অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चंदेरी किल्ला

चंदेरी किल्ला हा २३०० फुट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. भरपूर प्रमाणत लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी व किल्ला पाहण्यासाठी येत असतात.

मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भला थोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो. त्याचे नाव चंदेरी. बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे.

नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

इतिहास

खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथे काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलिकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय. अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. शिवपिंड भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे. गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे ऑक्टोबर शेवटपर्यंतच त्यात पाणी असते. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे.

गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब, रबळची डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ. दिसतात. गडाच्या पायथ्याचा परीसर पावसाळ्यात फारच रमणीय व विलोभनीय असतो. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.

गडावर जाण्याच्या वाटा

मुंबई-कर्जत लोहमार्गवरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणाऱ्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कच्ची सडक) चिंचोली या पयथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वाहनेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एका लहानशा टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात.

गुहेत ६ ते १० जणांची राहण्याची सोय आहे. पाण्याची सोय ऑक्टोबर शेवटपर्यंत पावसावर अवलंबून असते. तसेच टाक्यांत पाणी असते. चिंचोली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. 

- भूषण दुनबळे,
(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.कॉम

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate