मानवाला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यात भूकंप, महापूर, त्सुनामी, वादळे, अतिवृष्टी अशा आपत्तींचा समावेश होतो. सध्या पावसाळा सुरु असल्याने आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २००५ साली प्रचंड अतिवृष्टी झाल्याने मुंबई शहरही महापुराला सामोरे गेल्याचे आपण पाहिलेले आहे. अशा स्थितीत मालमत्तेचे आणि जीविताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत लोक अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी शासन, सैन्यदल, स्वयंसेवी संस्था प्रयत्न करत असतात. इतरांचे संरक्षण आणि त्यांचे योग्य ते पुनर्वसन हा त्यामागचा मुळ हेतू असतो. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज नेहमीच भासत असते. नव्या बदलांना सामोरे जात डिझॅस्टर मॅनेजमेंट ही शाखाही अद्ययावत होत आहे. गेल्या काही वर्षात देशात आपत्तीजनक परिस्थितीत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. जागतिक स्तरावर देखील अशा आपत्ती उद्भवल्यास अनेक देश एकमेकांना मदतीसाठी पुढे येतात. भारत सरकारने देखील या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. या क्षेत्रात कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता यात करिअर करणे फायद्याचे ठरेल त्यादृष्टीने घेतलेला आढावा खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..
पात्रता
या क्षेत्रात प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच पदव्युत्तर पदवीसाठी पदवीधर असायला हवे. सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट येथील अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर मुलाखतीचा टप्पा पार करावा लागतो. एम.ए. इन डिझॅस्टर मॅनेजमेंट, एम.एस्स.सी इन डिझॅस्टर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना एम.ए. सोशल वर्क, सोशल सायन्स यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.
शैक्षणिक प्रयत्न
भारत सरकारने डिझॅस्टर मॅनेजमेंट हा विषय शाळा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. सन २००३ साली सीबीएसई अभ्यासक्रमात इयत्ता आठवीच्या पाठ्यक्रमात हा विषय अंतर्भूत केला. आता उच्च शिक्षणातही या विषयाला अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाते.
काय असतो अभ्यासक्रम ?
नैसर्गिक आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास ती कशी हाताळावी याचे यात मुख्यत: प्रशिक्षण दिले जाते. निवारा व्यवस्था उभारणे, शेल्टर मॅनेजमेंट, पाण्याची व्यवस्था, अन्न सुरक्षा, प्रथोमपचार, रेस्क्यू मॅनेजमेंट, लाईव्हली रेस्क्यू, जिओ इन्फोर्मेटिक्स, रिमोट सेन्सिंग, जीआयएस प्रणाली आदी बाबींचा अभ्यासक्रमात समावेश असतो. आता विविध शाळांना, कॉलेजना प्रशिक्षण दिले जाते. काही विषयात स्पेशलायजेशनही करता येते. उदा. मायनिंग, केमिकल डिझॅस्टर इत्यादी.
संधी
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासकिय नोकरी करता येते तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्थातही काम मिळते. लॉ इंफोर्समेंट, रिलीफ एजेन्सीज, स्वयंसेवी संस्था, युनायटेड नेशन सारख्या आंतरराष्ट्रीय एजेन्सीज, रेडक्रॉस, यूएनए प्रतिष्ठान, केमिकल, मायनिंग, पेट्रोलियम कंपन्या अशा ठिकाणी मुबलक संधी उपलब्ध आहेत.
प्रशिक्षण संस्था
• जमशेटजी टाटा सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस
लाला जमनादास गुप्ता मार्ग पो. बॉ. 8313, देवनार मुंबई. tiss.edu
• सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट यशवंतराव चव्हाण अॅकडेमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, पुणे www.yashada.org
• रजिस्टर्ड इंजिनिअर्स फॉर डिझॅस्टर रिलिफ निवेदिता अपार्ट, रामबाग कॉलनी पौड रौड, कोथरूड पुणे www.redrindia.org
• टाइम्स सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट मुंबई विद्यापीठ, मानसशास्त्र विभाग कलिना, सांताक्रुझ, मुंबई
• डिझॅस्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्युट मित्तल कोर्ट, नरिमन पॉइंट मुंबई
• अनिरूद्ध अॅकॅडेमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंट मंदिर रोड, अशोकनगर घोर्टन पाडा, दहिसर (पू) मुंबई
• नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज सिव्हिल लाईन, नागपूर.
• नॅशनल सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट आयआयपीए, इंद्रप्रस्थ इस्टेट, रिंग रोड, नवी दिल्ली
• डिझॅस्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्युट कचनार, पर्यावरण परिसर अरेरा कॉलनी, भोपाळ
• नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर अर्थक्वेक इंजिनिअरिंग आयआयटी, कानपूर www.nicee.org
• पीआरटील इन्स्टिट्युट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट एनवायरन्मेंटल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च पर्यावरण कॉम्प्लेक्स, साऊथ ऑफ साकेत मैदान गढी मार्ग, नवी दिल्ली
• इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली www.ignou.org
• ऑल इंडिया डिझॅस्टर मेटिगेशन इन्स्टिट्युट, गुजरात www.aidmi.org
लेखक: सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020