অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक परिवर्तनाची साक्षीदार असलेली लळींगची ऐतिहासिक भूमी

सामाजिक परिवर्तनाची साक्षीदार असलेली लळींगची ऐतिहासिक भूमी

महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यामध्ये खान्देशातील फारुकी घराणे एक मोठे घराणे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले. या घराण्याची काही काळ राजधानी असलेला दुर्ग लळींगची इतिहासात नोंद आहे. धुळ्याहून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला. या पायथ्याशी लळींग नावाचे छोटेसे गाव आहे. निसर्गसंपदेने नटलेल्या ह्या गावाला एकदिवसीय पर्यटनस्थळ म्हणून अनेक पर्यटक पसंती देतात. स्वातंत्रपूर्वी काळात जुलमी ब्रिटीश राजवटीला विरोध करत किल्ले लळींग येथे 1930 मध्ये महात्मा गांधीनी दाखविलेल्या अहिंसक मार्गाने झालेला जंगल सत्याग्रह सर्वज्ञात आहे. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शांनी देखीलही भूमी पावन झाली आहे.


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वातून समाजासमोर एक आदर्श मापदंड ठेवला आहे. जो पुढील पिढ्यांसाठी नेहमीच पथदर्शक ठरणारा आहे. त्याच्या आदर्शवादी विचारांची स्मृती कायम रहावी म्हणून येथे 1992 पासून भीमस्मृती यात्रा दरवर्षी नियमित भरविली जाते. या यात्रेत संपूर्ण भारतातून असंख्य दलित, आदिवासी बांधवासह आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक आणि इतरही लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

सन 1937 मध्ये पोळा सणात कोणाचे बैल पुढे असावेत यावरून शिरपूर न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यामध्ये धुळे जिल्हा न्यायालयातील तत्कालिन वकील ॲड.पी.ए.तवर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना युक्तीवादासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यात दाखल झाले. त्यांच्या येण्यामागे सर्वाधिक महत्त्व होतं ते त्यांच्या खंबीर कार्यकर्त्याच्या अनोख्या तेवढ्याच कठोर प्रतिज्ञेचे. पुनाजी लिंगाची साबरे अर्थात अण्णा लळींगकर या डॉ.आंबेडकरांच्या खंद्या समर्थकाने घेतलेल्या कठोर प्रतिज्ञेची पुर्ती करण्यासाठी तसेच या समर्थकाचा हट्ट पुरविण्यासाठीच डॉ.आंबेडकरांना किल्ले लळींगच्या भूमीत यावे लागले. पुनाजी अण्णा यांचे आडनाव जरी साबरे असे होते परंतु माझ्या जन्मभूमीचा कर्मभूमीचा उल्लेख व्हावा किंबुहना त्यातूनच स्वत:च्या गावाचा नावलौकीक व्हावा, आगळंवेगळ प्रेम त्यांनी त्यातून व्यक्त केलं अशी माहिती गावातील जुन्या जाणत्या लोकांकडून आजही ऐकायला मिळते.

डॉ.आबेडकरांच्या या निस्सीम सैनिकाचा पेहराव देखील तितकाच रुबाबदार व देखणा होता. निळा नेहरु शर्ट, निळा पायजामा, खांदावर घोंगडी असा त्यांचा पोषाख होता. आपलं सारं आयुष्य डॉ.बाबासाहेबांच्या चरणी वाहणारे विशाल खान्देशाचा दलित चळवळीचे तसेच बाबांचे खरे अनुयायी म्हणून ओळख निर्माण केलेल्या पुनाजी अण्णा लळींगकर यांना डॉ.आंबेडकरांचे अंगरक्षक, खान्देशाचा कणखर आवाज, खान्देशाचा ढाण्या वाघ अशी विविध बिरूदावली लावल्या जात होत्या. जो पर्यत माझा भीम भगवंत माझ्या गावात येत नाही, तोपर्यंत मी दाढीचे केस काढणार नाही अशी कठोर प्रतिज्ञा पुनाजी अण्णा यांनी घेतल्यामुळेच शेवटी डॉ.आंबेडकरांनी आपल्या या सच्च्या अनुयायी च्या हट्टासाठी व त्याच्या कठोर प्रतिज्ञेला पूर्ण करण्यासाठी लळींग भूमीत येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पदस्पर्शाने या ऐतिहासीक भूमीला आता अजून एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिरपूर येथील आपले न्यायालयीन कामकाज पूर्णकरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर किल्ले लळींग कुरणातील पिकॉक हाऊस अर्थात लांडोर बंगला या ठिकाणी सलग तीन दिवस मुक्कामाला थांबले. त्यांच्या आगमनाची बातमी कळताच धुळे शहर तसेच लळींग परिसरातील दलित आदिवासी जनतेने आबाल वृध्दासह लांडोर बंगला गाठत या ठिकाणी मोठी गर्दी केली. एवढ्या प्रचंड संख्येने जमलेला जनसमुदाय पाहून डॉ .बाबासाहेबांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन पर भाषण केले. अंधश्रध्दा पासून दूर रहा, व आपल्या पोरा बाळांना शाळेत पाठवा, चांगले शिक्षण द्या. मुले शिकतील तर आपोआप सामजिक परिवर्तन घडेल असा अनमोल संदेश देत त्यांनी खऱ्या अर्थाने या भूमीत सामाजिक परिवर्तनाच्या संग्रामाचे बिजारोपण केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सच्चा अनुयाची कठोर प्रतिज्ञा पूर्ण करण्यासह आपल्या अनुयायीच्या समोर या ठिकाणी केलेल्या भाषणातून व्यक्त केलेले विचार आजही समर्पक वाटतात.

आंबेडकरी चळवळीतील जाणत्या मंडळींनी एकत्र येत डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या या समाज परिवर्तनाची ज्योत आजही भीम स्मृती यात्रेच्या माध्यमातून कायम तेवत ठेवली आहे. त्यामुळेच की काय किल्ले लळींग भूमीला आता सामाजिक परिवर्तनाची भूमी अशी नवी ओळख प्राप्त होऊ लागली आहे.

लेखक - निलेश परदेशी
चाळीसगाव जि.जळगाव

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate