অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोणार

लोणार

लोणार

बुलढाणा जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्यातील एक गाव व प्रसिद्ध सरोवर. लोकसंख्या ११,४८६ (१९८१). मेहेकरच्या दक्षिणेस २०  किमी. अंतरावर असलेले लोणार हे विदर्भातील सर्वांत प्राचीन गावांपैकी एक आहे. कृतयुगात या गावाची स्थापना झाली, अशी दंतकथा आहे. त्याचे जुने नाव विरजक्षेत्रअसे होते. स्कंदपुराणात वर्णिलेल्या लोणासुराची (लवणासुराची) कथा याच ठिकाणाशी निगडित असावी. विरजमाहात्म्यात याचा तीर्थ म्हणून उल्लेख आहे.

लोणार गावाजवळच खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे. शास्त्रज्ञांच्या मते दहा लाख वर्षापूर्वी ६९ मी. रुंदीच्या व वीस लक्ष टन वजनाच्या अशनी पडल्याने १,९००  मी. व्यासाचे व १९०  मी. खोलीचे विवर निर्माण होऊन तेथेच या गोलाकार सरोवराची निर्मिती झालेली असावी. या सरोवराचा बाह्य परिघ ६ किमी.; अंतर्परिघ ३.५ किमी. व खोली ९० ते १९० मी. आहे. सरोवराच्या कडा १३० मीटरपर्यंत उंचावलेल्या आहेत. कडांवर काचेच्या छोट्या कणांपासून १० ते १५ सेंमी.पर्यंत आकाराचे काचेचे तुकडे पडलेले आढळतात.

सरोवराचे पाणी अत्यंत खारट व मचूळ आहे. मात्र काठावरील व आजूबाजूच्या विहिरींमधील पाणी गोड आहे. सरोवराच्या पाण्यात आढळणारे क्षार, मीठ आणि अन्य पदार्थ अन्यत्र कोठेही न सापडणाऱ्या प्रकारचे आहेत. काहींच्या मते चुनखडीयुक्त विवराचे प्रचंड छत कोसळून तेथे या सरोवराची निर्मिती झाली असावी; तर दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीउद्रेकाच्या वेळी जोराच्या वायुरूप स्फोटामुळे ज्वालामुखीच्या खोलगट भागात हे सरोवर निर्माण झाले असावे, असेही काहींचे मत होते.

परंतु अलीकडील काळात केलेल्या संशोधनावरून उल्कापातामुळेच हे सरोवर तयार झाले असावे, असे शास्त्रज्ञांच निश्चित मत बनले आहे. बेसॉल्ट खडकरचना असलेल्या प्रदेशातील अशा स्वरूपाचे हे जगातील एकमेव विवर असावे. जगातील उल्कापाषाण पतनामळे निर्माण झालेल्यांमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे विवर आहे. या विवरात दडला गेलेला उल्कापाषाण साधारण ६००  मी. खोलीवर रुतून बसला असावा, असा अंदाज आहे.

त्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ (वैरज तीर्थ) या नावाने ओळखले जात असे. लोणासुराच्या कथेनुसार विष्णूने लोणासुराचा वध केला व या सरोवराच्या खोलगट भागात त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या रक्तापासून सरोवरातील पा णी तयार झाले, अशी आख्यायिका आहे.

सरोवराच्या एका बाजूस स्वच्छ पाण्याची अखंड वाहणारी धार (झरा) असून त्या धारेचा उगम गंगे पासून झाल्याचे भाविक मानतात; तर दुसऱ्या बाजूस देवीचे मंदिर आहे. याशिवाय येथे सीताना हिनी व रामगया असे दोन झरे आहेत.

लोणार सरोवराभोवती अनेक मंदिरे असून ती बव्हंशी मोडकळीस आलेली आहेत. लोणार गावाच्या मध्यभागी विष्णूने ज्या ठिकाणी लोणासुरावर विजय मिळविला असे मानले जाते, तेथे दैत्य-सूदन हे सुंदर व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे यादवकालीन हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याशिवाय नरसिंह, गणपती,रेणुकादेवी, कुमारेश्वर व मारुती यांची अन्य उल्लेखनीय मंदिरे आहेत. लोणार सरोवर व त्याच्या परिसराच्या नयनरम्य सृष्टिसौंदर्यामुळे लोणार हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ बनले आहे.

 

सावंत, प्र. रा.; चौधरी, वसंत.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate