वेशीवरच्या पाऊलखुणा : कुसुमाग्रजांचे उपेक्षित शिरवाडे
नाशिकमधील अनेक गावे प्रतिभावंतांची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र अशा प्रतिभावंतांचे मोल न समजल्यामुळे त्यांच्या गावांमध्येच त्यांची उपेक्षा पहायला मिळते. गावाला लाभलेला इतिहास असो वा कर्तृत्वातून निर्माण झालेले वैभव ते जपले तरच त्या इतिहासाच्या पाऊलखुणा अधिक ठळक होतात. अन्यथा कुसुमाग्रजांच्या नावाने ओळखले जाणाऱ्या वणी शिरवाडे गावात त्यांचे स्मारक उपेक्षितपणे उभे पाहताना मन सुन्न होते.
नाशिक-चांदवड रस्त्यावर ४१ किलोमीटरवर शिरवाडे फाटा लागतो. फाट्यावरून उजवीकडे अर्ध्या किलोमीटरवर शिरवाडे गाव काजळी नदीलगत वसले आहे. शिरवाडेला ‘वणी शिरवाडे’ असेही म्हटले जाते. यामागे अहिल्याबाई होळकरांच्या शिंदे घराण्याशी झालेल्या एका व्यवहाराचा संदर्भ आहे. अहिल्याबाई होळकरांनी वडनेर भैरव गावातील भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे गाव त्यावेळी ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या महसुलाचा भाग होते. हे गाव चांदवड संस्थानात अहिल्याबाईंना हवे होते. त्यांनी या गावाच्या बदल्यात चांदवडच्या महसुलातील पाचोरे, शिरवाडे, आहेरगाव ही गावे शिंद्यांना दिली. त्यामुळे या गावांच्या आधी वणी असे लावण्याची पद्धत रूढ झाली. त्यामुळे शिरवाडेला ‘वणी शिरवाडे’ म्हटले जाते. गावाला शिरवाडे का म्हटले जाते हे उलगडत नाही. मात्र गावाला वणी शिरवाडे प्रमाणे चोराचे शिरवाडेही म्हटले जाते. गावात एक दरोडेखोर राहत होता. त्याने इंग्रजांच्या नाकात दम आणला होता. त्याला पकडण्यासाठी गावात पोलिसांनी तळ ठोकला.
यावेळी त्या दरोडेखोराने पोलिसांच्या छावणीत चोरी करणार असल्याचा निरोप इंग्रज पोलिस अधिकाऱ्याला पाठविला अन् कडक बंदोबस्त असतानाही त्याने छावणीत चोरी करून दाखविली. या धाडसाचे इंग्रजांनी कौतुक केले अन् त्या दरोडेखोराला बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, अशी अख्यायिका बापू चौरे व नारायण निफाडे सांगतात. ऐतिहासिक पाऊलखुणा व काजळीच्या सहवासामुळे दीडशे-दोनशे उंबऱ्यांचे शिरवाडे खऱ्या अर्थाने मोहात पाडते ते कुसुमाग्रजांचे गाव असल्याने. मात्र गावातील वास्तव अस्वस्थ करते. एखाद्या श्रेष्ठ साहित्यिकाचे गाव म्हणून गावात त्या साहित्यिकाची ना चिरा आहे ना पणती! त्यामुळे कुसुमाग्रजांच्या नावाने छाती बडवून घेत दुकाने मांडणाऱ्यांची कीवही वाटायला लागते. मविप्रने सुरू केलेले हायस्कूलला कुसुमाग्रजांचे नाव दिल्याने तेवढे हायसे वाटते.
शिरवाडे गावात शिरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने काही अंतरावर नव्याने बांधलेले संत तुकाराम महाराज व शनी मंदिर आहे. गावात दरवर्षी शनी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. पूर्वी गावात बोहाडे व्हायचे; मात्र ५० वर्षांपासून तेही बंद झाले आहेत तर बैलांची शर्यतही बंद झाली आहे, असे महेश गुरव सांगतात. मंदिराच्या आवारात प्रवेश करताना तीन-चार वीरगळी जमिनीत निम्म्या गाडलेल्या पहायला मिळतात. वीरगळी पाहून काजळीलगत संगमावर काळ्या दगडात बांधलेल्या आकर्षक शनी मंदिर व नेत्रावतीचा विलोभनीय रूप पाहून गाववेशीकडे जाण्याचे वेध लागतात ते कुसुमाग्रजांच्या ओढीमुळे. शिरवाडेची वेस आता नाही; मात्र वेशीसारखे अर्धवट सिंमेटमधील बुरूज गावपण दाखवितात. बुरूजातून आत गेल्यावर उजव्या हाताला गोसावी समाजातील साधू पुरूषांच्या पाच-सहा समाधी आहेत. दगडी बांधणीची लहान लहान मंदिरांसारखी समाधींची रचना आकर्षक आहे. इतर समाधी दगडी अन् नेहमीच्या समाधीसारखी आहेत.
गोसावीमठातील पद्मपुरीबाबा, केशरपुरीबाबा, रामपुरीबाबा गोसावी यांच्या समाधी असल्याचे अंबिका विनोद पुरी गोसावी सांगतात. येथून जवळच दत्त मंदिर, मारूती मंदिर आहे. दत्त मंदिरात पाषाणातील लहान मोठ्या मूर्ती व शिळा मंदिराच्या गाभाऱ्यात पहायला मिळतात. दत्त मंदिराअलीकडे लक्ष्मी नारायण मंदिर आहे. हे मंदिर बाळकृष्ण शिरवाडकर यांच्या वाड्यात आहे. मंदिराचे वैभव पाहण्यासारखे असून, मूळ मंदिर दगडी बांधणीचे आहे. तर मंदिरातील नारायणाची पाषाणातील मूर्ती मोहात पाडते. ही मूर्ती सुमारे आठशे वर्ष जुनी असल्याचे शिरवाडकर सांगतात. औरंगाबाद पुरातत्त्व विभागाने या मूर्तीला वज्रलेप करून ती संरक्षित केली आहे. या वाड्यात आजही शिरवाडकर कुटुंबीय राहतात. ब्रिटिशांनी शिरवाडकरांना अठराशेच्या सुमारास शिरवाडे गाव इनाम दिले होते. यात गावातील लक्ष्मी नारायण मंदिरही मिळाले. तेव्हापासून मंदिराला १२० रूपये वर्षासन दिले जाते. मंदिराचा पुढील लाकडी नक्षीकाम असलेला सभा मंडप ३५० वर्षे जुना आहे, असेही बाळकृष्ण शिरवाडकर सांगतात.
बाळकृष्ण शिरवाडकरांच्या वाड्यासमोरच कुसुमाग्रजांचा वाडा होता. त्या जागी आता एक इमारत उभी आहे. १९९१ मध्ये एकदा गावात आलेल्या कुसुमाग्रजांनी त्यावेळी गावात अंगणवाडी सुरू केली होती. ही अंगणवाडी नंतर बंद झाल्याची आठवण अंगणवाडी सांभाळणाऱ्या रत्नमाला गोरे व डॉ. सुधीर गोरे सांगतात. गावात कुसुमाग्रजांच्या अनेक वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो अन् कुसुमाग्रजांचा जीवनपटही उलगडतो. कुसुमाग्रज ऊर्फ तात्यासाहेब म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली पुण्यात झाला. मात्र नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव त्यांचे जन्मगाव म्हणूनच ओळखले जाते. दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर झाले. शिरवाडकर कुटुंबीय मूळचे पुण्यातील जोशी कुटुंब. जोशी कुटुंबीयांना शिरवाड हे गाव इंग्रजांकडून इनाम मिळाले होते. ते गावात आले तेव्हा त्यांना बावळे या आडनावाने ओळखले जायचे. आजही शिरवाडकरांना बावळे आडनावानेच गावात ओळखले जाते. जोशी आडनावाकडून बावळे आडनावाकडील प्रवास मात्र अज्ञात आहे. मात्र एखाद्या घटनेमुळे असे झाले असावे, असे बाळकृष्ण शिरवाडकर सांगतात. नंतर बावळे आडनावाऐवजी जोशी कुटुंबीयांनी शिरवाडेला राहत असल्याने शिरवाडकर असे आडनाव लावण्यास सुरूवात केली अन् मूळचे जोशी शिरवाडकर झाले.
१९२०-२१ च्या सुमारास कुसुमाग्रजांच्या शिरवाडकर घरात एक दुर्घटना घडली. कुसुमाग्रजांचे वडील रंगनाथ शिरवाडकर यांचे वामनराव शिरवाडकर भाऊबंद होते. वामनरावांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीने कुसुमाग्रजांच्या वडिलांना विनंती केली की ‘तुमचा मुलगा गजानन मला दत्तक द्या.’ कुसुमाग्रजांच्या वडिलांनी विनंती मान्य केली आणि दत्तक विधान झाले. बालपणी कुटुंबातील सगळे कुसुमाग्रजांना तात्या म्हणत. तात्या गजानन रंगनाथ शिरवाडकरांचे अशा पद्धतीने विष्णू वामन शिरवाडकर झाले. मात्र वामनरावांच्या पत्नीचेही निधन झाले अन् विष्णू पुन्हा मूळ कुटुंबात स्थिरावला. पिंपळगावच्या शाळेतून व नंतर नाशिकला न्यू इंग्लिश शाळेत कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण झाले, अशी आठवण कुसुमाग्रजांच्या बहीण कुसुमताई शिरवाडकर यांनी नोंदवून ठेवली आहे.
त्या आठवणींच्या कप्प्यात शिरवाडे गावाबाबत कुसुमताई सांगतात, ‘दोन-चार वाकड्यातिकड्या रेघा माराव्यात तसे दोन-चार रस्त्यांचे हे गाव आहे. गावच्या मध्यभागी नारायण मंदिर आहे आणि त्याच्या समोर एक पिंपळपार आहे. या गावात आमची बरीच जमीन होती आणि दोन चौकांचा व दोन मजल्यांचा वाडा होता. दूरच्या अंतरावरुन पाहिले म्हणजे हा वाडा या गावाचा टोप आहे असे वाटायचे. सर्वात मोठा आणि उंच! या वाड्यात आमच्या पूर्वीच्या अनेक पिढ्या राहिल्या.’ यावरून शिरवाडे गावातील कुसुमाग्रज कुटुंबीयांचे वैभव काय होते हे दिसते. हा वाडा आज नसला तरी ग्रामस्थ आवर्जून कुसुमाग्रजांच्या वाड्याबद्दल आठवणी सांगतात.
कुसुमाग्रजांचे आजोबा नागेश गणेश शिरवाडकर यांना दामोदर आणि रंगनाथ ही दोन मुले होती. तर रंगनाथ यांना सात मुले व एक मुलगी. पद्माकर, गजानन (म्हणजे कुसुमाग्रज), मनोहर, वसंत, मधुकर, अच्युत, कुसुम व धाकटा केशव. कुसुमाग्रजांचे वडील रंगनाथ पिंपळगाव बसवंत येथे वकिली करत. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी पिंपळगावात घर घेतले. हे घर आजही पिंपळगाव बसवंतमध्ये पहायला मिळते. मात्र आता शिरवाडेत कुसुमाग्रज कुटुंबीयांचे काहीच पहायला मिळत नाही.‘ज्ञानपीठ’ने सन्मानित कुसुमाग्रजांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभराला दिलेले साहित्य वैभव सर्वपरिचित आहे.
१९३० मध्ये रत्नाकर मासिकातील त्यांच्या कविता, १९३२ मधील काळाराम मंदिर सत्याग्रहातील त्यांचा सहभाग. कविताच नाही तर कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिताही केली. १९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव ठरले. 'मराठी माती', 'स्वागत','दूरचे दिवे', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके तर 'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृतीने आजही अख्खा महाराष्ट्र हरखून जातो. ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या कलाकृतींवर अन् महाराष्ट्राच्या साहित्य प्रतिभेवर मोरपंख फिरविले. शिरवाडेकरांनही ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल त्यांची गावातून बैलगाडीत मिरवणूक काढल्याची आठवण ग्रामस्थ सांगतात. मात्र शिरवाडकरांच्या जन्मगावात त्यांच्या साहित्याची ओळख करून देणारे साधे ग्रंथालयही नाही. गावात कुसुमाग्रजांच्या नावाने सुसज्ज ग्रंथालय अन् विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असावी असा प्रयत्नही कुसुमाग्रजांच्या नावाने मोठाल्या संस्था चालविणाऱ्यांनी केला नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल.
२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिवस आपण सन्मानाने ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करतो. मात्र त्यांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध असलेले शिरवाडे यापासून कोसो दूर असल्यासारखे वाटते. दहा वर्षांपूर्वी लाखो रूपये खर्च करून गावात कुसुमाग्रज स्मारकाची इमारत बांधण्यात आली मात्र ना ती इमारत खुली झाली नाही ना तेथे कुसुमाग्रजांचे स्मारक साकारले गेले. उभ्या राहिल्या त्या फक्त भिंती. या इमारतीची दूरवस्था पाहून साहित्यातील दैवत असलेल्या कुसुमाग्रजांना किती यातना होत असतील याची कल्पनाही न केलेली बरी. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी राज्य सरकार व अनेक संस्था संघटना पुढाकार घेत असताना शिरवाडे गावातील कुसुमाग्रजांच्या स्मारकाची अवस्था मन पिळकूटून टाकते.
‘भिंत खचली चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये, पाणी थोडे ठेवले.’ हेच शब्द येथे मार्मिक ठरतात. काहीही असो पण, कुसुमाग्रजांना गावाबद्दलचा ओढा त्यांच्या कवितांमधून डोकावतो. कुसुमाग्रज अभिमानाने गावाचं वर्णन 'मायदेशाचा वारा' या कवितेत करतात. कुसुमाग्रज म्हणतात, 'द्राक्षांचे बहरत बाग मनोहर जेथे त्या सुनित वेली रांग पऱ्यांची गमते कटि कंठा वरती...’ हा आपलेपणा कुसुमाग्रजांच्या गावाबद्दल आपल्याला वाटला तरी त्यांच्या लढ म्हणण्याला बळ मिळेल.
अंतिम सुधारित : 7/26/2023
एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार....