অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मास्टर विनायक

मास्टर विनायक

मास्टर विनायक : (१९ जानेवारी १९०६ – १९ ऑगस्ट १९४७). पूर्ण नाव विनायक दामोदर कर्नाटकी. ख्यातनाम मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता. जन्म आणि शिक्षण कोल्हापूर येथे. पिंडाचे कलावंत असूनही विनायकरावांना कोल्हापूरच्या विद्यापीठात परिस्थितीमुळे काही काळ शिक्षकाची नोकरी करावी लागली. ते चित्रपटसृष्टीकडे वळले ते प्रथम अयोध्येचा राजा (१९३२) ह्या हिंदी–मराठी प्रभातच्या चित्रपटात नारदाच्याभूमिकेकडे. विनायकरावांनी प्रभात फिल्म कंपनीच्या पाच चित्रपटांत भूमिका केल्या त्यानंतर प्रभात कंपनीचे पुण्यात स्थलांतर झाले; त्यामुळे विनायकरावांनी कोल्हापूर सिनेटोनमध्ये प्रवेश केला. विनायकरावांना दिग्दर्शनाची पहिली संधी येथेच मिळाली. विलासी ईश्वर (१९३५) ही मामा वरेरकरांची गोष्ट अनौरस संततीच्या एका ज्वलंत सामाजिक समस्येवर आधारलेली होती. त्याचे दिग्दर्शन म्हणजे विनायकरावांना एक आव्हानच होते. तथापि वाङ्‌मयाची व चित्रपटमाध्यमाची उत्तम जाण असलेल्या विनायकरावांना ते आव्हान समर्थपणे पार पाडले. त्याच सुमारास बाबूराव पेंढारकरांनी विनायकराव आणि पांडुरंग नाईक यांच्या भागीदारीतील 'हंस पिक्चर्स' ची स्थापना केली.

हंस पिक्चर्सची चार वर्षे म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक या नात्याने विनायकरावांच्या आयुष्यातील सुवर्णकाळच म्हटला पाहिजे. विनायकरावांनी हंस पिक्चर्सकरिता दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट, ज्वाला (१९३८) सोडून, सामाजिक होते; परंतु विनायकरावांसारख्या प्रतिभाशाली कलावंताचा त्याला स्पर्श झाल्यामुळे ते अजरामर बनले. त्यांत छाया (१९३६) सारखे गंभीर व सामाजिक समस्यांना स्पर्श करणारे आणि कारुण्याने ओलावलेले चित्रपट जसे होते, तसेच ब्रह्मचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) यांसारखे हास्यरसप्रधान चित्रपटही होते. वि. स. खांडेकरांच्या भाषेत सांगायचे तर ढेरपोटी माणसे किंवा तोतऱ्या व्यक्ती या किंवा अशा प्रकारच्या स्थूल विनोदापलिकडे ज्या चित्रपटांची झेप सहसा जाऊ शकत नव्हती. त्यांच्यावर उपहास, उपरोध, विडंबन, शुद्ध विनोद व चतुर कोटीक्रम या सर्वांचा विलास त्यांनी मूर्तिमंत उभा केला होता. हंस पिक्चर्सच्या कारकीर्दीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सल्ल्याने पडद्यावरील इंग्रजी श्रेयनामावलीचे संपूर्णतः मराठीकरण प्रथम विनायकरावांनीच केले. हंस पिक्चर्स बंद झाल्यावर १९४० साली विनायकराव नवयुग चित्रपट संस्थेत गेले. तेथेही त्यांनी लग्न पहावे करून (१९४०), अमृत (१९४१), सरकारी पाहुणे(१९४२) असे लक्षात राहणारे चित्रपट दिग्दर्शित केले.

मास्टर दीनानाथांची चिमुरडी मुलगी लता मंगेशकर हिच्यातील अभिजात कलागुण प्रथम ओळखले ते विनायकरावांनीच व त्यांनीच तिला चित्रपटसृष्टीतही आणले (पहिली मंगळागौर, १९४२). दुर्दैवाने विनायकरावांना तो चित्रपट अर्धवट सोडून जावे लागले. तथापि १९४३ साली त्यांनी आपली स्वतःची प्रफुल्ल पिक्चर्स ही संस्था स्थापन केली आणि लतालाही त्यात सामील करून घेतले. माझं बाळ (१९४३) हा प्रफुल्लचा चित्रपट म्हणजे विनायकरावांमधील प्रतिभाशाली कलावंताचे दर्शन घडविणारा होता. प्रफुल्ल पिक्चर्सचा संचार चालू असतानाच विनायकरावांनी शांताराम बापूंच्या डॉ. कोटनीस की अमर कहानी (१९४६) या चित्रपटात एक भूमिकाही केली होती. विनायकरावांनी पूर्णपणे दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट म्हणजे राजकमल कलामंदिरचा जीवनयात्रा(१९४६). त्यानंतर प्रफुल्ल पिक्चर्सचा मंदिर (१९४८) हा चित्रपट अर्धवट तयार झाला असतानाच विनायकरावांची जीवनयात्रा संपली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र झाल्याचे पाहून देशप्रेमी विनायकराव विलक्षण भारावून गेले होते. त्यानंतर चारच दिवसांनी विनायकरावांचे मुंबई येथे देहावसान झाले. चित्रपटसृष्टीतील आपल्या १६ वर्षाच्या कारकीर्दीत विनायकरावांनी १८ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि त्यांपैकी बऱ्याच चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीतले विनायकरावांचे स्थान अद्वितीय आहे.

 

लेखक : भा. वि. धारप

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate