অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उनपदेव

उनपदेव

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर उनपदेव हे तीर्थक्षेत्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गरम पाण्याचे झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रचलित आहे. उनपदेव हे नाव खान्देशातील अहिराणी या बोलीभाषेतून प्राप्त झालेले आहे. उनपदेवाचा परिसर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा श्रीक्षेत्र उनपदेवाला लाभला आहे. सातपुडाच्या पर्वतरांगात असलेल्या उनपदेवाचा परिसर डोगरांनी हिरवळीचा शालू परिधान केल्याने पर्यटकांना आकर्षित करतो.

विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी वनस्पतींनी हा परिसर व्यापला आहे. या परिसरात सर्प, हरिण, मोरल, तडस, निलगाय, लानडोर आदि वन्य प्राणी पर्यटकांमध्ये लक्ष वेधून घेतात. पौराणिक महत्त्व असलेले हे तिर्थक्षेत्र प्रभू हरिश्‍चंद्र व श्री शरभंग ऋषिंच्या पदस्पर्शाने पुनीत झाले असून ह्याचा उल्लेख महर्षी वाल्मीकींनी मूळ रामायणात शरभंगस्थ सदेह स्वर्ग गमन असा केला आहे. गोमुखातून वाहणारे गरम पाणी सतत कसे वाहाते? पाण्याची उष्णता कमी अधिक का होत नाही ? असे कुतुहल निर्माण करणारे प्रश्न भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनात निर्माण होतात.

14 वर्षे वनवास भोगत असतांना प्रभू रामचंद्र येथे आले असता त्वचा रोगाने पीडित शरभंग ऋषिसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्यांनी अंघोळ करून शरभंग ऋषिंनी पूर्ववत दिव्य शरीररूप प्राप्त झाल्याची माहीती तेथील ग्रामस्थ देतात. तर सातपुड्याच्या पर्वतरांगातील गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे म्हणून अव्याहतपणे वाहणारे पाणी उष्ण असते. तर गंधक हे त्वचा रोगावरील उपचारांस उपयुक्त असल्याने त्वचारोग दुरूस्ती करण्यासाठी नागरीक हे पाणी घेऊन जातात. असे शास्त्रज्ञांचे मत आहे. संपूर्ण पौष महिनाभर या तिर्थक्षेत्राच्या परिसरात यात्रा भरते महाराष्ट्र सह मध्यप्रदेश, गुजरात येथील भाविक यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात त्यामुळे यात्रा उत्सव काळात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.

सातपुड्याच्या पायथ्याशी हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या या तिर्थक्षेत्रास शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या माध्यमातून येथे मनमोहक पॅगोडे, बगीचा, चिमुकल्यांसाठी मिनी ट्रेन, सभागृह, आर्कषक प्रवेशद्वार पर्यटकांसाठी आकर्षक ठरतात. तीर्थक्षेत्राच्या स्नान कुंडाच्या वरील बाजूस असलेले शरभंग ऋषिंची पुरातन गुंफा, श्रीमहादेव, गणपती, राम, लक्ष्मण, सितामाई, हनुमान यांचे मंदिर तसेच गोविंद महाराजांची समाधी म्हणून ओळख असणारी या उनपदेव या तिर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या योजनेतून या तिर्थक्षेत्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. एक दिवशीय पर्यटन स्थळ म्हणून उनपदेव हे नावारूपास आले असून या पर्यटनस्थळाला पर्यटक पसंती देत आहेत. वाढत्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत असून त्यांच्या धनसंचयातही वाढ होत आहे.

लेखक:  निलेश परदेशी, चाळीसगांव, जि.जळगांव

मो.नं.7588646750

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate