অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेगवा किल्ला

महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहेत. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या जवळ असूनही हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. ११ व्या शतकात बांधल्या गेलेल्या आणि शिवकाळात पुनर्बांधणी झालेल्या सेगवा किल्ल्यावर अनेक अवशेष काळाची झुंज देत आजही उभे आहेत. या भागात असणाऱ्या इतर किल्ल्यांच्या मानाने (असावा, अशेरीगड इत्यादी) सेगवागडाची उंची पायथ्याच्या करंजविरा गावापासून कमी असल्याने २ ते ३ तासात सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. ऐतिहासिक कागदपत्रात सेगवा गडाचा उल्लेख सेगवाह या नावानेही येतो.

इतिहास

केळवे माहिमचे मूळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळुकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात सेगवा किंवा सेगवाह किल्ला बांधण्यात आला. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाने हा परीसर ताब्यात घेतला तेव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ या काळात मोरोपंताना ६००० ची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.

इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्षे हा किल्ला पोर्तुगीज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिंकुन घेतला. पुन्हा इ.स. १७५४ मध्ये हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मध्ये झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने सेगवागड जिंकला.

पाहण्याची ठिकाणे

करंजविरा गावातून आपण पाऊण तासात गडाच्या माचीवर वायव्य दिशेकडून प्रवेश करतो. माची दक्षिणोत्तर पसरलेली आहे. येथुन उजवीकडे (दक्षिणेकडे) गेल्यास माचीचे टोक आहे. तर डावीकडे (उत्तरेकडे) बालेकिल्ला आहे. प्रथम माचीच्या टोकाकडे जावे. तेथुन खालचे करंजविरा गाव, मुंबई - अहमदाबाद हायवे आणि महालक्ष्मीचा सुळका पाहाता येतो. माचीच्या टोकावरुन परत किल्ल्यावर प्रवेश केला त्या ठिकाणी येऊन बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला हनुमानाचे नविन मंदिर व त्यातील हनुमानाची संगमरवरी मूर्ती पाहाता येते. कारण हा किल्ला शिवाजी महाराजानी जिंकुन त्याची पुनर्बांधणी केली होती. हनुमान मंदिरावरुन पुढे जाताना माचीच्या दोनही बाजुस उतारावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. त्यात चुना भरला जाई. यामुळे दगड एकमेकात अडकून राहात, तसेच बाहेरच्या बाजूंनी तटबंदी दिसतांना अखंड दगडाची दिसे. तीव्र उतारावर बांधलेल्या तटबंदीचे आज मोजकेच अवशेष गडावर पाहायला मिळतात.

गडाच्या माचीवर महादेवाचे मंदिर आहे. स्वच्छ सारवलेल्या आणि पत्र्याने शाकारलेल्या या मंदिरात पिंड, नंदी, कासव आणि गणेशाची मूर्ती आहे. येथे पुजेचे पाणी भरुन ठेवण्यासाठी दगडात कोरलेली एक ढोणी पाहायला मिळते. माची आणि बालेकिल्ल्याच्या डोंगरामध्ये एक घळ आहे. या घळीत उतरून बालेकिल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पायऱ्या चढुन पश्चिमाभिमुखी उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. येथुन दोन वाटा फुटतात. सरळ वर चढत जाणारी वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. दुसरी उजव्या बाजूने जाणारी वाट पाण्यांच्या टाक्यांकडे जाते. आपण उजव्या बाजूच्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला दरीच्या बाजूला तटबंदीचे काही अवशेष पाहायला मिळतात. पुढे एक घळ लागते. या जागी पूर्वी किल्ल्याचा दक्षिणाभिमुख दरवाजा होता आता तो पूर्णपणे कोसळलाय. त्याचे दरीत पसरलेले दगड येथे पाहायला मिळतात.

पोहोचण्याच्या वाटा

करंजविरा हे सेगवागडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १११ किमी वरील चारोटी नाका गाठावा. त्यापुढे अंदाजे ४ किमीवर महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर आहे. महालक्ष्मीच्या पुढे ११ किमीवर (मुंबई पासून १२५ किमीवर) आंबिवली गाव आहे. उजवीकडे जाणारा रस्ता करंजविरा गावात जातो. गावातील शाळेपर्यंत खाजगी वाहनाने जाता येते. रेल्वेने डहाणू आणि तलासरी येथे उतरून स्टेशन बाहेर मिळणाऱ्या खाजगी जीप/ओमनी या वाहनांनी आंबिवली किंवा करंजविरा फाट्यावर उतरावे. तेथुन चालत अर्ध्या तासात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो.

करंजविरा गावाच्या मागे सेगवागड आहे. गावातून पुढे जाणारा रस्ता संपला की शेतातून जाणारी पायवाट आपल्याला गडाच्या डोंगराच्या डाव्या बाजूच्या धारेखाली आणून सोडते. तेथुन मळलेल्या पायवाटेन पाऊण तासात खडा चढ चढून आपण माचीवर पोहोचतो.

- भूषण दुनबळे,
८३०८२६८७२६
bhushandunbale111@gmail.com

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate