उन्हाळा सुरु झाला कि शेतातील कामे कमी होतात व पावसाची प्रतीक्षा असते. घरात कार्यालयात, कुलर, एसी. लागतात. दुपारच्या वेळी लोक घरातून बाहेर निघायचे टाळतात. पण शेतात काम करणार्या शेतकर्याला कुठले कुलर आणि कुठला ए.सी. मिळणार? दुपारचे 12 वाजेपर्यंत नांगरणी, कोळपणी सारखी कामे करायची आणि दुपार झाली कि झाडाच्या सावलीत दुपार्या उरकून दहा-पंधरा मिनिट लवंडायचं. उठून सावलीत बसून जी काम करता येतील ती करायची, मराठवाड्यातील बहुसंख्या शेतकरी व शेतमजूर यांचा परिपाठ हाच असतो. कारण आता जर आळस केला तर पुढे येणार्या खरिप हंगामाची तयारी कशी होणारं? आजूबाजूच्या परिसरातून उपलब्ध साधनांपासून बनलेल्या घरासाठी व शेतीसाठी उपयोगी साधन सामुग्री जमविणे हे चालू असते. हीच येथल्या कृषीसंस्कृतीची एक ओळख. कुणी सावलीत बसून दोर्या वळतात. तर कुणी आपली शेती उपयोगी अवजारे दुरूस्त करत असतात. तर काही एके ठिकाणी बसून हळद, लसण, कांदा या सारख्या पिकांना स्वच्छ करून निवडून ठेवतात.
गौर, ता.पुर्णा, जि.परभणी येथील शेतमजूर असलेले बालाजी मरीबा आंबोरे, सकाळीचं तोडून आणलेल्या शिंदीच्या झाडाच्या फांद्या, दुपारच्या उन्हात सावलीत बसून त्याचा ‘फडा’ (झाडू) तयार करण्याच्या कामाला लागले होते. शिंदीच्या झाडापासून ताडी मिळते, हे मला माहित होते. फडा हा झाडूचा प्रकार शिंदीच्या पानांपासून तयार होतो याची कल्पना होती, पण प्रत्येक्ष तो कसा तयार होतो, हे कधी पाहिले नव्हते.
आंबोरे यांनी सर्वप्रथम ज्या शिंदीच्या झाडाच्या फांद्या तोडून आणल्या होत्या, त्याच्या वरच्या टोकाला भरपूर पाने ठेवून त्याच्या लांब काडया धारधार विळ्याने वेगळ्या केल्या, नंतर सर्व काड्या एका ओळीत एकत्र लावून घेतल्या. भरपूर पाने असलेल्या भागाला त्यांचं फांद्यातून काढलेल्या तंतूच्या मदतीने बांधून घेतले. नंतर जो भाग त्या फड्याची मुठ होणार आहे. तो भाग पंधरा-विस मिनिटे पाण्यात बुडून ठेवला. त्यानंतर ज्या लांब काड्या होत्या त्यांना मध्यभागी फोल्ड केले. या काड्या(पन्हाळ्या) एकमेकात गुंतवून, हा फडा हातात पकडण्यासाठी त्याची सुरेख मुठ तयार केली. मुठीला सुताच्या दोरीने गच्च आवळून पक्के बांधले. टोकाला असलेल्या शिंंदीच्या टोकदार पानांचा (पन्हाळ्यांचा) जो गुच्छा झाला होता. त्याला मोर पिसार्यासारखे दगडांच्या साह्याने परून टाकले. त्याला तीन जागी सुती दोरीच्या गाठी बांधल्या. आता त्या अनकूचीदार अशा शिंदीच्या पानांनी (पन्हाळ्यांनी) फडयाचा आकार घेतला होता. त्यानंतर त्या फड्याला त्यांनी एका मोठ्या दगडाखाली रात्रभर दाबून ठेवले.
हा जो फडा (झाडू) आहे. तो शेतकर्यांसाठी खूप उपयोगी व महत्वाचा आहे. गाई-बैलाचा गोठा झाडण्यासाठी याचा फार उपयोग होतो. त्यानंतर शेतातील झोपडीतील ओबडधोबड जमीन झाडण्यासाठी या फडयाचा उपयोग होतो. विशेष म्हणजे हा फडा किमान पुढील सहा-सात माहिने खराब होणार नाही. तसेच या फडयाने शेणापासून,बारीक खडे, काडया ते धूळीपर्यंत सर्व काही अतिशय सहज झाडता येते. “तुमच्या त्या शहरातील झाडूने हे शक्य नाही. त्याचा येथे एक दिवसही टिकाव लागणार नाही. बाजारात देखील असे फडे मिळतात. परंतू त्याची किंमत साधारणपणे 50 ते 60 रूपये असते. त्यांची बांधणी मजबूत नसते. त्यामुळे मला ते पटत नाहीत.
म्हणून आता उन्हाच्या पारी मी हे काम करून घेतोय. म्हणजे हा उन्हाळा आणि पुढचा संपूर्ण पावसाळा मला गोठा व आमच्या शेतातील खोपीच्या परिसाराच्या स्वच्छतेची काळजी राहाणार नाही.” असे आंबोरे आवर्जून सांगत होते.आज-कालच्या ग्रामीण भागतील तरूण पोरांना असे फडे तयार करता येत नाहीत. ते एक तर रेडिमेट फडे आणतात किंवा तुराटयाचे झाडू करून वापरतात. पण त्या दोन्हीची सर या फडयाला येणार नाही. असे अभिमानाने आंबोरे सांगत होते.
खरंचं आंबोरे यांचा तो फडा (झाडू) अतिशय सुरेख झाला होता. तो मजबूत तर होताचं, तसेच त्याने शेताची जमीनही स्वच्छ झाडली जात होती. विशेष म्हणजे त्यात कुठलेही साहित्य पर्यावरणात प्रदुषण निर्माण करणारे नव्हते. शंभर टक्के ईकोन्फ्रडली, झाडू तयार झाला होता. त्यासाठी कुठलेही पैसे खर्च करावे लागले नव्हते. फक्त थोडे श्रम आणि कौशल्य वापरले. शेती करणार्या आपल्या पुर्वजांनी अशी किती तरी कौशल्य निर्माण करून ठेवली आहेत. नव्या पिढीने ती शिकली पाहिजेत. नाही तर काळाच्या ओघात ती नामशेष होतील.
छाया १. फडा बांधणी करन्यासाठी शिंदीच्या झाडाच्या दोर्या करता.
छाया २. त्या दोऱ्या एकत्र करून बांधताना
छाया ३.पाण्यात भजवन्यासाठी ठेवलेला फडा
छाया ४. तयार झाल्यावर
लेखक - उन्मेष गौरकर ,नांदेड
अंतिम सुधारित : 10/7/2020