অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वासोटा

वासोटा

वासोटा

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध वनदुर्ग. तो सातारा शहराच्या पश्चिमेस सु. ४० किमी. वर जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आहे. मराठ्याचा सेनापती बापू गोखले याने या किल्ल्याच्या दुर्गमतेबद्दल काढलेले उद्‌गार एका पत्रात नोंदण्यात आले आहेत. ह्याची सस पासून उंची १,१७२ मी. आहे. साताऱ्याहून बामणोलीला सु. ४० किमी. गेल्यावर बामणोलीहून नावेतून १५ किमी. वर मेट-इंदवली हे ठिकाण लागते. तेथून गडाच्या चढणीस प्रारंभ होतो. हा मार्ग अलीकडे अधिक वापरात आहे. सुमारे तीन-चतुर्थांश डोंगर चढल्यानंतर चोहोंकडून तासलेल्या कड्यापाशी प्रवासी येऊन पोहोचतो आणि अत्यंत अरुंद अशा वाटेने हा कडा चढून गेल्यावर गडाचा अंडाकृती माथा त्याच्या दृष्टोत्पत्तीस येतो. गडावर सु. सहा हेक्टर सपाट क्षेत्र आहे.

जांभ्या दगडाने बांधलेले एक लहानसे चंदकाईचे मंदिर व स्वच्छ पाण्याची दोन टाकी आहेत. गडाच्या पश्चिमेस ताई तेलिणीचा कडा प्रसिद्ध असून सु. ४५७ मी. उंच लांबट भिंतीसारखा आहे. पूर्वी देहांताची शिक्षा झालेल्या कैद्यांचा कडेलोट तेथून करीत. माथ्याच्या उत्तरेकडील एक सुळका सोंडेप्रमाणे लांबवर पसरला आहे. ही किल्ल्याची माची होय. तिला काळकाईचे ठाणे म्हणतात. तिच्या पोटात एक गुहा आहे. तीत नागेश्वर नावाचे शिवलिंग असून त्यावर गुहेच्या छतातून पाणी झिरपत असते. त्या ठिकाणी शिवपार्वतीची एक सुबक मूर्ती आहे. अलीकडे संशोधकांना तेथे बाराव्या शतकातील काही वास्तूंचे जोते, विशेषतः नहाणीघर व कोठार यांच्या खुणा आढळल्या तसेच सोळाव्या शतकातील काही हत्यारेही उपलब्ध झाली आहेत.

वासोट्याचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही. कोल्हापूर शिलाहार शाखेतील दुसरा भोजराजा (कार. ११७८-९३) याने हा किल्ला बांधला. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात तो अनुक्रमे शिर्के आणि मोरे या आदिलशाहीतील सरदारांच्या आधिपत्याखाली होता. छ. शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून त्या परिसरातील इतर मुलूख काबीज केला, त्यावेळी १६५५ मध्ये वासोटा त्यांनी घेतला आणि त्याचे नाव व्याघ्रगढ ठेवले तथापि कालौघात ते कागदोपत्रीच राहिले. महाराजांनी राजापूरला पकडलेल्या इंग्रजांना सु. १० वर्षे या किल्ल्यात कैदेत ठेवले होते.

छ. संभाजी व छ. राजाराम यांनी या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिले नाही. उत्तर पेशवाईत हा किल्ला औंधच्या थोटे पंतप्रतिनिधींकडे गेला. दुसऱ्या बाजीरावाने प्रतिनिधींना कैद करून मसूरला ठेवले, तेव्हा थोटे पंतप्रतिनिधींची रखेली ताई तेलीण हिने हा किल्ला काबीज करून तेथे वास्तव्य केले व प्रतिनिधींची तुरुंगातून मुक्तता केली.

बाजीरावाने वासोटा घेण्याची कामगिरी बापू गोखल्यावर सोपविली. त्याने वासोट्यावर चढाई केली व जवळच्या उंच टेकडीवरून वासोट्यावर तोफेचा मारा केला. ताई तेलिणीने सु. आठ महिने हा किल्ला लढविला; पण अखेर तिचा पराभव झाला. त्यानंतर हा किल्ला कैद्यांसाठीच वापरात होता. बाजीरावाने काही दिवस येथे छ. प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना किल्ल्यात ठेवले होते (१८१७). त्यानंतर मराठ्यांनी कॉनेटस् हंटर आणि मॉरिसन या मद्रासच्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना पुण्याकडे जात असताना पकडून वासोट्यास कैदेत ठेवले होते. म्हतार्जी कान्होजी चव्हाण नावाच्या शिपायाने त्यांची उत्तम देखभाल केली; म्हणून पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिश शासनाने त्यास बक्षीस दिले. जनरल प्रिझलर या इंग्रज सेनापतीने २९ मार्च १८१८ रोजी शेजारच्या जुन्या वासोटा टेकडीवर तोफा चढवून त्यांच्या मारगिरीने हा किल्ला हस्तगत केला.

अव्वल इंग्रजी अंमलात आणि स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामुळे किल्ल्याच्या भोवतालची आडोशी, माडोशी, शेंबडी, तबदी, कुसावळ, तांबी, खिरखिंडी, आंबवडे, वासिवटा, शेलटी इ. खेडी उठली. सांप्रत विद्यार्थ्यांची शिबिरे आणि सहली यांमुळे वासोट्याची पायवाट तयार झाली असून हौशी प्रवाशांच्या गिर्यारोहणाचे ते आकर्षण बनले आहे.

 

संदर्भ : 1. Government of Maharashtra, Maharashtra State Gazetteers: Satara District, Bombay, 1963

२. घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! पुणे, १९८५.

खरे, ग. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate