महाराष्ट्रासारख्या विस्तीर्ण प्रदेशात मराठी भाषेच्या जोडीला अनेक बोली आपल्या श्रीमंतीने नांदतात. त्यातील एक आणि संपूर्ण विदर्भात बोलली जाणारी भाषा म्हणजे वऱ्हाडी बोली होय. या वऱ्हाडीची श्रीमंती देशभर करणारे कवी शंकर बडे यांचे निधन १ सप्टेंबर २०१६ रोजी पोळ्याच्या दिवशी झाले. शेती आणि शेतकऱ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्राच्या कवीचे कृषी संस्कृतीवरचे प्रेम बावणकशी होते. या कवीने विदर्भाच्या गावागावाला वऱ्हाडी भाषेतील कवितांवर डोलायला शिकवले. वऱ्हाडीच्या या बादशहाला श्रद्धांजली वाहताना शेतकऱ्यासाठी शब्दा-शब्दात कणव असणाऱ्या त्यांच्या साहित्य प्रवासाची आठवण क्रमप्राप्त ठरते.
शंकर बडे यांचे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब. आपल्या रसिकप्रिय गेय कवितांसोबतच 'बॅरिस्टर गुलब्या' व 'अस्सल वऱ्हाडी माणूस' या एकपात्री कार्यक्रमातून वऱ्हाडी समाज जीवनातील अघळपघळपणा गेली चार दशकं त्यांनी रसिक श्रोत्यांच्या दरबारी सादर केला. त्यांचे साहित्य हे तत्कालीन समाज जीवनाचा आरसा होते. शेती, शेतकरी आणि कृषी संस्कृतीवर अभ्यासपूर्ण शब्दांची पेरणी करणारे शंकर बडे विदर्भाच्या संस्कृतीचे खरे ब्रँड ॲम्बॅसिडर होते. विदर्भातील तीन पिढ्यांनी त्यांच्या कवितांचा आनंद घेतला आहे. त्यांची एक एक कविता अशी मातीशी नाळ जोडणारी होती. सीतादयी ही कविताही खूप गाजली. सोयाबीनचा विदर्भात जन्म होण्यापूर्वीचा तो काळ, कपासीवर कित्येक पिढ्या जगवणाऱ्या कृषी संस्कृतीला अखेरची घरघर लागल्याचा तो काळ...कापसाचा वेचा सुरू करण्यापूर्वी विदर्भात सीतादयी हा संस्कार जपणाऱ्यांना त्यांची सीतादयी ही कविता स्मरणात असेलच...
सखू, ठकू, वनी, बनी, बकू करा निंघाची व घाई
आज सीतादयी बाई आज सीतादई
आज अगासीचे कोनं इथं लावले गा मोती
थेच मोती देतीनं वं कसं सोनं माह्या हाती
बोंडायीचा जीव लडे गेल्या कापसाच्या साठी
आता कवा होईन गा आपल्याना गाठी-भेटी
आज सीतादई बाई आज सीतादयी
पेरणी, निंदणी, सुगी या विषयाचा आनंद या शेतकऱ्याने आपल्या, लेखणीतून मांडला आहे. त्यांच्या शेतकरी असण्याची आणि शेतीवर प्रेम करण्याची आसक्ती ‘पीक आलं छाती छाती’ या कवितेत दिसून येते...
अस्सी ऊफानली माती
पीकं आलं छाती छाती
कसा इरवा फुलला तरन्याबांड पोरायवानी
नोको नोको म्हनलं ते गेलं कसं कानोकानी
नाई पचत वाऱ्याले केलं मालूम साऱ्याले
बरबटीच्या येली संग सजलेल्या याच्या राती
पीक आलं छाती छाती...
लहरी निसर्ग आणि आर्थिक आघाडीवर अपयशच येणाऱ्या शेतकऱ्याच्या वेदनांना त्यांनी भीक या कवितेत समर्पकपणे मांडले. या कवितेतील शेतकऱ्याच्या संघर्षाची परिस्थिती डोळ्यात पाणी आणते...
टोबावं तं मोड येते
तुरीले उकरी नेते
जवा तवा आपलचं
तकदीर गोते खाते
ढासभर शेंगोटात
पसाभर तूर झाली
मनातल्या आसिले या
हंगामात मूर आली
यासारखीच शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी आणखी एक स्मरणातील कविता म्हणजे.... शेतकरी राजा.
घरी मोत्याच्या गा रासी
पोट रिकामं राह्यलं
असं फुटकं नसीब
नाई कोनाचं पाह्यलं
राजा आमाले म्हनती
जसं चिडवाच्या साठी
राहे फाटकं धोतर
लुगड्याले बारा गाठी
किंवा शेतकऱ्याच्या ढासळलेल्या परिस्थितीचा, त्याच्या चिव्वट मनोवृत्तीला थेट मनाला भिडणाऱ्या शब्दात मांडलेली मनो व्यथा म्हणजे...पासरी मनाची...
उसनं पासनं करू
बियानं आणून पेरू
अंवदाई न पिकलं
कपड्याचे लावू गेरू
ढोरायसंग राहून
ढोर मेहनत केली
भर हंगामात कसी
कमाईची माय मेली
मात्र या व्यथांसोबतच उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी या भुलभुलैय्यात फसलेल्या आणि शेती पिकत नसल्याची जाणीव झालेल्या त्याकाळातील शेतकऱ्यांना सचेत करण्याचे काम त्यांनी त्यांच्या ‘मुगुट’ या कवितेतून केले. या कवितेतील "एकांद्या साली पीक उमराचं फुल होये " ही ओळ श्रोत्यांना अशा काही पद्धतीने सांगायचे की त्यामुळे सारा सभामंडप हुंदक्यात हरवून जायचा.
आपला देश कृषीप्रधान देश आहे
आणि या देशाचा शेतकरी राजा आहे.
म्या म्हनलं इचिन आपन तं राजपूत्र झालो.
या ओळी किंवा....
तरी माहे बावाजी म्हनत
का असं का दोन साल पिकलं
का मी तं राजा भोज
बावाजी गेले पन
राजाभोज कायी झाले नाई
जाच्या अगुदर त्यायनं मले बलावलं
आन त्यांच्या डोस्क्यावरचा मुगुट
माह्या डोक्स्यावरतं ठुला
त्यावक्ती ध्यानात आलं का
हा तं काट्याचा होय
ही शेती आणि शेतीत होणारी फसगत त्यांनी त्यांच्या सादरीकरणातून गावागावात उभी केली. ऐकताना रोमांचित करणारा हा कवी शेतकऱ्याचे दु:ख त्यांच्याच भाषेत समजावून सांगायचा. त्यांची आणखी वेगळी ओळख म्हणजे सहज, साध्या चालीतील गेय कविता. त्यांच्या कवितेतील शेतकऱ्यांचे दु:ख, ग्रामीण भागातील नात्यांची गुंफण, त्यातील वेदना, विनोद आणि शृंगार श्रोत्यांना खिळवून ठेवायचा. ३० वर्षापूर्वीच्या काळात...
पावसानं ईचिन कहरचं केला
नागो बुढा काल वाहूनचं गेला |
बुढीसंग त्याचं भांडन झालं जम्मून
सकायीच रागानं वावरात गेला निंघून |
झाक पल्डी तरी घरी नाई आला
लोक म्हने नागो बुढा वाहूनच गेला |
ही कविता न म्हटलेला शाळकरी मुलगा सापडणे कठीण. ही त्यांची कविता तुफान गाजली. शंकर बडे यांचे प्रभाव क्षेत्र हे शृंगारिक गेय कविता होते. त्यांनी आपल्या अभिनय व आवाजाच्या बळावर अजरामर केलेली आणखी एक रचना म्हणजे ‘रंगू बजाराले जाते, संग शेजाऱ्याले नेते’ याशिवाय ' अरामान चालं, जरा अरामान चालं, सांग सगुना आता बल्लावू कोणाले' 'सगून पाहू का बाई वं, तुले गमत काऊन नाही', आदी कवितांनी वन्समोर घेतला नसेल असे गाव विदर्भात सापडणार नाही. 'भारी झाला पाय' या कवितेतील पत्नीच्या डोहाळ्याचे त्यांनी वर्णन कोणत्याही स्त्री-पुरुषाला नाते जगायला शिकविणारे आहे. उपमांची आरास आणि चपखल शब्दांच्या अचूक वापराने ओळी ओळीवर श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद त्यांना मिळायची. भारी झाला पाय ही कविता त्यांचा
मास्टर पीस होती...
खाली गवताची सेज
तुहा मखमली पाय
तुह्या कूसीत वाढते
माह्या मानाची सकाय |
आता आरामानं चालं, जरा आरामानं चालं |
व्यंग, हास्य, कारुण्य आणि शृंगाररसाला त्यांच्याकडे जोड होती ती ग्रामीण भागातील गावगाड्याची व त्यांना लाभलेल्या नर्मविनोदी आवाजाची. नव्या पिढीच्या विस्मृतीत गेलेल्या अनेक नात्यांना, संबोधनांना व त्यातील हास्य-व्यंगाला आपल्या साहित्यातून त्यांनी जिवंत केले. 'इन-इवाई' या नात्यातील अबोल भावना कविसंमेलनात एव्हढी भाव खाऊन जाई की लोटपोट होऊन श्रोते त्यांना दाद देत. त्यांच्या इव्हाई कवितेतील ....
आला इव्हाई पावना
इन्ह कोनट्यात धसे
झाली मनातून खूस
कसी गालातच हासे...
या ओळी आणि त्यांचे सादरीकरण माहौल करायचे. ग्रामीण भागात जावई घरी येणे म्हणजे कालपर्यंत एक उत्सव होता. संयुक्त कुटुंबामध्ये जावयाचे पाहुणपण काढताना शेकडो हात कामी लागायचे .... त्यातून होणाऱ्या घटनाक्रमाची विनोदी मांडणी त्यांनी 'आमचे दाजी आले अन् पट्ट्याची बनेम घाले ... या कवितेत सुरेख केली आहे.
'पहिल्या वहिल्या पाहूण पनाले
आमचे दाजी आले....
आमचे दाजी आले,
पट्याची बनेम घाले'
पाहुणचार दाजिले, अवसीच्या सांजिले
मासोयी ताजी गा, सगयीचं हानली भाजी गा
पये मंग सांदीत, तिकडून निंघे पांदीत
गह्याटल्यावानी चाले....
आमचे दाजी आले...
त्यांच्या गेय कविता गावागावात अनेकांच्या तोंडपाठ आहेत. दोन दोन हजारांच्या उपस्थितीत कवितेचे समूह गाणं व्हावे, कविता कवीसोबत श्रोत्यांनी गावी, असे संपूर्ण गावच्या गाव कवितेवर डोलवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. आजी-आजोबा, नात-आजोबा, आजी-नातू, इन्-इवाई, जावई-सासू, मेव्हणी -जावई, मुलगा-वडील, सासू-सून अशा नात्याची घट्ट वीण सुदृढ वऱ्हाडी समाजाचे सत्व आहे. वऱ्हाडी भाषा ही त्यांच्या व्यासपीठावरील हुकमत होती. विनोद त्यांच्या देहबोलीतून तर वऱ्हाडी त्यांच्या वाणीतून श्रोत्यांवर गारूड घालायची. वऱ्हाडी भाषेवरील त्यांच्या प्रभुत्वाने त्यांना महाराष्ट्रभर ओळख दिली.
‘माह्या वऱ्हाडी मातीले,
येते चंदनाचा वास
पोट भरून घालते
कसा मोत्याचा हो घास’
असे भाषेचे श्रेष्ठत्व मांडणाऱ्या, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या कार्याची त्यांच्यावर कायम छाप...त्यांच्या भजनापासून तर कीर्तनापर्यंत या सगळ्याचा प्रभाव त्यांच्यावर होता.
माह्या डेबूजी सारखा नाई संत होनं जगी
ज्यानं आईकले बोलं त्यानं लुटली रे सुगी
अशा शब्दात ते गाडगेबाबांच्या कर्तृत्वाचे वर्णन करून कवितेला सुरूवात करायचे. शंकर बडे आयुष्यभर जगले कर्मयोग्यासारखे. कवी सुरेश भट यांनी त्यांच्या प्रतिभेला अचूक हेरले होते. त्यांच्यासारख्या गुणवान व संवेदनशील कवीने प्रमाण भाषेत लिहावे, असा त्यांचा आग्रह होता. पण शंकर बडे वऱ्हाडीसाठी आग्रही राहिले. त्यामुळे त्यांच्या भाषेवरील मायेला मुंबई-पुण्यातून खूप मान मिळाला. कविवर्य फ.मु. शिंदे यांना शंकर बडे यांच्या कविताचे फार आकर्षण होते. त्यांच्या सादरीकरणाचे तर ते दिवाणे होते. शंकर बडे यांच्या प्रतिभेचे कौतुक करताना फ.मु म्हणायचे...‘जिभेचा सगळा जीव बोलीत असतो. बोलीतला जिव्हाळा जिभेवरच्या जगानं जपला आहे. जिभेवरचे जग, काळजाच्या कलानं, कालव्यानं, कहाणीनं बोलीचं बिऱ्हाडं होऊन जातं. बोली हाच भाषेचा जलाशय आणि बलाशय असतो, देशभरातील बोलीचे जे बादशहा आहेत, त्यांच्यातला शंकर बडे हा बलाढ्य बादशहा आहे. बोलीइतकाच तो बुलंद आहे’.
लेखक - प्रवीण टाके,
वरिष्ठ सहायक संचालक तथा लोकराज्य मासिकाचे कार्यकारी संपादक.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 4/15/2020
मराठवाडा व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील सोनेसांगवी शि...
प्रसिद्ध रोमन (लॅटिन) कवी. ह्याचा जन्म कालेब्रियात...
क्रांतिवादी बंगाली कवी. त्यांचा जन्म चुरुलिया (जि...