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाघांसाठी चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.

केंद्र शासनाच्या याच अहवालानुसार महाराष्ट्रात २००६ साली १०३, २०१० साली १६९ आणि २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात सरासरी १९० वाघांचे अस्तित्व आढळून आल्याची नोंद आहे. व्याघ्र रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष व्याघ्र दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाकडून व्याघ्र संरक्षणाचे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडण्यात येत आहे. याशिवाय वनाधिकाऱ्यांना शस्त्र परवाने, व्याघ्र प्रकल्पात वायरलेस सेट देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प

अ.क्र

व्याघ्र प्रकल्पाचे नाव

अधिसूचना दिनांक

अति संरक्षित क्षेत्र  चौ.कि.मी

बफर क्षेत्र

चौ.कि.मी

एकूण क्षेत्र

चौ.कि.मी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

२७/१२/२००७

०५/०५/२०१०

६२५.८२

११०१.७७

१७२७.५९

पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर

२७/१२/२००७

२९/०९/२०१०

२५७.२६

४८३.९६

७४१.२२

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

२७/१२/२००७

२९/०९/२०१०

१५००.४९

१२६८.०४

२७६८.५३

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,कोल्हापूर

२१/०८/२०१२

२१/०८/२०१२

६००.१२

५६५.४५

११६५.५७

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

१२/१२/२०१३

६५६.३६

--

६५६.३६

बोर व्याघ्र प्रकल्प

१६/०८/२०१४

१३८.१२

--

१३८.१२

महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा वन विभागाचा मानस आहे. त्याची सुरुवात म्हणून महाराष्‍ट्रातील या व्याघ्र प्रकल्पांची माहिती देणारे एक दिवसीय प्रदर्शन मंत्रालयात तळमजल्यावर (एट्रीयम) दिनांक ४ ऑगस्ट २०१५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि वने मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल.

हे एक दिवसीय प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत पाहता येईल. प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जावे, हा त्यामागचा हेतू आहे.

कटआऊट्स, पोस्टर्स, खरे वाटणारे फायबरचे वाघ आणि इतर बॅनर्स या कार्यक्रमावेळी लावण्यात येणार असून त्यात वाघ आणि महाराष्ट्रातील सहा व्याघ्र अभयारण्यांची माहिती असेल. या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान एलईडीवर व्याघ्र संवर्धनाबाबत लघुपट, चित्रपटही दाखवले जातील. महाराष्ट्र शासनातर्फे व्याघ्र संवर्धनासाठी होत असलेले प्रयत्न यावेळी सांगितले जातील.

-डॉ.सुरेखा मुळे
वर‍िष्ठ सहाय्यक संचालक (माह‍िती)

माहिती स्रोत- महान्यूज,शनिवार, ०१ ऑगस्ट, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate