অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुंबईतील सर्वोच्च ट्रेकिंग पाँईट : जांभूळमाळ कडा

मुंबईतील सर्वोच्च ट्रेकिंग पाँईट : जांभूळमाळ कडा

पावसाळा सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते निर्सर्गाच्या सान्निध्यात जाण्याचे. पण मुंबईसारख्या सिंमेटकाँक्रिटच्या जंगलात मुंबईकरांना निसर्गाचा आंनद लुटायचा असल्यास किंवा ट्रेकिंगसाठी जायचं म्हटलं तर मुंबईकरांची पावले ही दूर मुंबईबाहेर पडतात. कोकणात, निसर्गरम्य ठिकाणी, रानावनात गावाकडे जाणे पसंत करतात. पण मुंबईतच राहून निसर्गाचा आनंद घेता येऊ शकतो हे अनेकांना माहीत नसल्याने ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी स्थिती पहायला मिळते. मुंबईत पर्यटनाची स्थळे म्हटली तर आपल्या डोळ्यासमोर चौपाटी, गेट ऑॅफ इंडिया, राणीची बाग, नॅशनल पार्क अशी ठिकाणं येतात. पण या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी पहायला मिळते. मात्र, ट्रेकिंग करायचं म्हटलं तर मुंबईकर कोकण, गडकिल्ले, कर्जत कसारा आणि नाशिक येथे जाण्यास प्राधान्य देतात. पण मुंबईकरांना आपल्या मुंबईतही निसर्गाचा आंनद अनुभवता येईल.

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे फुप्फुस आहे, असे म्हटले जाते. 104 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तृत असलेल्या या उद्यानात विविध प्रकारची झाडे, प्राणी-पक्षी पहायला मिळतात. आपण सर्वसामान्य मुंबईकरांस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण एक छोटसं प्राणी-पक्षी अभयारण्य आणि कान्हेरी गुंफा इतकेच माहिती आहे. पण या उद्यानाच्या मुख्य भागातून समुद्र सपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर ट्रेकिंग पॉंईट आहे आणि या पॉईटला ‘जांभूळमळा कडा’ असे संबोधले जाते. जांभूळमाळ हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 468 मीटर उंच असून मुंबईतील सर्वोच्च बिंदू मानला जातो.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसजीएनपी) भारतातील व्यावसायिक राजधानीच्या उत्तर उपनगरातील मुंबईतील सर्वात उंच शिखरावर असलेले जांभूळमाळ हे अनेक गोष्टींमध्ये अद्वितीय आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कोर क्षेत्र घनदाट जंगलाने भरलेले, कान्हेरी गुंफाच्या प्रवेशद्वारापासून 2.5 किमी अंतरावर आहे. हे ठिकाण नवोदित ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमीसाठी आदर्श आहे. याचबरोबर जंगलातून जात असताना अनेक विविध प्रकारची झाडे, सुंदर फुले आणि जंगली फळे पाहायला मिळतात. जांभूळमाळ कड्याला जाण्यासाठी जंगलात वाहणाऱ्या नद्या, धबधबा आणि कडेकपाड्यातून रस्ता काढत जावे लागते. निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज, रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून मनाला समाधान मिळते. जंगलातून जात असताना कधी न पाहिलेले कधी न ऐकलेले बहुमोल आणि गुणकारी वनस्पती आणि निसर्गाशी ओळख होते. तसेच मान्सून ऋतुमान असल्याने तेथील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध अगदी निसर्गरम्य असते. म्हणजेच एखादा पर्यटक तेथे गेला तर तो तेथील वातावरणात स्वत:ला हरवून जातो. याचबरोबर तेथे मान्सून फ्लोरा, छोटे किटक, सर्व जातीचे पशूपक्षी बघायला मिळतात.

‘जांभूळमाळ कडा’ हे मुंबईचे सर्वात उंच टोक असून या टोकावरुन संपूर्ण मुंबई दिसते. हे उद्यान पश्चिमेला मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, दहीसर पर्यंत पसरलेले आहे. तर पूर्वेस भांडूप, मुलूंड तसेच दक्षिणेस आरे कॉलनी आहे. जांभूळमाळ सारखे असे एक उंच ठिकाण येथून मुंबईचे असे रुप जिथे दूरदूरवर पसरलेली गर्द वनराई आणि कमीत कमी पसरलेले सिमेंटचे जंगल यांचबरोबर शहराला पाणी पुरवठा करणारे विहार, तुलसी आणि पवई तलाव असे मुंबईचे मोहक दृश्य मनात भरेल असे पहावयास मिळते. मग अशा या मुंबईतील हिरवळीचा आनंद घेणे म्हणजे सुखद अनुभव आहे.

लेखिका: रेश्मा वाघ

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate