অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पर्याय…

अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पर्याय…

पूर्वीच्या काळात डॉक्टर, अभियंता, वकील या मोजक्या काही क्षेत्रात करीअर केले की, समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत असे. उच्च शिक्षण घेणारे फार तुरळक विद्यार्थी असत. आता मात्र, बदलती जीवनशैली, जागतिकीकरण आणि उच्च शिक्षण तंत्रज्ञानामुळे आज विविध क्षेत्रात अभियंता म्हणून करीअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. सर्वात जास्त उत्पन्न मिळविण्याचे क्षेत्र म्हणून अभियांत्रिकी क्षेत्राची ओळख आहे. १० वी किंवा १२ वी नंतर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील अभियांत्रिकी शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करावयाचे असल्यास अभियंता म्हणून विविध विषयात कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ मॅकेनिकल, ईलेक्ट्रीकल, ईलेक्ट्रॉनिक, केमीकल, बायोमेडीकल इत्यादी विविध क्षेत्रात रचनात्मक काम करणे, मोठ्या आराखड्याची योजना करणे, उत्पादन किंवा यंत्रणांची तपासणी आणि देखभाल तसेच अवजारे, मशीन्स वापरणे त्यांची रचना, आराखडा, देखभाल इत्यादी कामांची जबाबदारी पार पाडावयाची असते.

अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास (JEET) सामाईक अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. 10 वी किंवा 12 वी नंतर तुम्ही अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकता. मास्टर इन टेक्नॉलाजी (एम.टेक.) हा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम दोन वर्षाचा असून, बी.ई. किंवा बी.टेक.किंवा एम.एस.स्सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजीनिअरींग हा तीन वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10 वी नंतर तुम्ही यास प्रवेश घेऊ शकता. डिप्लोमा इन इंजीनिअरींगसाठी 10 वी नंतर किंवा 10 + 2 (PCM) असल्यास द्वितीय वर्षास प्रवेश मिळू शकतो. हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. सिव्हील इंजीनिअरींगच्या पदवीस प्रवेश घ्यावयाचा असल्यास 12 वी (PCM) असणे आवश्यक आहे. हा 4 वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. बी.ई. इलेक्टॉनिक ॲण्ड टेली कम्युनिकेशन हा शिक्षणक्रम चार वर्षाचा असून, 12 वी (PCM) 50 % सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बी.टेक. इन मेकॅनिकल इंजीनिअरींग हा चार वर्षाचा शिक्षणक्रम 12 वी (PCM) 45% सहउत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बी.टेक. किंवा बी.ई. इन कम्पयुटर सायन्स ॲण्ड इंजीनिअरींग हा चार वर्षाचा शिक्षणक्रम असून, 12 वी (PCM) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बी.ई. ऑटोमोबाईल इंजीनिअरींग हा चार वर्षाचा शिक्षणक्रम असून, 12वी (PCM) 50% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पायपींग डीझाईन ॲण्ड ड्राफटींग हा एक वर्षाचा पार्ट टाईम शिक्षणक्रम असून आयटीआय पूर्ण असणे आवश्यक आहे.

बी.टेक.इन इलेक्ट्रीकल इंजीनिअरींग शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी इंडीयन इंन्स्टीट्युट ऑफ बॉम्बे, बी.टेक इन कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजीनिअरींगसाठी डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजीनिअरींग - इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली, बी.टेक. इन इलेक्टॉनिक्स ॲण्ड इलेक्ट्रीकल इंजीनिअरींगसाठी इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी, बी.टे इन मेकॅनीकल इंजीनिअरींगसाठी इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी वारानसी, बी.टेक.इन पेट्रोलिअम इंजीनिअरींगसाठी इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, धनबाद या शैक्षणिक संस्था उत्तम पर्याय आहेत.

विविध अभियांत्रिकी क्षेत्र

इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी

इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स घटकांशी संबंधीत क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते. इलेक्ट्रॉनिक वस्तुंची रचना करणे त्या बनविणे, तपासणी करणे, देखभाल करणे, बनविलेल्या वस्तुंची तपासणी करणे इत्यादी स्वरूपाचे काम करावे लागते.

इंडस्ट्रीयल अभियांत्रिकी

इंडस्ट्रीयल अभियंत्यांना उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रात करीअर करण्याची संधी प्राप्त होते. इंडस्ट्रीयल लेआऊटची योजना आखणे, यंत्र आणि साहित्य निवडणे, गुणवत्ता राखणे, वितरण आणि इन्व्हेटरीकंट्रोल हे अभियंते तयार करतात.

मायक्रो इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी

मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स अभियंते नवीन इलेक्ट्रॉनीक सर्किटची चाचणी, रचना, विकास, नवीन तंत्रज्ञानातील इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापर करून नावीन्यपूर्ण शोध लावणे.

टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी

टेलीकम्युनिकेशन यंत्रणेशी निगडीत क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते. उदाहरणार्थ केबल, रेडीओ, सॅटेलाईट, संवाद माध्यमे, टी.व्ही., रडार, नेव्हीगेशनल कम्युनिकेशन यंत्रे, सर्व प्रकारची माहिती आणि प्रसारासंदर्भातील क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते.

यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering)

यांत्रीक अभियंते यंत्र, घटक, यंत्रसामग्री, उत्पादन यंत्रणा आणि प्रक्रिया, थर्मल पॉवर स्टेशन, सौर ऊर्जा, वातानुकुलन आणि रेफ्रिजरेशन आणि औद्योगिक अभियांत्रिकी यांचे घटक त्यांचे डिझाईन करणे,ऑपरेट आणि देखभाल करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते.

इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी

इलेक्ट्रिकल अभियंते विद्युत निर्मिती, वितरण, वीज, नियंत्रण आणि इंस्ट्रुमेंटेशनचा वापर ज्या औद्योगिक क्षेत्रात होतो तेथे अभियंते कार्यरत असतात. याचबरोबर इमारतींमध्ये जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, लाइटिंग आणि वायरिंग यांसारख्या विजेची निर्मिती आणि वितरणासाठी ते उपकरणांसह कार्य करतात. ऑटोमोबाईल्स, एअरक्राफ्ट आणि सर्व प्रकारचे मोटारलाइज्ड वाहने आणि उपकरणे यासाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रिक मोटर्स, यंत्रणा तयार करतात. व्यावसायिक आणि सैन्य विमान, क्षेपणास्त्र आणि अंतरिक्ष कामाचे डिझाइन, विश्लेषण, निर्मिती, विकास, चाचणी करणे इत्यादी महत्वाच्या जबाबदाऱ्‍या इलेक्ट्रीकल इंजीनिअर्सला देण्यात येतात.

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी

ऑटोमोबाईल इंजिनिअर्स ऑटोमोबाइलची रचना, विकास, दुरूस्ती व उत्पादन यांच्याशी संबंधित कार्य करतात. ते ऑटोमोबाईल डिझाइनर म्हणूनही कार्य करू करतात. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंजीनिअर म्हणून काम करू शकतात.

न्युकिल्अर अभियांत्रिकी

न्युक्लिअर एनर्जी आणि रेडीएशन यावर संशोधन न्युक्लिअर इंजीनिअर्स करतात. ते मॉनीटर करणे, त्याची रचना आणि विकसीत करण्याची जबाबदारी पार पाडतात. वीज प्रकल्प कार्यान्वीत करणे आणि वीज उत्पन्न करणे हे न्युक्लिअर अभियंत्याचे कार्य असते. आण्विक इंधन सायकलवर काम करण्याची संधी मिळते. उत्पादन, हाताळणी आणि आण्विक इंधनाचा वापर, आण्विक उर्जेतून जे टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन होते त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे अशी महत्त्वपूर्ण कामे करण्याची संधी प्राप्त होते.

मरीन अभियांत्रिकी

मोठ्या नौका आणि जहाज स्थापित करणे, त्यासंदर्भात संशोधन, सर्वेक्षण आणि त्यांची देखभाल करणे. नौदलात मोठ्या प्रमाणात मरीन इंजीनिअर्सना मागणी आहे. सागर तटावरही इंजीनिअर्स म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होते. गोदी आणि कार्गो संदर्भातील यंत्रे आणि अवजारांची देखभाल करण्याचे कामही मरिन इंजीनिअर्स करतात.

मायनिंग अभियांत्रिकी

भुपृष्टामधील आणि वरील खाणीची रचना तयार करणे त्यांची देखभाल करणे या कामासाठी मायनिंग इंजिनिअर्सची मागणी मोठ्या प्रमाणात असते. भुपृष्ठाखालील सुरूंगाचे आणि माईन शाफ्टचे बांधकाम आणि नियंत्रण करणे या जबाबदाऱ्‍या पार पाडण्याची संधी प्राप्त होते.

बायोमेडिकल अभियांत्रिकी

इंजिनिअरिंग आणि लाइफ अॅनाँटिक्सच्या तत्त्वांचा वापर करतात ते मानवी आणि प्राण्यांच्या जीवनातील जैविक दृष्टिकोनातून संशोधन करतात. बायोमेडिकल इंजिनिअर्सने शोधलेल्या उत्पादनांनी औषधक्षेत्रात क्रांती आणली आहे. कृत्रिम अवयव, कृत्रिम अंग (कृत्रिम अवयव) आहेत, शल्यक्रियेमध्ये लेझर्सचा वापर अशा विविध क्षेत्रात मोठ्या संधी त्यांना उपलब्ध आहेत.

केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering)

रसायन निर्मितीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकीचे सिद्धांत एकत्र करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात आणि औषध निर्मिती कंपन्यांमध्ये केमिकल इंजीनिअर्सना करीअर करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. रासायनिक अभियंत्यांना भौतिक आणि रासायनिक बदलांपासून निर्माण होणारी उपकरणे, वनस्पती आणि कामांचे डिझाईन, पर्यवेक्षण, बांधकाम, स्थापना व ऑपरेशन यांच्याशी संबंधीत कामे करण्याचीही संधी प्राप्त होते.

संगणक अभियंते

संगणक अभियंत्यांना संगणकाशी निगडीत हार्डवेअर, डिझाईन, सॉफ्टवेअर तयार करणे, त्यांची देखभाल इत्यादी क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते. वाढत्या तंत्रज्ञानामुळे संगणकाशी संबंधीत विविध क्षेत्रात त्यांना करीअर करण्याची संधी प्राप्त होते.

पर्यावरणीय अभियंते

हवा, पाणी आणि जमीन यांची गुणवत्ता राखण्यासंदर्भातील कामे करण्याची संधी पर्यावरणीय अभियंत्यास प्राप्त होते. या क्षेत्रात समुद्राच्या तळापासून ते अवकाशातील वायुंच्या विविध थरांचा अभ्यास आणि त्यासाठी काम करण्याची संधी प्राप्त होते. अतिशय विस्तृत असे क्षेत्र असून, इथे करीअर करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

लेखिका - श्रद्धा मेश्राम नलावडे

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : 'महान्यूज'

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate