অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाशिकचे प्रादेशिक वस्तूसंग्रहालय

नाशिकचे प्रादेशिक वस्तूसंग्रहालय

संग्रहालय म्हटलं की, ऐतिहासिक आठवणींचा अनमोल खजिना एका दालनात सजलेला पहायला मिळतो. हा खजिना त्या शहराची ओळखही असते. सार्वजनिक वाचनालयाचे संग्रहालय त्यापैकी एक. मात्र नाशिकचे प्रादेशिक वस्तूसंग्रहालयदेखील अनेक अनमोल अशा ठेव्याने सजलेले आहे.

स्थापना

पांडवलेणीच्या पायथ्याशी फाळके स्मारकातील हे संग्रहालय १९७५ मध्ये स्थापन झाले. येथील एक मोठ्या दालनात नाशिकचे प्रादेशिक म्हणजे नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाच शहरांसाठीचे हे वस्तूसंग्रहालय अनेक दुर्मिळ मूर्ती, कागदपत्रे, नाणी व शिल्पसौंदर्याने नटलेले आहे. संग्रहालयात छायाचित्रे व रंगचित्रे दालन, धातूशिल्प दालन, शस्त्रास्त्र दालन, पाषाणशिल्प दालन व नाणी विभाग अशी दालने आहेत. त्या-त्या शहरात पुरातत्त्व विभागाला मिळालेल्या वस्तू व शिल्पे या दालनाची शोभा वाढविताना दिसतात.

आकर्षण

मूर्तींमध्ये पाचव्या शतकातील गंधर्व मूर्ती या दालनाचे मुख्य आकर्षण आहे. तर अनेकांनी भेट म्हणून वस्तूसंग्रहालयाला दिलेल्या मूर्ती, वस्तू व शिल्प या दालनात ठेवलेल्या आहेत. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडून या दालनात अनेक दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रात्रे व चित्रांचा ठेवा मिळालेला आहे. तोही पाहणे एक वेगळा अनुभव ठरतो. धातूशिल्प दालनात इ.स. १७ वे शतक ते १९ व्या शतकातील अनेक धातूशिल्पे फोक ब्रॉन्झेस या प्रकारातील आहेत. याची कलाकुसर नजर हटवू देत नाही. शस्त्रास्त्र दालनात महाराष्ट्राचा इतिहास सळसळत्या तलवारीतून समोर येतो.

अनेक प्रकारची शस्त्रांबरोबरच शस्त्रांवर चितारलेल्या कलात्मक आकृत्या व नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. यात तलवारीवरील दशावतार पाहताना तर डोळ्याचे पारणे फिटते. तसेच काही शस्त्रांवर कुराणातील कल‌िमांची कॅलिग्राफी नजरेत भरते. शस्त्रास्त्रांना सजविण्यासाठी सोन्याचा कलात्मक वापरही पाहता येतो. पाषाणशिल्प दालनात मथुरा कलाशैली, गुप्त कलाशैली तसेच यादवकालीन कलाशैली पहायला मिळते, अशी माहिती प्रादेशिक वस्तूसंग्रहालय, नाशिक अभिरक्षक अमोल गोटे देतात.

हा सोहळा अनुभवण्यासाठी चिमुकल्यांनी सुटीत आणि विशेष करून गुरूवारी, १८ मे रोजी साजरा होत असलेल्या जागतिक संग्रहालय दिनानिमित्त नाशिकच्या प्रादेशिक वस्तूसंग्रहालयाला भेट द्यायलाच हवी. हे संग्रहालय सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत खुले असते. विशेष म्हणजे नागरिकही या संग्रहालयात वस्तू, दुर्मिळ कागदपत्रे भेट म्हणून देऊ शकतात. शेवटी आपल्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आपणच जपला पाहिजे.

लेखक : रमेश पडवळ

contact no : 8380098107

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate