छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी येथे झाला. आज त्यांची 387 वी जयंती…त्यानिमित्त त्यांचा हा कार्याचा गौरव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, कर्तृत्वाची, पराक्रमाची खूप महान महती आहे. ती आपण अभ्यासल्यावर आपणास सविस्तर इतिहास कळू शकतो.
तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात 17 व्या शतकातील एक हस्तलिखीत असून महाराजांच्या ठायी असलेल्या गुणांचे एक टिपण त्यात दिलेले आहे. त्यामध्ये गजपरीक्षा, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा, शरमपरीक्षा इत्यादी गुण सांगितले आहे. शिवाय “वरदकविता शक्ती” नावाचा एक गुणही सांगितलेला आहे. ते अनेक शास्त्रांचे जाणकार होते. राज्याभिषेकप्रसंगी महाराजांनी मुलकी, लष्करी आणि धार्मिक विषयात नव्या सुधारणा केल्या होत्या. त्यांना पद्धवी असे म्हटले जाई. स्वराज्य स्थापनेचे ध्येयधोरण निश्चित केल्यानंतर शिवाजी महाराजांना प्रथम निष्ठावान सहकारी जमवावे लागले.
मराठ्यांच्या ठायी असलेल्या क्षात्रवृत्तीचा बाणेदारपणाचा आणि इमानी वृत्तीचा उपयोग स्वराज्य कार्यासाठी व्हावा, यासाठी महाराजांना आपल्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागला. महाल आणि पठाण यांच्या राज्यापेक्षा आपले म्हणजे स्वकियांचे राज्य रयतेच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आणि संरक्षणासाठी आहे, हे नव्या स्वराजनितीचा आदर्श घालून सिद्ध करावे लागले. महाराजांचे हे कार्य अलौकिक होते म्हणूनच त्यांना निश्चयाचा महामेरु बहुत जनासी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत-योगी असे श्री. रामदास स्वामींनी म्हटले आहे. कारण त्यावेळी समकालीन संत होते.
शत्रुच्या हल्ल्याची झळ रयतेला किंचितही पोहोचू नये, त्यासाठी महाराज दक्ष असत. कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची महाराज गय करीत नसत. त्यांनी वतनासाठी, वृत्तीसाठी चालणारे तंटे जातीने लक्ष घालून सोडविण्याचे प्रयत्न केले. बदअंमल, शिंदळकी किंवा व्यभिचार यासारख्या गुन्ह्यांना महाराजांनी कठोर शिक्षा फर्मावलेल्या आहेत, महाराजांचा विशाल धार्मिक दृष्टिकोन होता.
महाराजांनी औरंगजेब यांना एक पत्र फारसीमध्ये लिहिले आहे. हिंदू जनतेवर बसवलेल्या जिझियापट्टीचा निषेध त्यांनी या पत्रात केलेला आहे. हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्म श्रेष्ठ असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली.
न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. पश्चातापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले. सर्व धर्मांना समान लेखले. साधुसंताचा यथोचित आदर केला. रयतेला त्यांनी लेकरांप्रमाणे मानले. आपल्या प्रजेवर, अधिकाऱ्यांवर, सैनिकांवर, वतनदारांवर, साधुसंतावर विलक्षण प्रेम करणारा असा हा राजा होता.
आपला पुत्र संभाजी यांच्याकडेही शिवाजी महाराजांनी काही राजकीय कार्य सोपविले होते. इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी या ग्रंथाप्रमाणेच फॉरिन बायॉग्राफिक ऑफ शिवाजी या ग्रंथातील माहिती पाश्चात्य युरोपियन लेखकांनी लिहिली असल्यामुळे पुराव्याच्या दृष्टीने ती अत्यंत महत्वाची आहे. शिवचरित्रावर प्रकाश पाडणाऱ्या या पाश्चात्यांच्या ग्रंथाशिवाय अलिकडे उपलब्ध झालेल्या “शिवभारत”, “राधामाधव विलास चंपू” या ग्रंथात शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांची माहिती शहाजी राजे यांच्या दरबारातील राजकारणी पुरुष त्यांची विधाभिरुची इ. विषयासंबंधी नूतन माहिती आपणास मिळते.
शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यात असलेल्या महाराष्ट्र देशात स्वराज्याची स्थापना करुन त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. महाराजांनी महाराष्ट्राच्या ज्या भागात स्वराज्याची स्थापना केली त्या भागाचे सभोवताली विजापूरचा बादशाह, दिल्लीचे मोगल, पोर्तुगीज गोवळकोड्यांचे नवाब हे प्रबल राजसत्ताधारी असून त्यांच्यासमवेत लढा देऊन त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला होता.
प्रजेची संपत्ती आणि मालमत्ता यांचे योग्य प्रकारे रक्षण करण्यास्तव न्याय देण्याची उत्तम प्रकारची व्यवस्था महाराजांनी आपल्या राज्यात ठेवली होती. न्याय मनसुब्याची कामे ते स्वत: करीत असत. त्यांच्या बालवयात पुण्याच्या जहागिरीच्या प्रदेशात राहणाऱ्या प्रजेत जे व्यवहार उत्पन्न होत त्यांचे निवाडे गोत दशक इत्यादी सभा ते करीत असत. महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान संस्थेत न्यायाधिशाचे एक पद असून त्या पदावर प्रल्हाद-निराजी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. कोणीही गुन्हा केल्यास त्याचा तपास करण्याच्या कामी महाराज अतिशय दक्षता बाळगत असत.
हे परकीय लेखक कॉस्मो डिगार्डा यांनी आपल्या ग्रंथात लिहिलेले दिसून येते. छत्रपती शिवाजीराजे बलाढ्य राजे होते. सुरत आणि गोवा यांच्या दरम्यानच्या प्रदेशात पोर्तुगीज लोकांची काही बंदरे खेरीज करुन त्यांचे प्रबल शत्रु असूनही महाराजांनी त्यावरती आपल्या अपूर्व बुद्धिमत्तेने आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली आहे. महाराजांनी आसपासच्या शत्रुंच्या मनात इतकी दहशत निर्माण केली होती की, गोव्याचे पोर्तुगीज लोक ते येणार अशी बातमी कळताच भितीने थरथर कापत असत. ते सर्व धर्मासंबंधी सहिष्णुता बाळगत असत. त्या प्रदेशातील लोक महाराजांना उत्तम राजकारणपटू राजे समजत होते. तंजावर येथील “सरस्वती महालात” 17 व्या शतकातील एक ग्रंथ आहे. या हस्तलिखित वहीत वही क्र. 117 पान क्र. 195 मध्ये महाराजांचे गुण, त्यांचे पूर्वज, त्यांचे किल्ले, बंदरे आणि मुस्लिम राजांची नावे, सुलतानाचे कोणकोण अधिकारी होते. मराठा राजघराण्यांच्या पुरुषांची नावे या संबंधी माहिती मिळते.
हा हस्तलिखित ग्रंथ 17 व्या शतकातील आहे. त्यांनी नेमलेले अष्टप्रधान मंडळ हे कर्तृत्ववान होते. ते निरनिराळ्या प्रांतावर स्वाऱ्या करीत आणि ते प्रांत स्वराज्यात सामील करणे, चौथाई वसूल करणे, नवीन गड बांधणे, जुन्यांची दुरुस्ती करणे, आरमाराची तयारी करणे इत्यादी कामे करीत असत.
छत्रपतीची सत्ता तळकोकणापासून उत्तर कोकणापावेतो स्थापित झाल्यावर पश्चिम बाजूला लागून असलेल्या अरबी समुद्रावरुन वावरणाऱ्या त्यांच्या शत्रुराष्ट्रांपासून कोकण प्रांताचे रक्षणासाठी त्यांना गरज भासू लागली. परंतु या किनाऱ्यावर दंडाराजपुरी हा हबशाचा मजबुतीचा प्रसिद्ध “जंजिरा” किल्ला होता.
महाराजांचे आणि जंजिऱ्याच्या हबश्याचे भांडण होते. महाराजांनी राजधानी रायगड केली तेव्हा हा डोंगर त्यांनी इ.स. 1646 मध्ये हबशाकडून प्राप्त केला होता. त्यावेळेपासूनच त्यांचे संबंध शत्रुत्वाचे होते. गडावर नेमणूक केलेल्या लोकांना शिवाजी महाराजांनी कडक शिस्त लावली होती.
छत्रपतींच्या कारकिर्दीच्या अखेरपावेतो दुर्गाचे महत्व कायम होते. महाराज त्यांच्या राज्यातील किल्ल्याची स्वत: पाहणी करीत असत. युद्धातील कलेचे ज्ञान, शिक्षण, शिपायांना देण्याची खबरदारी महाराज घेत असत. परंतु नुसते शिक्षण न देता शिपायांची मनोरचना बनविण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. अशा या पराक्रमी राजाला मानाचा मुजरा.
लेखक - प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर, धुळे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/4/2023