অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिऱ्या बंदर

मिऱ्या बंदर

मिऱ्या बंदराचा निसर्गरम्य परिसर

मिऱ्या बंदर

 

 

 

 

(भगवती बंदर). महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील बंदर.

ते रत्नागिरीजवळ असून तेथील भगवती मंदिरावरून त्यास भगवती बंदर असे नाव देण्यात आले आहे. रत्नागिरीचा किल्ला असलेला, समुद्रात घुसलेला सु. ८० मी. उंचीचा भूभाग व त्याच्या उत्तरेचा सु. ४ किमी. अंतरावरील, तसाच समुद्रात घुसलेला सु. १४५ मी. उंचीचा मिऱ्या डोंगर यांच्या दरम्यानचा सागरी भाग मिऱ्या उपसागर (मिऱ्या बे) होय.

मिऱ्या डोंगराच्या उत्तरेकडील काळबादेवी उपसागराला शिरगाव खाडी व काळबादेवी खाडी ह्या मिळतात, तर रत्नागिरी किल्ल्याच्या दक्षिणेकडील रत्नागिरी उपसागराला भाट्याची खाडी मिळते; तशी मिऱ्या उपसागराला मिळणारी एकही खाडी नसल्यामुळे येथे गाळ साठण्याची समस्या नाही.

येथे मध्यम आकाराची जहाजे येऊ शकतील इतके खोल पाणी असून, विशिष्ट भूरचनेमुळे वाऱ्यापासून संरक्षण मिळू शकेल म्हणून मिऱ्या बंदराचा विकास करण्याचे केंद्र व राज्य शासनांचे प्रयत्न सुरू आहेत. मिऱ्या उपसागराची दक्षिणोत्तर लांबी जास्तीत जास्त सु. २·५ किमी. असून , तो पश्चिमेस १·५ किमी. पर्यंत पसरला आहे. किनाऱ्यापासून अर्ध्या किमी. च्या आतच त्याची खोली ६·५ मी. ते १५ मी. पर्यंत आहे.

त्याच्या उत्तर भागात मडल शोल नावाचा उथळ भाग आहे; परंतु तेथून १०० मी. अंतरावरच पाण्याची खोली सु. १० मी. आहे. उपसागराची किनारपट्टी अगदी अरुंद अर्धचंद्राकृती व वालुकामय आहे. पुळणीच्या मागे माडाचे (नारळाचे) वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामागे ६ ते ९ मी. उंचीच्या वाळूच्या टेकड्या मिऱ्या डोंगर व मुख्य भूमी यांस जोडतात. मिऱ्या डोंगराचा सु. १·५ किमी. भाग काढून तेथे सपाट भूमी तयार केली आहे.

रत्नागिरी किल्याच्या वायव्येकडील भगवती देवीच्या मंदिरापासून खाली उतरले, म्हणजे तेथपासून मिऱ्या डोंगराच्या दिशेने सु. ४६१·५ मी. लांबीचा लाटारोधक बांध पुरा झाला आहे. त्याचा उरलेला भाग पूर्ण झाला, म्हणजे त्याच्या आसऱ्याने जहाजे सुरक्षित नांगरता येतील. याच्या पूर्वेस समुद्रात भर टाकून त्याच्यापुढे जहाजांसाठी धक्का (जेटी) बांधला आहे.

मिरकरवाड्याच्या मच्छीमारांच्या बोटींसाठी लहान धक्के बांधले जात आहेत. मिऱ्या डोंगराच्या उत्तरेस काळबादेवी उपसागराच्या चिखलदरीतच १८५७ मध्ये सैन्य उतरवले होते. तेव्हापासून मिऱ्या बंदराच्या किनारपट्टीवरून पुढे कोल्हापूरकडे जाणारा बारमाही वापराचा रस्ता आंबा घाटातून आहे.

मिऱ्या बंदराच्या सान्निध्यात उद्योगपती चौगुले यांचा नर्मदा सिमेंट कारखाना सुरू झालेला असून, त्यासाठी आवश्यक असणारे दगड सौराष्ट्रामधून समुद्रमार्गे आणले जातात. मिऱ्या गावामध्ये मासे डबाबंदी करणाचा कारखाना असून, मत्स्यसंशोधन केंद्रही आहे. बंदराच्या सान्निध्यात कारखानदारी विकसित होऊन त्यामुळे बंदराचाही अधिक विकास होईल अशी अपेक्षा आहे.

 

पटवर्धन, मुधसूदन

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate