অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्खातभूमि

उत्खातभूमि

उत्खातभूमि

(बॅडलँइस). अगदी कमी पावसाच्या प्रदेशात पठारी भागापासून मैदानातील एखाद्या नदीकडे उतरत जाणाऱ्या भूप्रदेशाचे स्वरूप काही ठिकाणी मोठे विलक्षण दिसते. टेकड्यांच्या रांगा आणि सपाट माथ्याच्या लहान मोठ्या एकाकी टेकड्या (मेसा आणि बुट्टे) जिकडे तिकडे उभ्या असलेल्या दिसतात. अपक्षरणाने- खननाने- त्यांना चित्रविचित्र आकार आलेले असतात आणि नदीपर्यंतचा सारा भूभाग आणि या टेकड्यांचे उतार असंख्य नाली आणि घळी यांनी भरून गेलेले असतात. या नाली आणि घळी अनेक ठिकाणी एकमेकींना छेदून जातात आणि त्यामुळे ठिकठिकाणी वर निमुळते होत गेलेले खांब किंवा लहान लहान सुळके उभे असलेले दिसतात.

जमिनीचा पृष्ठभाग सैल कणांच्या वाळू मिश्रित मातीच्या जवळजवळ क्षितिज समांतर थरांचा बनलेला असतो आणि त्यात मधून मधून मृदू वालुकाश्माचेही थर असतात. सर्व प्रदेश बहुधा वनस्पतिविरहितच असतो; फारतर पठारावर आणि टेकड्यांच्या सपाट माथ्यांवर थोडेसे गवत उगवलेले दिसते. नदीच्या बाजूचा उतार सौम्य असतो, तर पठाराच्या बाजूला खडा चढ असतो. स्वच्छ सूर्यप्रकाशात हे उघडेबोडके उतार आणि टेकड्या त्यांवरील मातीच्या रंगामुळे डोळे दिपवून टाकतात.

काही ठिकाणी पायर्‍या पायर्‍यांसारखी रचना झालेली दिसते, तर काही ठिकाणी सुळके उभे राहिलेले दिसतात. असा प्रदेश अगदी दुर्गम असतो आणि त्याचे दृश्य रौद्र, भयानक परंतु तरीही अत्यंत आकर्षक दिसते. अशा प्रकारच्या प्रदेशाला उत्खातभूमी म्हणतात.

या प्रदेशात पाऊस कमी पडतो, परंतु तो जो काही पडतो तो थोड्या वेळात जोरदार सरींच्या रूपाने पडून जातो. यामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वेगाने वाहतात. ते आपल्याबरोबर जमिनीवरील मातीचे सैल कण मोठ्या प्रमाणात वाहून नेतात. यामुळे जमिनीला प्रथम लहान लहान नाली

पडतात त्या लवकरच मोठ्या होत जातात आणि पुढे त्यांच्या खोल घळी बनतात. जमीन जसजशी कमी अधिक प्रमाणात झिजत जाते, तसतशा या नाली व घळी खोल खोल होत जातात आणि वेड्या वाकड्या दिशांनी पुढे गेलेल्या दिसतात. मध्येच खडकाचा थर आला म्हणजे तेथे झीज कमी होते आणि त्यामुळे खडकाची कड एखाद्या पायरीसारखी शिल्लक राहते. काही प्रदेशांचे उत्थापन होऊन त्यावर पुन्हा नाली व घळी पडण्यास सुरुवात झालेली दिसते.

वनस्पतींनी मूळ धरून रोपे वर येण्यापूर्वीच जमीन धुपून जाते. क्वचित आधीच्या पावसामुळे उगवलेले वनस्पतीचे पातळ आवरण नंतरच्या पावसाने साफ धुवून नेले जाते. यामुळे हा सारा प्रदेश अगदी उघडाबोडका दिसतो. नदीकडील भागात आल्यावर जेथे घळी थोड्याशा रुंद होऊन थोडी सपाट भूमी मिळते, तेथे प्रयत्नाने थोडी शेतीही होऊ शकते.

हे प्रदेश दुर्जल किंवा निर्जल प्रदेशात आढळत असले, तरी त्यांना त्यांचे सारखे स्वरूप वाहत्या पाण्यामुळे आलेले असते, वाऱ्यामुळे नव्हे. बारीक, एकसारख्या आकाराच्या, सैलसर कणांच्या गाळाचे जवळजवळ क्षितिजसमांतर थर, लांब मुळाच्या वनस्पतींचा अभाव आणि जोरदार सरीच्या रूपाने थोड्या काळात केंद्रित झालेल्या, परंतु एकंदरीत कमी प्रमाणाच्या पावसाचे हवामान या तीन गोष्टी उत्खातभूमी बनण्यास आवश्यक असतात. कुजलेला ग्रॅनाइट खडक, लोएसचे थर किंवा असेच मऊ थर येथेही उत्खातभूमी बनण्यास अवसर असतो.

कोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी साउथ डकोटा संस्थानाच्या नैऋत्य भागात काही फ्रेंच कॅनेडियन फासेपारध्यांना या प्रकारचा प्रदेश आढळला. त्यांनी त्याला ओलांडण्यास कठीण प्रदेश अशा अर्थाचे नाव दिले;त्यावरून पुढे ‘बॅडलँड्स’ ही संज्ञा रूढ झाली व जगातील अशा प्रकारच्या कोठल्याही प्रदेशाला उद्देशून ती वापरात येऊ लागली.

अमेरिकेत नॉर्थ व साउथ डकोटा संस्थानाच्या पश्चिम भागात आणि वायोमिंग संस्थानाच्या मध्य भागात उत्खातभूमीचे प्रदेश आहेत. ‘नॉर्दर्न पॅसिफिक रेल्वे’ लिटल् मिसूरी नदीला ओलांडून जाते तेथे आगगाडीतूनही या प्रकारचा प्रदेश दिसतो. डकोटातील उत्खातभूमी ब्लॅक हिल्सच्या पूर्वेस आणि व्हाइट व शायेन नद्यांच्या दरम्यान आहे.

तिला व्हाइट रिव्हर बॅडलँड्स किंवा बिग बॅडलँड्स म्हणतात. तिची लांबी सु. २०० किमी., रुंदी सु. ५० ते ८० किमी., विस्तार सु. ५,००० चौ. किमी.हून अधिक आहे. टेकड्यांची उंची सु. ६० ते १२५ मीटरपर्यंत आहे. या उत्खातभूमीचे हवामान फार प्राचीन काळी आतापेक्षा बरेच आर्द्र होते वऐतिहासिक काळात तेथे गवे, काळवीट, डोंगरी शेळ्यामेंढ्या वगैरे प्राणी होते.

आजही तेथे गाणारे पक्षी, दुसर्‍या पक्ष्यांवर जगणारे पक्षी, जॅकरॅबिट्स, कॉयॉटीस, प्रेअरी डॉग असे काही प्राणी तुरळक आढळतात. साउथ डकोटात प्राण्यांचे बरेच निखातक सापडले आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञांचे लक्ष या प्रदेशाकडे वळले आहे. १९३९ पासून तेथील भाग राष्ट्रीय उपवन म्हणून राखून ठेवला आहे आणि तेथे हौशी प्रवाशांकरिता सर्व सुखसोयी केल्या आहेत. त्यामुळे आता दरवर्षी हजारो प्रवासी सृष्टीचे हे अद्भुत स्वरूप पाहण्यासाठी तेथे जातात.

भारतात चंबळ नदीच्या काठचा काही प्रदेश व ती जेथे यमुनेला मिळते त्याजवळचा काही प्रदेश उत्खातभूमीचा म्हणून प्रसिद्ध आहे. तो आग्र्याच्या दक्षिणेस सु. ५० किमी. आहे.

मध्य प्रदेशाच्या भिंड जिल्ह्यात त्याने बरेच क्षेत्र व्यापले आहे. या प्रदेशाची सरासरी समुद्रसपाटीपासूनची उंची सु. १६०—१७५ मी. असून नाली व घळींची खोली १५—२० मी. आहे. काही जागी विरळ झुडपे व गवताचे झुपके दिसतात. नदीच्या बाजूने या घळींच्या भागात शिरल्यास काही ठिकाणी घळींचा तळ काहीसा रुंद झाल्यामुळे थोड्याशा जमिनीत काही शेती होऊ शकते. तथापि एकंदरीत उत्खातभूमीचा प्रदेश शेतीसाठी किंवा चराऊ प्रदेश म्हणून निरुपयोगीच असतो. चंबळच्या उत्खातभूमीचा काही भाग प्रयत्न केल्यास गुरांसाठी चारा उत्पन्न करण्याइतका सुधारणे शक्य आहे, असे काही लोकांचे मत आहे.

समोच्चरेषांच्या अनुरोधाने बांध घालून आणि काही वनस्पतीची मुद्दाम लागवड करून या प्रदेशाची थोडीफार सुधारणा करण्याचा प्रयत्न होत आहे. मध्य रेल्वेने ग्वाल्हेरकडून आग्र्याकडे जाताना, मध्य प्रदेश व राजस्थान यांच्या सरहद्दीवर चंबळ नदी ओलांडून जात असताना, या उत्खातभूमीचा काही भाग दिसतो. हा भूभाग इतका दुर्गम आहे, की मध्य प्रदेशातील काही कुप्रसिद्ध दरोडेखोरांनी व त्यांच्या टोळ्यांतील लोकांनी पोलीसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी या भागाचा आश्रय घेतला होता आणि या प्रदेशात त्यांचा पाठलाग करणे पोलीसांना अशक्यप्राय होऊन बसले होते.

पंजाबात बिआस व सतलज यांच्या दरम्यान शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी असाच नाली घळींचा भूप्रदेश आहे. तेथे अशा कोरड्या जलप्रवाहमार्गास ‘चो’ म्हणतात. पाकिस्तानातही पोटवार पठार आणि सॉल्ट रेंजेस येथे ‘खुद्देरा’   या स्थानिक नावाने ओळखला जाणारा प्रदेश या प्रकारचा आहे.

 

कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate