অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसंस्कृतीने भारलेलं शिंदे-हट्टी

लोकसंस्कृतीने भारलेलं शिंदे-हट्टी

वेशीवरच्या पाऊलखुणा :लोकसंस्कृतीने भारलेलं शिंदे-हट्टी

माणसाचं सणांशी जुळलेलं नातं निसर्गाशी निर्माण झालेल्या ऋणानुबंधातून जन्मलं. याची प्रच‌िती आजही अंगणात नांदताना दिसणाऱ्या पुरातन संस्कृती अन् प्रथा-परंपरातून दिसते. माणसाचे मुखवटे बदलले तसे काळानुरूप रूढी परंपरामध्येही बदल झाले. मात्र, त्यावरही मात करीत अनेक प्रथा-परंपरांची निरपेक्ष मूळ भावना आजही जशीच्या तशी प्रतिबिंब रूपाने ग्रामीण लोकजीवनावर उमटलेली दिसते. तिच्या पाऊलखुणा पुसट होत आहेत. असे असताना पेठ तालुक्यातील शिंदे-हट्टी गावाने आदिवासी लोकसंस्कृतीतील महत्त्वाची तारपा ही वाद्य कला उराशी कवटाळून ठेवली आहे. अनेक प्रथा काळाच्या ओघात मागे पडल्या असल्या तरी येथील मंडळी अजूनही हट्टी मनाने त्या आठवणींनी भारावलेले दिसतात.

आदिवासींच्या सण-उत्सवात मंगलस्वराशिवाय अन् समूह नृत्याशिवाय रंग भरले असे म्हणता येत नाही. मंगलस्वर भरायला आदिवासी वाद्यातील सुषिर, तंतुवाद्ये, अवनद्ध अन्‌ घनवाद्य या चार प्रकारच्या वाद्यांचा समावेश असतो. यात आदिवासींना ठेका धरायला लावणारी तारपा, डाका, पावरी अन्‌ बिरी चिरी ही वाद्ये महत्त्वाची मानली जातात. त्यातल्या त्यात तारपाच्या ठेक्यावर धुंद होऊन तारपा नृत्य करण्याची परंपरा अजूनही पाड्यांवर काही प्रमाणात टिकून आहे. तारपा वाद्य वाजवायला कोणताही आनंदाचा क्षण पुरेसा असतो अन् छातीभरून वारू त्या तारपात भरणारा वादक असला म्हणजे तारपा मोरपिसाच्या साक्षीनं स्वत:भवतीच फेर धरायला लागतो. मग डोंगरमाळावरील जम‌िनीवरील बहरलेली लागवड असो वा भरभरून पावसाने केलेले आगमन असो.

आदिवासीच्या कष्टाचे चीज करणाऱ्या शेतात तरारलेला भात असो वा नागलीचं पीक असो. हे पीक तरारून आलं की, तारपाचा स्वर मन झिंगायला लावतो. देवपूजा, हनुमान जयंती, होळी, लग्न सोहळा, नवीन पाहुण्याचं आगमन या आनंदाच्या क्षणालाही गावातील तारपा वादकाला बोलावून हमखास मंगलस्वर गावभर पोहचविला जातो अन् तारपा वाद्याच्या स्वरांना तारपा नृत्याची साथ न मिळाली तर नवलच. होळीच्या सणाला तर चंद्र दिसल्यावर सुरू होणारा तारपा पहाटेपर्यंत बेधुंद होऊन आदिवासींना ताल धरायला लावतो अन् त्याचे स्वर व नृत्य वैभव डोळ्यांचे पारणे फेडतात. मात्र तारपा वाजविणाऱ्यांची आजची ही शेवटची पिढी जणू शिंदे हट्टी गावाने जपली आहे. यापुढे तारपा जिंवत ठेवायचा असेल तर हे वाद्य बनविण्यापासून ते वाजविण्यापर्यंतचे कौशल्य नव्या पिढीने आत्मसात करायला हवे.

नाशिक-पेठ रस्त्यावर ४० किलोमीटरवर करंजाळी हे गाव लागते. या गावातून डावीकडे निरगुडे गावाकडे जाणारा रस्ता पुढे सात किलोमीटरवर आपल्याला शिंदे हट्टी गावाकडे घेऊन जातो. रस्त्याच्या डाव्या हाताला हनुमानाचे लहानसे मंदिर दिसले की, थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला हट्टी हा दहा-बारा घरांचा पाडा लागतो. उजव्या हाताला हट्टी तर डाव्या हाताला शिंदे गावाकडे घेऊन जाणारा ओबडधोबड रस्ता व त्या रस्त्यावर तीर्थक्षेत्र शिंदे-हट्टी अशी पाटी दिसते अन्‌ मुख्य रस्ता पुढे कोहोर या गावाकडे जातो. शिंदे गावाकडे निघाल्यावर रस्त्यात आणखी एक हनुमान मंदिर दिसते. पूर्वी या जागी दगडाचे मोठे महादेव मंदिर असावे. मात्र आता त्याचे काही अवशेष दिसतात. मंदिराचा मोठा पाटावर दगडावर कोरलेली हनुमानाची प्रतिमा पहायला मिळते. चैत्रेला येथे मारूतीचा उत्सव भरतो. मंदिरालगत गोमुख व लहानसे कुंड आहे. बाराही महिने येथे स्वच्छ पाणी असते. या कुंडाजवळून दमणगंगा नदी वाहते. या नदीच्या सहवासामुळे परिसराला सुपीकता लाभलेली आहे.

शिंदे-हट्टी हे दमणगंगेचा उगम असल्याचे येथील आदिवासी ग्रामस्थ मानतात; मात्र दमणगंगेचा उगम अंबेगण या गावातून होतो. दमणगंगा ओलांडून डोंगरांच्या कुशीत विसावलेले शिंदे गावात शिरताना एका मधुर वाद्याचा आवाज एखाद्या भुकेल्या माणसाला खाद्यपदार्थाकडे जसा खेचतो तसा तो आपल्याला पाड्यावरील एका कोपऱ्यातील लहानशा कौलारू घराकडे घेऊन जातो. सत्तरी ओलांडलेला देह, अंगावर जीर्ण कपडे अन्‌ तरीही मनमोहून टाकणारे तारपा वाद्याचे स्वर एका कलाकाराच्या आयुष्याचा प्रवास सांगू लागतात. प्रसिद्ध तारपा वादक हरी दत्ता चारस्कर याच गावचे. चारस्करांनी भारतातील सर्व महोत्सवांमध्ये तारपा ही आदिवासी वाद्य कला आतापर्यंत असंख्यवेळा सादर केली आहे. तारपा वाजविणे हीच आमच्या अनेक पिढ्यांची कुळकथा आहे, असे ते आवर्जून सांगतात. मात्र यापुढील पिढी हे करेल असे नाही, हेही ते खिन्न होऊन सांगतात. प्रमाणपत्रांचा ढिग अन्‌ अनेक राज्यांमध्ये तारपा सादर केल्याची यादी दूरदर्शनवरही तारपा सादर केल्याच्या आनंदापाशी येऊन थांबते अन्‌ सुरू होतो तारपा म्हणजे काय हा प्रवास.

वारली समाजातील तारपा एक खास वाद्य आहे. सुकलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार केले जाते. एक मोठा वाळलेला इंग्रजीतील जे आकाराचा भोपळा तारपा वाद्य बनविण्यासाठी निवडला जातो. कोरून-कोरून तो भोपळा पोकळ केला जातो. त्याला योग्य ठिकाणी छिद्र पाडले जाते अन् मोरपीस व मोरपीसाच्या पांढऱ्या रंगाच्या काड्यांच्या घुंगरांनी तारपा वाद्य सजविले जाते. ज्याचे आपल्या श्वासावर उत्तम नियंत्रण आहे तीच व्यक्ती तारपा वाजवू शकते. कारण तारपा वाजवायला दमश्वास टिकवून ठेवण्याची हातोटी लागते. रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर होणारे तारपा नृत्य आदिवासी संस्कृतीतून ‘आवाज वाढव डीजे’च्या शिरकाव्याने हा नृत्य अन् वाद्य प्रकार हद्दपार होण्याची भीती चारस्कर व्यक्त करतात. गावात डाका नावाचे वाद्य यादव बुधा चारस्कर हे वाजवितात.

शिंदे-हट्टी गावची गावदेवीही प्रसिद्ध आहे. दगडगोटे ठेवल्या देवीला शेंदूर लावलेला असतो. यालाच आदिवासी बांधव गावदेवी म्हणतात, असे हिरामण पवार सांगतात. गावात कोकणा, महादेव कोळी, ढोरकुळे, वारली आदिवासी गुण्यागोंविदाने राहतात. मात्र दारूचा उत्सवांमध्ये वाढलेल्या दारूच्या प्रभावामुळे वाद वाढल्याने बोहाड्यांची परंपरा दहा-बारा वर्षांपासून बंद पडली आहे. गावातील एक एक प्रथा परंपरा काळाआड जात असल्याचे दु:ख येथील आदिवासी बांधवांच्या डोळ्यात गहिवरलेले दिसते. मात्र उत्सवात आता तमाशा थाटामाटात होतो, असे निवृत्ती मल्हारी गवळी सांगतात. आदिवासींमधील सहा दिवस चालणाऱ्या लग्न सोहळ्याच्या आठवणीही आदिवासी बांधव हिरीरीने सांगतात. मात्र हा सोहळाही आता एक किंवा अगदी अर्ध्या दिवसावर आला आहे. पूर्वी आदिवासींमधील दफन पद्धतीही आता बदलली असून, आदिवासींनी आता दहन करण्याची पद्धती स्वीकारली आहे. पूर्वी मृतदेह दफन करण्यासाठी ती जागा विकत घेतली जायची, अशी आठवणही सुधाकर चारस्कर सांगतात. लोप पावत असलेल्या प्रथांच्या वेदनेचे दु:ख तर त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतेच; मात्र त्या आठवणी अजूनही आम्ही मनात जपल्या आहेत. हा हट्टीपणाही त्यांच्या भरलेल्या डोळ्यात पहायला मिळतो. निसर्गसंपन्न शिंदे-हट्टी मोहात न पाडेल तर नवलच!

शिंदे-हट्टी सोडून पुढे पाच किलोमीटरवर कोहोर नावाचे गाव आहे. येथे कोहरे आडनावाचे लोक राहत असल्याने गावाला कोहोर हे नाव पडले असावे, असे विठ्ठल शिंदे सांगतात. गावात चैत्रीला भैरवनाथाचा उत्सव भरतो. पूर्वी भैरवनाथाच्या मूर्तीला लाकडाच्या मखरीत ठेवण्याची अन् मिरविण्याची परंपरा होती. मात्र आता भैरवनाथाचे दगडाचे मंदिर पाडून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. भैरवनाथाचा लाकडी देव्हारा हनुमान मंदिरात ठेवलेला पहायला मिळतो. येथेही दहा वर्षांपासून बोहाडे बंद झाले आहेत. गावात तुलसीराम यादव व सीताराम पडेर, सुकटे पडेर हे तीन कलाकार अजूनही डाका हे आदिवासी वाद्य वाजवितात. गावाबाहेर एक सुंदर तलाव आहे अन्‌ तलावालगत महादेवाचे मंदिर आहे. पूर्वीचे दगडाचे मंदिर पाडून मंदिराचा जीर्णाद्धार करण्यात आला आहे. मात्र पूर्वीचे अवशेष अजूनही मंदिराचा प्राचीन इतिहास सांगतात. कोहोरहून पुन्हा करंजाळीकडे जाताना आड नावाचे गाव लागते. गावातील लिंगवणे नदी लागते. या नदीचा उगम पिंपरस या गावातून होतो, असे आड गावचे ग्रामस्थ लक्ष्मण महाले सांगतात. शिंदे-हट्टी, कोहोर ही गावे अनुभवताना आदिवासी लोककला अन्‌ संस्कृती दरदरून अंगांत भिणते.

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate