অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठवाडा पर्यटनातून अनुभवा संत परंपरा, ऐतिहासिक वास्तु आणि भौगोलिक विविधता!

मराठवाडा पर्यटनातून अनुभवा संत परंपरा, ऐतिहासिक वास्तु आणि भौगोलिक विविधता!

प्रभावती नगरी अर्थात परभणी जिल्हा म्हणजे संत परंपरा, पौराणिक देऊळे आणि गोदावारीच्या तिरावरचा निसर्गरम्य परिसर या अनोख्या भ्रमंतीची परवणीच! शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे. तर संत नामदेव महाराज (नर्सी) आणि संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील! येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ आहे. शेतीविषयी निरनिराळी संशोधने व प्रयोग येथे केले जातात. १८ मे १९७२ रोजी या कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. येथे आकाशवाणी केंद्र आहे. दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र आहे. दूध डेअरी, सूतगिरणी, तेल गिरणी आहे. सय्यद शहा तुराबुल हक्क हा दर्गा असून त्याचा उरूसही येथे मोठ्या उत्साहात भरतो. त्याचबरोबर खंडोबाची यात्राही येथे भरते. येथील पारदेश्वर मंदिर भव्य व प्रेक्षणीय आहे. शुभ्र अशा पाऱ्यापासून निर्मीत शिवलिंग दर्शनासाठी भाविक पारदेश्वराला मोठ्या भक्तिभावाने भेट देतात! महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजनासाठी अगदी प्रातःकालापासूनच भक्त मोठ्या संखेने उपस्थित असतात.

श्रीक्षेत्र त्रिधारा

परभणीहून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेले त्रिधारा हे एक निसर्गरम्य क्षेत्र असून येथील गोदावरी, नर्मदा आणि पूर्णा या तीन नद्यांच्या संगमामुळे या ठिकाणास त्रिधारा हे नाव पडले आहे. खडकांमधून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट, रंगीबेरंगी वैविध्यपूर्ण पक्षांचा किलबिलाट आणि हिरव्या गर्द झाडीतून दिनकराचा उदयास्त परभणीची सहल अधिक विहंगम करते!

नवागड

त्रिधारेपासून उखळदकडे जातानाचे जैन अतिशयक्षेत्र नवागड तेथील निसर्गरम्य परिसर आणि भव्य, शांत आणि निरामय मंदिरासाठी ओळखले जाते. येथील विद्यार्थ्यांकरिता गुरुकुल शिक्षण व्यवस्था लाभलेली आचार्य आर्यनंदी शिक्षण संस्था सुसंस्कारित शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

गंगाखेड

दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवाची परमभक्त ही गंगाखेडची समाजातील दमा व करुंड या विठ्ठल भक्त दाम्प्त्याचे नवसाचे अपत्य. तिने नामदेवाविषयीचा आदरभाव, दयावान विठ्ठलाला आहावन, ज्ञानदेवाची पुजा, चोखामेळाविषयी भाव अभंगातून व्यक्त केला आहे.

वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना हे सारे काही संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येते. गंगाखेड येथे संत जनाबाई यांची समाधी आहे.

जिंतुर

प्राचिन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर. जैनपूर नावाप्रमाणेच जवळच गुहांमध्ये कोरलेल्या जैनशिल्पांमुळे जिंतुर विशेष प्रसिद्धीस आले आहे. नेमगिरी म्हणून ओळखले जाणाऱ्या या क्षेत्री शहरालगतच्या डोंगरात एकूण सहा लेण्या आहेत. त्या प्रामुख्याने अदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शकुट व बाहुबली अशा आहेत. घुमटाची बांधणी चार स्तंभांच्या सहाय्याने केली आहे. हे मंदिर विशेत्वाने ख्यातनाम आहे ते तेथील भगवान पार्श्वनाथांच्या अधांतरी मूर्तिमुळे! जैनांच्या या पवित्र स्थळी भाविक मनोमन विसावतो. जिंतुरापासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे.

सेलू

वाल्मिकी ऋषींच्या पदास्पर्शाने पावन झालेल्या वालूर अर्थात सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. त्यामुळे या ठिकाणास विशेष महत्त्व लाभले आहे.

पूर्णा

पूर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा ह्या नगरामधील रेल्वेस्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून एक फाटा अकोल्याकडे धावतो व हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला जुळतो. पूर्णा जंक्शनला गाडी थांबली की दाळ वडा आणि सोबत खमंग कढीचा घमघमाट तोंडाला पाणी सोडतो.

पोखर्णी

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह हे एक जागृत, जाज्वल्य असे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. श्री नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र हे अल्प अवधित प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र शासन मार्फत ‘तीर्थक्षेत्र ब’ दर्जा तसेच धार्मिक पर्यटक ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. विकासात व प्रगतीमध्ये नेहमी अग्रेसर असलेले पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेले पर्यटनस्थळ म्हणून उदयाला आले आहे. मंदिर प्रशासनातर्फे अनेक विकासयेजना व धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम राबविले जातात. भक्त व पर्यटक धकाधकीच्या जीवनातील सर्व कामे विसरून श्रीच्या चरणी दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंद घेतात. मंदिरासमोर आल्यावर लगेच प्रशस्त असे मुख्य पूर्व प्रवेशद्वार मन मोहून घेते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप भक्तांच्या नजरेत भरतो. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर पूर्वमुखी असलेल्या आणखी एका प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. मुख्य मंदिर हेमाडपंथी असून श्रीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी २x३ फुट इतके छोटेसे प्रवेशद्वार आहे. या द्वारामधून एकावेळी एकाच व्यक्तीला खाली बसून प्रवेश करावा लागतो. आतील गाभारा हेमाडपंथी शिलेवर बांधकाम केलेला आहे. या गाभाऱ्यात एका वेळेस केवळ १०-१२ व्यक्तीचे दर्शन घेऊ शकतात.

श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह मंदिर गाभाऱ्यात श्रीची रोद्ररूप धारण केलेली वालुकाष्म पाषाणाची असून सुमारे ४ फुट इंचीची मूर्ती आहे. मुर्ती चतुर्भूज असून एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असून उर्वरित दोन्ही हातांनी हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करतानाचे आहे. ही मुर्ती स्वर्णालंकृत व रत्नजडीत असून वस्त्र परिधान केलेली आहे. श्रीच्या गाभाऱ्यासमोर श्रीचे शयनकक्ष आहे. शयनकक्षात पुरातन लाकडी दिवाण असून त्यावर रेशमी वस्त्राची बिछायत आहे. त्यावर श्री लक्ष्मी नृसिंहाची प्रतिमा आहे तसेच मोरपीसांनी सुशोभित केलेले आहे.

गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर अगदी समोर श्री महादेवतेचे मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारी महादेवाची शिवपींड आहे. तसेच तीन फुट उंचीची संगमरवर श्री गणेशाची मुर्ती आहे.मंदिराच्या सभामंडपात असलेला घंटा वाजवण्याचा मोह भक्तांना आवरणे कठीणच जाते. हा घंटा मांगल्याचे प्रतिक असून घंटानाद दूरवर पसरतो. पहाटे मंदिर उघडल्यावर अभिषेकापूर्वी व रात्रीच्या आरतीपूर्वी घंटानाद केला जातो. मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारा जवळ श्री गणेशाचे एक छोटे मंदिर आहे. त्यात गणेश वालुकाष्म मुर्ती आहे तसेच पाषाणाच्या गजलक्ष्मी, बालाजी व इतर देवतांच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर पवित्र असे तीर्थकुंड आहे. या तीर्थाच्या पाण्याने श्री चा अभिषेक केला जातो. या तीर्थामध्ये काही पायऱ्या उतरल्यावर मध्ये मोठ्या देवळीच्या रुपात दोन्ही बाजूला दोन मंदिरे आहेत.

पाथरी-

पाच पांडवांपैकी पार्थ अर्थात अर्जुनाने वसविलेले पार्थपूर म्हणजेच सद्यस्थित पाथरी. जगविख्यात शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. पाथरी तालुक्यातील गोदावरीच्या तिरावर वसलेले मुद्गलेश्वर हे ऐतिहासिक मंदिर फार रमणीय आहे. पुरातन काळी हे मंदिर 'देवभूमी' म्हणून ओळखले जायचे. मंदिर परिसरात एकूण तीन देऊळ आहेत ज्यापैकी नदीतिरावरील एक मंदिर शिवाचे आहे. नदीपात्रात भगवान नरसिंह (मुद्गलेश्वर) आणि मुद्गल गणेशाचे मंदिर आहे. राज्याची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदा नदीच्या पाण्यात भाविक पवित्र स्नान करून मंदिरांचे दर्शन घेतात. दरवर्षी महाशिवरात्रीला भक्त येथे मोठ्या संख्येने येतात. टाळ आणि मृदुंगाच्या संगीतमय आरतीने परिसर अधिक मनोरम होतो.

लेखिका: तृप्ती अशोक काळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate