महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याचे ठाणे आणि भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १२,३७३ (१९७१). बालाघाट डोंगररांगेच्या ६०९ मी. उंचीच्या पठारावरील हे गाव सोलापूरच्या उत्तरेला ४५ किमी. व उस्मानाबादच्या दक्षिणेला २३ किमी. आहे. दक्षिणमध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकावर किंवा मिरज–लातूर अरुंदमापी रेल्वेच्या येडशी स्थानकावर उतरून पुढे मोटारीने येथे जाता येते. महाराष्ट्राच्या पुणे, मुंबई, सोलापूर, बार्शी, सातारा, फलटण, वाई, जळगाव, औरंगाबाद इ. ठिकाणांहून येथपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्या जा–ये करतात. गावात विशेषतः यात्रेच्या वेळी कापड, भांडी, अन्नधान्ये इत्यादींचा मोठा बाजार भरतो.
गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील तुळजाभवानी देवीचे मंदिर होय. तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे एक प्रमुख कुलदैवत आहे. तुळजापूरची गणना प्रमुख शक्तिपीठांत होते. भवानीचे मंदिर पठाराच्या पश्चिम उताराच्या मध्यावर आहे. त्याचा प्राकार मोठा असून आत कल्लोळ व गायमुख ही प्रमुख तीर्थे व इतर देवतांची काही मंदिरेही आहेत.
भवानीच्या दर्शनास व पूजेस भक्तांची सतत रीघ असते. विशेषतः मंगळवार, शुक्रवार, वैशाखी व कार्तिकी पौर्णिमा आणि त्यातही शारदीय नवरात्र व दसरा यावेळी भारताच्या दूरदूरच्या भागांतून भाविक लोक येतात. गावाला नगरपालिका असून पाण्याची व रस्त्यांची अधिक चांगली सोय करण्याचे प्रयत्न चालू आहेत. गावात शासकीय कार्यालये, दवाखाना, शाळा, चित्रपटगृह, इतर मंदिरे व पूजास्थाने आहेत.
श्रीराम लंकेस जाताना येथे आले होते व भवानीने त्यांना पुढील मार्ग दाखविला अशी दंतकथा आहे. विजापूरच्या अफझलखानाने येथील देवीची मूर्ती फोडल्यामुळे शिवाजी महाराजांनी नवीन मूर्ती करवून घेऊन स्थापिली आणि याच भवानी देवीने त्यांना भवानी तलवार दिली असे सांगतात. देवीच्या जामदारखान्यात शिवाजीचे नाव असलेले सोन्याचे दागिने आहेत.
पाठक, सु. पुं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020
त्र्यंबकेश्वर : नासिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्...
माहूर (माहोर) : पूर्वीचे मातापूर. नांदेड जिल्ह्याच...
द्वारका : गुजरात राज्याच्या जामनगर जिल्ह्यातील प्र...