অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एे‌त‌िहासिक लाखलगाव

एे‌त‌िहासिक लाखलगाव

वेशीवरच्या पाऊलखुणा : एे‌त‌िहासिक लाखलगाव

गोदामाईचे आकर्षण भल्याभल्यांना आपल्याकडे खेचते अन् एक संस्कृती निर्माण करते. गावांची नावे बदलतात, जागा बदलतात, गाव एखाद्या शूरवीराच्या पाऊलखुणांवर चालू लागते अन् गावाला रूपडे यायला लागते. मंदिरांनी, घाटाच्या सौंदर्याने, साधूमहंतांच्या सहवासाने गाव बहरायला लागते. गावाला वाड्यांचा साज चढतो तसा इतिहासही आपली पाने भरू लागतो, असेच काहीसे लाखलगावबाबत झालेले दिसते. शौर्य अन् समृद्धी येथे हातात हात घालून नांदताना पाहताना लखनाबाद ते लाखलगाव हा प्रवास मोहात पाडतो.

गोदाकाठी वसलेले लाखलगाव औरंगाबाद महामार्गालगत नाशिकपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. उत्तरवाहिनी गोदावरीमुळे येथील गोदापात्रात स्नान केल्याने काशीस्नानाचे पुण्य मिळते, असे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळेच सिंहस्थ कुंभमेळ्यात येथेही शाहीस्नानासाठी साधू व भक्तांची गर्दी होते. औरंगाबाद महामार्गावर लाखलगाव लागले की, उजव्या हाताला ग्रामपंचायतीची दुमजली इमारत आहे. तेथून खाली उतार रस्त्याने पुढे गेल्यावर पूर्वेला तोंड करून उभी असलेली पेशवेकालीन वेस पहायला मिळते. गावाभोवतीच्या कोटाला चार वेशी होत्या. त्यातील एकच आता शिल्लक आहे. पूर्वीचे हे प्रवेशद्वार पेशवाईचा साज असलेले होते; मात्र त्याचा जीर्णोद्धार करण्यात आल्याने आता हे प्रवेशद्वार किल्ल्यासारखे वाटते. पूर्वीचे लाकडी दरवाजे आता प्रवेशद्वाराला नाहीत; मात्र त्याची भव्यता या गावाकडे आकर्षित करते.

मुघलकाळात लाखलगावचे नाव लखनाबाद होते अन् तेव्हाचे गाव आताच्या लाखलगावच्या पूर्वेला साधारण अर्धा किलोमीटरवर वसलेले होते. तेथे आजही पूर्वीच्या लखनाबाद गावातील मारूती जुन्या आठवणी जागवत उभा आहे. लाखलगावला ‘लाखलगाव रामाचे’ असेही म्हटले जाते. श्रीराम नाशिकमध्ये वनवासासाठी असताना स‌ीतेला हव्या असलेल्या सोनेरी हरणाचा पाठलाग करीत ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत गेले होते. सोनेरी हरणाच्या रूपातील मारीच राक्षसाचा वध करून ते पुन्हा नाशिककडे परतत असताना लाखलगावात व‌िश्रांतीसाठी थांबले होते. म्हणून लाखलगाव रामाचे, तर लाखेश्वर मंदिरामुळेच गावाला लाखलगाव म्हटले जाते, असे अंबादास कांडेकर सांगतात. २४ नोव्हेंबर १८६१ पासून बापू महाराजांमुळे लाखलगावला रामाचे लाखलगाव म्हणण्याची पद्धत रूढ झाल्याचे इतिहास अभ्यासक निवृत्तीनाथ बाबाजी कांडेकर सांगतात.

लाखलगावच्या प्रवेशद्वारातून गावात प्रवेश केला की, मारूती मंदिर अन् त्यासमोरील राम मंदिर आपले स्वागत करते. लाखलगावचे राम मंदिर अनोखे आहे, कारण येथे राम, लक्ष्मण सीतेसह गरूड, नारायण, लक्ष्मीच्या अनोख्या काळ्या दगड असल्यासारख्या दिसणाऱ्या साधारण दोन फूट उंचीच्या प्राचीन मूर्ती अनोख्या धातूंमध्ये साकारलेल्या आहेत. हा सोहळा डोळ्यात साठवावा इतका अप्रतिम आहे. पुजारी दीपक मोडकांची आठवी पिढी या मंदिराच्या सेवेत असलेली पहायला मिळते. रामनवमीला गावात यात्रा भरते. याच दिवशी एक दिवसाचे बोहाडेही होतात. रामनवमीप्रमाणेच हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो. राममंदिरामागे पेशवेकालीन वाडा आहे. या वाड्याने देह ठेवला असला तरी अप्पाजी गणेश वैद्य यांचे वंशज सुरेश वैद्य आजही या वाड्याचे वैभव मनात साठवून वाडा पहायला येणाऱ्यांना अप्पाजींच्या शौर्यगाथा सांगतात.

सरदार अप्पाजी गणेश हे रत्नागिरी येथील अंजनवेल गावचे. १७७२ च्या दरम्यान अप्पाजी लखनाबादला आले. अप्पाजी गणेश वैद्य थोरल्या माधवराव पेशव्यांचे सख्खे साडू होते. ते पूर्वी अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लखनाबादची जहागिरी दिली. अहमदाबादहून येताना त्यांनी प्रचंड संपत्ती सोबत आणली होती. गोदाकाठ आणि लाखलगावचा निसर्ग पाहून ते इथेच स्थिरावले. अप्पाजी वास्तुशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी नवीन लाखलगावची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे केली. सुरक्षेच्या दृष्टीने भक्कम तटबंदीचा कोट गावाभोवती उभारला व त्याला चार वेशी (प्रवेशद्वार) केल्या. यासाठी त्यांनी त्यावेळी दोन लाख रुपये खर्च केल्याची नोंद आहे. पूर्व दिशेची मुख्य वेस आजही त्यावेळच्या वैभवाची साक्ष देताना दिसते. गावातील घरे व मंदिरांची रचनाही वास्तुशास्त्रानुसारच दिसते. गावाच्या मध्यभागी चव्हाटा व धर्मशाळा बांधली.

तसेच हनुमान मंदिर, राम मंदिर व त्यातील मूर्तीही त्यांनी उभारल्या आणि गावाला दान दिल्या. गोदाकाठावर घाट बांधला. अप्पाजींचा वाडाही भव्य होता त्यासाठीही एक लाख रूपये त्यावेळी खर्च केले होते. कालांतराने तो पडला. मात्र त्या वाड्याचे अवशेष आजही आपल्या श्रीमंती वैभवाची साक्ष देतात. वाड्यातील लाकडावरील नक्षीकाम थक्क करणारे आहे. अप्पाजींनी त्यावेळी सरदार दाभाडे, सरदार गायकवाड सारख्या सरदारांना १६ लाख रूपये व्याजाने दिले होते. यावरून लाखलगावची श्रीमंती लक्षात यावी. अप्पाजींचे चिरंजीव सरदार अमृतराव वैद्य लढवय्ये होते. कल्याणचा सुभा लुटताना सैन्यात चांगली कामग‌िरी केल्याने त्यांनाही जहागिरी मिळाली होती. अमृतरावांचे चिरंजीव माधवराव व माधवरावांचा मुलगा अप्पाजी (पणजोबांचे नाव ठेवले) धार्मिक वृत्तीचे होते, अशी माहिती त्यांचे वंशज सुरेश वैद्य देतात. अप्पाजींच्या वंशाचा कुलवृत्तांतही सुरेश वैद्य यांनी जपून ठेवला आहे. यात अनेक ऐतिहासिक नोंदी असल्याने लाखलगावचा इतिहास उलगडतो.

वैद्यांचा वाडा पाहून गोदाकाठावर गेले की, दगडी बांधणीचे पेशवेकालीन पहिलेच लाखेश्वर बाबांचे महादेव मंदिर उभे असलेले दिसते. घुमटावरील व खांबांवरील नक्षीकाम सुंदर आहे. या मंदिराच्या दक्षिणेला अनेक समाधी आहेत. पहिली समाधी बालकराम स्वामींची असून, इतर साधूमंहतांच्या सहा समाधी आहेत. त्यासमोर गंगा गोदावरी माता मंदिर, दत्त मंदिर व सती माता मंदिर आहे. सती माता मंदिराबाबतही अख्यायिका सांगितली जाते. या मंदिरामागे दिगंबर बापू महाराज यांची संजीवनी समाधी गोदा काठावर आहे. दिगंबर बापू महाराजांच्या तपसाधनेबाबतच्या तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या अनेक अख्यायिका ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने सांगतात. आता नव्याने बांधलेले शनी मंदिर व जवळच जनार्दन स्वामी आश्रम आहे. शनी मंदिरासमोर पेशवेकालीन सिद्धेश्वर मंदिर असून, मंदिरातील नक्षीकाम सुंदर आहे.

मंदिराच्या बांधणीसंदर्भातील एक शिलालेख गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असून, सरदार अमृतरावांनी ते बांधल्याचे त्यात म्हटले आहे. शिवरामकृष्ण वाड यांनी फाटक यांच्या संपत्तीच्या हिश्शातून शके १६६३ ला गोदावरीच्या काठावर सुंदर घाट बांधल्याचा उल्लेख असलेला शिलालेखही घाटावर आहे. हा घाट बांधताना वास्तुविशारदाने आपले सगळे कसब वापरल्याचे पहायला मिळते. घाटाचे काम विशिष्ट कोनात केलेले आहे. सुंदर आकर्षक व भक्कम बुरूज, पायऱ्या, नदीला पाणी कमी अथवा जास्त असेल हे गृहित धरून निर्धोक अशा घाटाची बांधणी हे घाटाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. घाट तीन टप्प्यात असून, एक टप्पा अर्धवट दिसतो. अप्पाजी, अमृतराव व वाड यांनी वेगवेगळ्या काळात ते बांधल्याचे दिसते. घाटापासून पूर्वेस काही अंतरावर गोदापात्रात रामकुंड नावाची जागा प्रसिद्ध आहे. पूर्वी नदी ओलांडण्याचा मार्ग या कुंडापासून होता. एका राजाचे वऱ्हाड येथून जात असताना लग्नाच्या वऱ्हाडाशिवाय, रथ, घोडे या रामकुंडात बुडाली, अशी अख्यायिका आहे.

लाखलगावचे सौंदर्य न्याहाळत पुन्हा औरंगाबाद महामार्गावरून नाशिकच्या दिशेने दोन किलोमीटर गेल्यावर ओढा स्टेशन रस्त्यावर लाखलगावची हनुमान टेकडी आहे. येथील मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. लाखलगावचा अनोखा इतिहास निवृत्तीनाथ बाबाजी कांडेकर यांनी ‘समर्थ लाखलगाव’ या पुस्त‌िकेच्या माध्यमातून शब्दबद्ध केल्याने गावातील अनेक पैंलूंचा इतिहास वारसा रूपाने त्यांनी जपला आहे. असेच प्रयत्न गावोगावी व्हायला हवेत.

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate