डोळे हे जुलमी गडे...! अशा प्रकारचे डोळ्यांच्या सौंदर्याचे वर्णन आपण गाण्यांमधून ऐकत असतो. डोळे हा मानवाच्या अवयवातील सर्वात नाजूक भाग आहे. अर्थात डोळ्याची काळजी घेण्याचे काम ऑप्टोमेट्रीस्ट करत असतो. यासाठी त्याला विशेष प्रशिक्षणही दिले जाते. डोळ्यांचे परीक्षण, रोग निदान आणि उपचारासंबंधी ऑप्टोमेट्रीस्ट सहाय्य करतो. देशात अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अन्य लाखो लोक डोळ्यांच्या समस्येने पिडीत आहेत. बऱ्याचदा डोळ्यांच्या आजारावर योग्य सल्ला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अचानक अंधत्व आलेले अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो. खरेतर त्यांना वेळेत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले असते तर कदाचित त्यांचे डोळे वाचूही शकले असते. ऑप्टोमेट्रीस्ट हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. मानव कल्याणाच्या कार्यात या क्षेत्राद्वारे योगदान देता येईल. या क्षेत्रातील कार्यरत लोकांना अनेक मानसन्मानही मिळतात. मित्रहो या क्षेत्रातील उपलब्ध संधींचा घेतलेला हा आढावा खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..
पात्रता
ऑप्टोमेट्रीस्ट बनण्यासाठी ऑप्टोमेट्री या विषयात पदवी अथवा पदविका कोर्स करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयातून ५० टक्के गुणासहित उत्तीर्ण असावे लागते. ज्यांनी क्लिनिकल ऑप्टोमेट्री या विषयात पदविका (डिप्लोमा) कोर्स केला असल्यास पदवीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. डिप्लोमा कोर्स दोन वर्षे आणि डिग्रीचा (बीएसस्सी इन ऑप्टोमेट्री) कालावधी चार वर्ष असतो. पदवी कालावधीत तीन वर्षे पाठ्यक्रम आणि एक वर्ष आंतरवासिता करावी लागते. आंतरवासिता दरम्यान विद्यार्थ्यास क्लिनिक अथवा हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या तज्ञांकडे काम करावे लागते. या अभ्यासक्रमास आयसीईटी परीक्षेनंतर प्रवेश दिला जातो.
कार्य
ऑप्टोमेट्रीस्ट किंवा ऑप्टोमेट्रीक फिजिशियन डोळ्यांची देखभाल किंवा तपासणी करणाऱ्या यंत्रसामुग्रीसंबंधी तज्ञ असतात. ऑप्टोमेट्रीस्ट हे डोळ्यांची तपासणी करून चष्मा किंवा लेन्सबाबत मार्गदर्शन करतात. ऑप्टोमेट्रीस्ट हे सर्जरी अथवा कोणतेही मोठी शस्त्रक्रिया करत नाहीत. ऑप्टीकल उपकरणांच्या सहाय्याने ते चिकित्सा करतात. उदा. दृष्टीदोष, रंगाआंधळेपणा, जवळचे, लांबचे दिसण्यासंबंधीचे दोष, अनुवांशिक डोळ्याच्या समस्या या बाबींवर ते काम करतात. डोळ्यांची तपासणी करून ते चष्मा किंवा लेन्सही बनवून देतात.
संधी
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर अनेक संधी ऑप्टोमेट्रीस्टकडे उपलब्ध असतात. डोळे तपासणीचे क्लिनिक तो काढू शकतो किंवा ऑप्टीकल लेन्स निर्मिती युनिटही सुरु करता येईल तसेच कॉन्टॅक्ट लेन्स किंवा ऑप्थेल्मिक लेन्स इंडस्ट्रीत विविध विभागात त्याला नोकरी मिळेल. अनेक हॉस्पिटलच्या नेत्र विभागातही संधी उपलब्ध असतात. कार्पोरेट क्षेत्रात डोळ्यासंबंधी उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यात या क्षेत्रातील कुशल लोकांची गरज भासते. डोळ्यांच्या डॉक्टरांकडे सहाय्यक म्हणूनही काम मिळेल. आता शासकिय नियमानुसार ऑप्टीकल दुकानात प्रशिक्षित व्यक्तीच काम करू शकतात त्यामुळे कामाच्या अपार संधी या क्षेत्रात आहेत असे म्हणायला हरकत नाही.
प्रशिक्षण संस्था
• भारती विद्यापीठ, पुणे
• डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ, नवी मुंबई
• डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
• आयटीएम इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ सायन्स, नागपूर
• आयटीएम इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ सायन्स न्यू पनवेल, नवी मुंबई
• महात्मा गांधी मिशन इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ सायन्स कामोठे, नवी मुंबई
• यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नागपूर
• ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली
लेखक: सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 2/14/2020