অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आडांचं आडगाव !

आडांचं आडगाव !

वेशीवरच्या पाऊलखुणा : आडगाव

आडांचं आडगाव !

गावाची ओळख त्या गावाच्या वैशिष्ट्यातून जेव्हा निर्माण होते, तेव्हा ती वैशिष्ट्ये पुढच्या पिढ्यांना दाखविण्यासाठी जपायला हवीत. त्यातील गुणांचा पुनर्वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण अनेकदा असे न झाल्याने ‘काखेत कळसा अन् गावाला वळसा’ अशी गत होते. पाणी प्रश्नाने अनेक गावे त्रस्त आहेत; मात्र ज्या गावाला आडांच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभला आहे, अशा आडगावातील आडी लुप्त होत आहेत. त्या जपण्यासाठी धडपडताना कोणी दिसत नाही. होळकरांची जहागिरी असल्यापासून पारतंत्र्यातही आडगावने ग्रामसुधारणेची ढाल मिरविली. आडगावने कर्तबगार पिढ्या घडविण्याची आपली परंपरा कायम ठेवत पहिले, दुसरे महायुद्ध तसेच काळाराम मंदिर लढ्यातही महत्त्वाची भूमिका वठवली असून, नाशिकला महापौर देण्यापर्यंतचा प्रवास आडगावने पाहिला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव एक उपनगर झाल्याचे पाहायला मिळते. मात्र मूळ आडगाव पहायचे असेल, तर गावातच जायला हवे. मुंबई-आग्रा महामार्ग पूर्वी आडगावातून जायचा. नंतर सध्याचा मोठा महामार्ग झाला. शहराचा एक भाग झालेले आडगाव कुस बदलत असले तरी जुन्या घरांमुळे गावपण अजूनही पाहायला मिळते. जुन्या महामार्ग रस्त्याने आडगावात जाताना महालक्ष्मी उद्यान आपले स्वागत करते. या उद्यानात तीन विरगळ आहेत. गावाबाहेर पूर्वी गावच्या स्वरक्षणासाठी विरगळ उभारल्या जायच्या तसेच गावच्या संरक्षणासाठी वीरमरण आलेल्या पुरुषांच्या स्मरणार्थ विरगळ उभारली जायची. या वीरगळींवर कोरलेली चित्रे पाहाण्यासारखी आहेत. याच उद्यानात एक मोठी बारव होती. ही बारव आता येथे नाही. मात्र तिच्या अस्तित्वाच्या खुणा अजूनही पाहायला मिळतात. ही बारव पुन्हा मोकळी करून तिचा पाण्याचा स्रोत जिवंत करता आला तर बागेची तहान सहज भागू शकेल. पुढे गावची वेस लागते वेशीबाहेरच डाव्या हाताला दगडी बांधणीचे लहानसे महादेव मंदिर आहे व त्याच्या आजूबाजूला नागपंथीय गोसावींच्या समाधी आहेत. या मंदिराचा आहे त्या स्वरूपात ‌जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे. हे मंदिर नेमके कधी व कोणी बांधले याची माहिती मात्र मिळत नाही.

आडगावची वेस ही वेशीच्या रचनेसारखीच, मात्र आधुनिक विचारांतून तयार झालेली असल्याचे दिसते. वेशीवर प्रशासकीय कार्यालय आहे. गावातील दुसरी वेस गावाच्या विस्तारात नष्ट झाली आहे. मात्र चांदवडच्या होळकरांनी उभारलेल्या गावाभोवतीच्या तटबंदीचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात. आडगावची ओळख पेशवाईपासून अधिक ठळक झाली. होळकरांना आडगाव जहागिरी म्हणून मिळाल्यानंतर हे गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले हे येथील घरांच्या बांधणीवरून दिसते. गावातील बारा बलुतेदारांची घरे त्याकाळच्या श्रीमंतीच्या खुणा दाखवितात. पण आडगाव हे नाव कसे पडले, याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. जुना महामार्ग गावाला आडवा गेल्याने आडगाव नाव पडले असावे, असे ग्रामस्थ सांगतात. मात्र हे खरे नाही. गावात आठ मारुती मंदिरे असल्याने आडगाव तर गावातील अंधारवाडी, कोळवाडी, माळवाडी, सावकारवाडी, पिराची वाडी, हनुमानवाडी, धोंडवाडी व आनंदवाडी या आठवाड्या असल्याने गावाला आडगाव नाव पडले, असेही म्हटले जाते. गावातील प्रत्येक जुन्या घरात खोल आड (विहीर) असल्याने आडांचे गाव, असे म्हटले जाते आणि हे बरोबरही आहे.

त्यामुळे या गावाला पूर्वी कधी पाण्याची कमतरता निर्माण झाली नसावी. दुष्काळातही या आडांनी गावाला साथ दिली. अनेक घरांमधील या आडांची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या आडी कशा खोदल्या असतील तसेच आधी आड खोदली व नंतर घर बांधले गेले का, असाही प्रश्न पडतो; कारण प्रत्येक आडाला पाणी आहे. जुन्या घरांची पडझड होऊन नवी घरे उभी राहू लागली आहेत. या आडांचे महत्त्व लक्षात न आल्याने त्या बुजविल्या जात आहेत. गावातील अनेक आडी व मोठ्या बारव आता बुजल्या आहेत. त्यांची स्वच्छता करून गावच्या पाण्याची गरज गावातच भागविणे शक्य आहे. मात्र यासाठी प्रयत्न होताना दिसत‌ नाही. गावातून नेत्रावती ही नदी वाहते. या नदीच्या पुरात होणाऱ्या नुकसानीमुळे गावकऱ्यांच्या नेत्रातून पाणी येई, म्हणून या नदीला नेत्रावती असे नाव पडले. नेत्रावतीला पूर आला की, घरातील आडांनाही पूर यायचा. घरातील प्रत्येक आड दुथडीभरून अजूनही वाहतात, असेही ग्रामस्थ सांगतात. गावातील जुन्या घरांची रचनाही अभ्यासण्यासारखी आहे. घरांवरील व काही वाड्यांवरील लाकडातील कोरीव काम पाहण्यासारखे आहे.

अकराव्या शतकात श्री चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रातही आडगावचा उल्लेख केला आहे. चक्रधरस्वामी सध्याच्या आडगाव पेट्रोलपंपाशेजारील अहिल्यादेवी पाण्याची बारव शेजारील श्री कृष्ण मंदिरात काही काळ थांबले होते. ही बारव अहिल्यादेवींनी बांधली असून, ती दुमजली बारव प्रकारातील आहे. कृष्ण मंदिरातून चक्रधरस्वामी मुक्कामासाठी आडगाव येथील एक लिंगाच्या मंदिरात एक रात्र वास्तव्यास होते. गावात व परिसरात बळीराज मंदिर, धोंडवीर महाराज मंदिर, दगडोबा महाराज मंदिर, आडगाव मशिद, भवानी मंदिर, खंडेराव महाराज मंदिर व इतरही लहान मोठी मंदिरे गावात आहेत. गावातील आडगाव सराफ यांच्याकडील पेशवाईतील गणपतीमूर्ती प्रसिद्ध आहे. होळकरांमुळे आडगावला जसा इतिहास लाभला तसाच इतिहास आडगावकरांनी दोन्ही महायुद्धात दाखविलेले शौर्यातून निर्माण केला आहे.

तसेच स्वातंत्र्यलढा, ब्रह्मदेश युद्ध, आसाम, बांगलादेश, जम्मू-काश्मीर, बांगलादेश मुक्तीलढा अन् काळाराम मंदिर लढ्यातही आडगावने पुढाकार घेतल्याचे दिसते. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचे लढे व भारत जोडो अभियानातही गावाने एकोपा दाखविला आहे. काळाराम मंदिर लढ्यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आडगावात दहा दिवस राहिले होते. येथील पुंजाजी जाधव कुटुंबियांकडे त्यांच्या आठवणींचा खजिना आहे. पुंजाजी नवसाजी जाधव हे काळाराम लढ्यातील बाबासाहेबांचे सहकारी होते. आडगावातील ब्रिटीशकालीन कॉन्ट्रॅक्टर उमाजी जाधव हे पुल बांधणी व रस्तेकामांसाठी प्रसिद्ध होते. ते बाबासाहेबांचे मित्र होते. त्यांच्याकडे अजून जपून ठेवलेली बाबासाहेबांची खुर्ची पाहायला मिळते. गाव पारतंत्र्यातही विकासात प्रगतीपथावर होते, हे १६ सप्टेंबर १९३७ रोजी आडगावला ग्रामसुधारणेबद्दल ब्रिटिश कलेक्टरच्या हस्ते ढाल मिळाली यावरून सिद्ध होते.

आडांचे आडगाव पूर्वी बटाट्यांसाठी प्रसिद्ध होते आता ते द्राक्षांसाठी प्रसिद्ध असल्याचे दिसते. तर आडगावला खाकी वर्दीची शानही म्हटले जाते. कबड्डी, कुस्तीच्या खेळाडुंसाठीही प्रसिद्ध असलेले आडगावने राजकारणातही दबदबा निर्माण केला आहे. नाशिकचे महापौर प्रकाश मते, चित्रकार शिशिर शिंदे याच गावचे. गावातील काही तरुणांनी बाळू विष्णू मते यांच्या स्मरणार्थ आडगाव इतिहास स्मरणिका काढून गावचा इतिहास संग्रहीत करण्याचा प्रयत्न केला आहे. गावच्या पाऊलखुणांचे हे संकलन कौतुकास्पद आहे. मात्र भविष्यात सतावणारा पाणीप्रश्न गावच्या नावातील आडांनी सोडविता येईल का, याबाबत आणि गावच्या होळकरकालीन इतिहासावर अधिक अभ्यास होण्याची गरज आहे.

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 6/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate