অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंधुदुर्ग जिल्हा - समुद्र किनारा

महाराष्ट्र हे जसे शिवरायांच्या जन्म आणि कर्मभूमीचे स्थान आहे. तसेच प्राचीन इतिहास, शिल्प, मंदिरे, किल्ले, समुद्र किनारे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला असा हा प्रदेश आहे. महाराष्ट्रात अनेक महान व्यक्तींची जन्मभूमी आहे. समाजक्रांतीबरोबरच राजकारणाचे, स्वातंत्र्याचे प्रेरणास्थानही महाराष्ट्र आहे. आजही हा महाराष्ट्र इतिहासाची शानदार परंपरा घेवून ताठ मानेने उभा आहे. त्याचे सौंदर्य जाणून घेण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात.

अजिंठा-वेरुळ असो की कोकणचा 720 कि.मी.चा डोळ्यांचे पारणे फेडणारा विशाल समुद्र किनारा असो पर्यटन प्रेमींना महाराष्ट्र नेहमीच खुणावित आला आहे. बीबी का मकबरा, शिवरायांचा रायगड, अष्टविनायकांची तीर्थस्थळे, तुळजापूरच्या भवानीमातेचे मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी, मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम अशी कितीतरी प्रेक्षणीय स्थळे, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, मुंबईचे नॅशनल पार्क, थंड हवेचे महाबळेश्वर सारखी ठिकाणे, अनेक मोठी धरणे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (बोरीबंदर) यासारख्या वास्तुसौंदर्याने नटलेल्या भव्य इमारती हे महाराष्ट्राचे वैभव आहे.

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सौंदर्याबरोबर इथली रांगडी मराठमोळी संस्कृती, पुरणपोळीसारखे खाद्यपदार्थ, लावणी व तमाशा सारखी लोक संस्कृती, गणेशोत्सव हेही महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवलेली रत्ने आहेत. महाराष्ट्र खरे तर पर्यटनासाठी पर्वणीच आहे. पर्यटनामुळे माणूस विविध अंगानी समृद्ध होतो. त्याचा बघण्याचा दृष्टीकोन वृंदावतो, त्यांची समृद्धी वाढते आणि माणसाचे माणुसकीचे नाते अधिक घट होते. त्याचबरोबर पर्यटनामुळे पर्यटनस्थळ परिसरातील क्षेत्राच्या विकासाला आणि तेथील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम पर्यटनामुळे होते.

आपल्याला हे पर्यटन करणे सुलभ व्हावे यासाठी या विविधांगी सौंदर्यस्थळांना भेटी देण्यासाठी तिथे कसे पोहोचावे, तेथील राहण्याची व्यवस्था आदी माहिती लोकांना मिळावी व पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आम्ही महाराष्ट्र पर्यटन लेख मालिका 'महाभ्रमंती' या नावानं सुरु केली आहे. आम्हाला खात्री आहे, महाराष्ट्राबाहेरील पर्यटकांना, देशी-विदेशी नागरिकांना तसेच महाराष्ट्रातील सामान्य माणसालाही आपल्या पर्यटनस्थळांची माहिती होईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

पहिल्यांदाच राज्याचा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्यार्तील पर्यटन स्थळांविषयी संक्षिप्त माहिती घेऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गरम्य असा समुद्र किनारा लाभला आहे. या जिल्ह्यात सावंतवाडी हे हस्तकला, खेळणी आदी कलाकुसरीच्या वस्तुसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. याठिकाणी आपण शिल्पग्राम गावाला भेट देऊ शकतो आणि अनेक कलाकृती खरेदी करुन आपण कलाकारांना उत्तम दाद देऊ शकतो.

मालवण शहर

मालवण शहर एकेकाळी समुद्र व्यापारासाठी प्रसिद्ध होते. मिठागर पट्टयासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. नारळ पोफळीच्या झाडांनी या शहराच्या सौंदर्यात भर टाकली आहे. याठिकाणी आपण उत्तम मालवणी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. रॉक गार्डन हे एक पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे.

तारकर्ली बीच

तारकली बीच म्हणजे शांत आणि निर्मळ वातावरण असलेला समुद्र किनारा आहे. येथे मनसोक्त फेरफटका मारला तरी मनाला वेगळा आनंद मिळतो. याठिकाणी आपण कर्ली नदी समुद्राला मिळते ते ठिकाण पाहू शकतो.

बॅकवॉटरमध्ये बोटींग करु शकतो. पुढे बोटीने गेल्यास आपणास समुद्रात स्वच्छंदपणे समुद्राच्या पाण्यातून उडी मारणारे डॉल्फिन मासे पाहण्याचा एक अवर्णनीय क्षण अनुभवता येतो. हाऊस बोट हे येथील खास आकर्षण आहे. देवबाग बीच, निवती बीच, धमणपूर लेक या स्थळांना भेट देता येईल.

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा मानाचा बिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली समुद्रात बांधलेला हा किल्ला म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरुन बोटीने जावे लागते.

येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे उमटविलेले आहेत. त्यांचे मंदिर असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती आहे. अशी मुर्ती फक्त येथेच पाहायला मिळते. किल्ल्यावरुन या परिसरातील समुद्र किनाऱ्यावरील विलोभनीय दृश्य पाहून मन उल्हासित होते. येथे स्कूबा डायव्हिंग करण्याची सोय आहे.

रेडी गणेश मंदिर

विजयदुर्ग, भुवनेश्वर मंदिर तसेच आंगणेवाडी येथे भराडी देवी मंदिर आहे.

अंबोली

हे सावंतवाडीतील हिल स्टेशन आहे. याला कोकणातील महाबळेश्वर म्हटले जाते.सिंधुदुर्ग या पर्यटन स्थळाला जाण्यासाठी रेल्वेने जाता येते. कुडाळ, सिंधुदुर्ग ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. एस.टी. बसची सोय आहे. येथे एमटीडीसीचे तारकर्ली येथे रिसॉर्ट आहे. खाजगी हॉटेल तसेच घरगुती पद्धतीने राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी एमटीडीसीच्या www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटला भेट द्या किंवा मुंबईतील मुख्य ऑफिसला संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्र. 022-22044040, 022-22845678 टोल फ्री क्रमांक 1800229930.

 

संकलन- विष्णू काकडे माहिती

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate