मुखवट्यांचा हरवतोय चेहरा
माणूस आणि मुखवटा यांचा एकमेकांशी वेगळा ऋणानुबंध आहे. माणूस मुखवट्यांशिवाय जगू शकत नाही, अन् मुखवटे माणसाशिवाय. मात्र परंपरेच्या अर्थाने याकडे पाहिले तर आदिवासी संस्कृतीचा मुखवटा हा त्यांच्या जगण्याचा भागच आहे. बोहाड्यानिमित्ताने दर्शन देणारे मुखवटे आता आपला चेहरा हरवू लागले आहेत. एका पिढीची परंपरा पुढच्या पिढीकडे जात नसल्याने, हा वारसा लुप्त होईल अशीच अवस्था नाशिक जिल्ह्यातील लोहोणेर (ता. देवळा) येथील मुखवटे (सोंगे) बनविणाऱ्या कारागिरांची झाल्याने मुखवट्यांचे अस्तित्व धोक्यात येणार का, असा प्रश्न मनाला सतावतो.
जुन्या सीबीएसवरून सटाणा (नाशिक) देवळा तालुक्यातील लोहोणेर या गावावरून जाते. लोहणेर हे एक ऐतिहासिक गाव आहे. पण त्या खाणाखुणा आता पुसट झाल्या आहेत. नंतरच्या काळात लोहणेरला ओळख मिळाली ती मुखवटे बनविणाऱ्या कलाकारांचे गाव म्हणून. कलाकारांचे गाव म्हणजे येथे सर्वच कलाकार नाहीत. मुखवटे बनविणाऱ्या काही कुटुंबांनी आपले आयुष्य मुखवट्यांना वाहिलं अन् आपल्या कलेतून गावाला नवीन ओळख करून दिली. त्यामुळे गावात कोणीही तुम्हाला या कलाकारांच्या घरापर्यंत घेऊन जातो. लोहणेर गावात उतरले की समोर गिरणा नदीवर निवांत पहुडलेला पूल पहायला मिळतो. पण नदीला पाणी नाही. उजव्या हाताने तिसऱ्या गल्लीतून आत गेल्यावर लहान मोठे वाडे लक्ष वेधून घेतात. यातील एक वाडा मूर्ती कलाकार कानिफनाथ वानखेडे यांचा आहे.
मुखवट्यांसाठी प्रसिद्ध असलेले कानिफनाथ वानखेडे आता नाहीत. मात्र येथे त्यांचे कुटुंब रहाते. व्यवसायाने सोनार असले तरी त्यांची ओळख मूर्ती व मुखवटे कलाकार म्हणूनच होती. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी ही कला अंगीकारली नाही. त्यांचे कुटुंब सराफी व्यवसायात रमले. तेथून झोपडपट्टीवजा वसाहतीत मुखवटा कलाकार काळू शेवाळे दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात राहतात. त्यांचे वय ७२ आहे. पण डोळ्यात चमक आहे. त्यांची कथा आणि व्यथा ऐकल्यावर ही चमक अश्रूंनी भरलेलीच अधिक वाटली. पण या उमद्या माणसाने हिरिरीने मुखवट्यांमध्ये प्राण फुंकले अन् नाव मिळवलं. पहिल्या खोलीत एक कॉट व थोडा भाड्यांचा संसार. आतील खोली मुखवट्यांनी आणि मुखवटे बनविण्याच्या साहित्याने भरलेली होती. ‘आता मुखवटे बनविण्याची शारीरिक ताकद नाही पण आहे त्याच मुखवट्यांच्या आधारे जगतो आहे’ या त्यांच्या व्यथेने सर्वकाही सांगितले. त्यांच्याही पुढच्या पिढीने हा वारसा पुढे न नेल्याने ‘आता पुढे काय?’ या प्रश्नाला त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रूच उत्तर होते. जाता जाता त्यांनी मुखवट्यांच्या जतनांसाठी प्रयत्न होण्याची इच्छा मात्र व्यक्त केली.
तेथूनच मागच्या दोन गल्ल्या ओलांडून गेल्यावर प्रसिद्ध मुखवटा कलाकार प्रल्हाद निकुंभ (वय ६२) राहतात. त्यांचे वडील धोंडू सुतार यांच्याकडून त्यांनी हा वारसा पुढे नेला आणि प्रसिद्धीसही आणला. कलेच्या आवडीमुळे त्यांनी जे.जे.तून कलेची पदवी घेतली अन् मुखवट्यांना आयुष्य वाहिलं. मुखवट्यांवरच उदरनिर्वाह चालणार नसल्याने त्यांनी शासकीय सेवा बजावत ही कला जोपासण्याचा प्रयत्न केला. आता निवृत्तीच्या काळात मुखवट्यांना साज देणे हे कार्य ते मनोभावे करताना दिसतात. निकुंभ उच्चशिक्षित असल्याने मुखवटा म्हणजे काय, त्याचा इतिहास त्यांनी उलगडून सांगितला.
जगभरात मुखवट्यांची मोठी परंपरा आहे तशी ती भारतातही आहे. महाराष्ट्रातील मुखवट्यांची परंपरा केरळमधून कोकणमार्गे अडीचशे तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र फलश्रृत झाली. ही परंपरा आदिवासींमध्ये रुजल्याने बोहाडाच्या निमित्ताने एक अनोखा खेळ पहायला मिळतो. आदिवासी समाजातली ही मूळची नृत्यनाट्य कला आहे मात्र बोहाड न केल्यास देव कोपेल हा गैरसमजही त्यांच्या मनावर बिंबल्याने दारिद्र्य, कुपोषण, बालमृत्यू, अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी परंपरा अशा असंख्य गोष्टीतही वर्षानुवर्षे न चुकता बोहाडा केला जातो. आदिवासी बांधवांना त्यांच्या वेदना विसरून काही आनंदाचे क्षण बोहाड्याच्या निमित्ताने मिळतात. त्यात रंग भरण्याचे काम मुखवटे कलाकार करतात. होळी व धार्मिक सणांनिमित्त बोहाडे नाचविले जातात. हा सण दोन ते सात दिवस चालतो. इतरही कार्यक्रमांमध्ये मुखवटे नाचविले जातात पण, बोहाड्यात जेवढा मुखवट्यांचा खेळ रंगतो तेवढा क्वचितच अन्य प्रसंगी पाहायला मिळतो.
पूर्वी २०-२० किलोचे लाकडी मुखवटे असायचे आता कागदी मुखवटे बनविले जातात. तरीही त्यांचे वजन ५ ते ८ किलो असतं. निकुंभ मुखवट्यांबद्दल आणि त्यांच्या निर्मितीबद्दल भरभरून बोलत होते. त्यांच घर मुखवट्यांनी भरलं होतं. पूर्वी रानटी प्राण्यांची सोंगे नाचवली जायची. पण आदिवासी माणूस जसजसा शहरी माणसांच्या जवळ आला तसतसा हिंदू देवदेवतांचे मुखवटे बोहाड्यात दाखल झाले. गणपती, राम, रावण, महिषासुर, सरस्वती, शंखासुर, त्रिपुरासुर, शंकर, मारुती, खंडोबा आदी चाळीसहून अधिक देवतांचे मुखवटे बनविले जातात. तर काही भागात देवतांसाठी उंदीर, मोर, नंदी, घोडा इत्यादी वाहने तयार केली जातात. कागदाच्या लगद्यापासून एक मुखवटा बनवायला निकुंभ यांना १५ दिवस लागतात. हे मुखवटे घालून बोहाड्यात ४-४ तास हे मुखवटे नाचविणाऱ्या आदिवासींची ऊर्जा वाखाणण्यासारखी असते. ही ऊर्जा पाहिली की, मुखवटा बनविण्यात आपण यशस्वी झालो असा भाव मनी येतो असेही ते आवर्जून सांगतात.
बोहाड्यासाठी मागणीही असते मात्र प्लस्टिकच्या मुखवट्यांनी अतिक्रमण केल्याने मुखवटे बनविण्याच्या परंपरेचे काय होणार अशीही भीती आहे. निकुंभ यांचे मुखवटे परदेशातही विकले गेले आहेत. मुखवटे बनविण्याची कला शिकण्याची इच्छा घेऊन कोणी येतही नसल्याने लोहोणेरमध्ये शेवटी पिढी या मुखवट्यांना बनविण्यात मग्न आहे. ही कला पुढच्या पिढीकडे न गेल्याने हे चेहरे लुप्त होतील की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोहाड्यातील मुखवट्यामागील माणूस सज्जन विरुद्ध दुर्जनांच्या संघर्षात सत्याचा विजय रंगवतो; मात्र मुखवट्यांची पकड निसटत असल्याचं मुखवट्यामागील दु:खही या कलाकारांना दाखविता येत नाही. लोहोणेरच्या या वारशाला कॉर्पोरेट लूक नव्हे; तर हा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या हातांची गरज आहे.
लेखक : रमेश पडवळ
rameshpadwal@gmail.com
contact no : 8380098107
अंतिम सुधारित : 8/22/2020