অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करिअरचे नवे पैलू

करिअरचे नवे पैलू

तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे करिअरचे अनेक नवनवे मार्ग आणि अभ्यासशाखा उदयास येत आहेत. मानवाच्या गरजा वाढतायत आणि त्यानुसार अनेक सेवा देणारे मार्गही खुले होत आहेत. नव्या संकल्पनेवर काम करणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने त्यांची मागणी जास्त आहे. बेरोजगारीची समस्या असली तरी त्याच्या मुख्य कारणांपैकी करिअरचे पर्याय माहित नसणे त्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता नसणे आणि व्यवहार ज्ञानाचा अभाव असणे ही आहेत. गरजेनुसार आणि मागणीनुसार अभ्यासक्रमाची निवड केल्यास आणि त्यातील मुलभूत कौशल्य आत्मसात केल्यास कामाच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. मुख्यत: होतकरू तरुणाईपर्यंत या संधींची माहिती पोहोचायला हवी आणि प्राथमिक शिक्षणापासून त्यानुसार तयारी केल्यास कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होईल. काही प्रमाणात पारंपारिक क्षेत्र म्हणजेच करिअर असा समज रूढ झाल्याने इतर क्षेत्रांकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. आपल्या आवडीनुसार आणि मागणीनुसार अभ्यासक्रमाची निवड केल्यास करिअर करणे सोपे जाईल. आज अशाच अनभिज्ञ आणि नव्या मार्गांचा शोध आपण या लेखाच्या माध्यमातून खास करिअरनामा या सदरासाठी घेणार आहोत.

व्हा ब्लॉगर..!

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जग एकमेकांशी जोडले गेले आहे. संपर्क साधण्याबरोबर व्यावसायिक कामांसाठीही आता या माध्यमांचा वापर होतो आहे. अनेक नव्या होतकरू लेखकांना ते हक्काचे व्यासपीठ आहे. आपल्या ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यास अनेक नामांकित कंपन्या आपली जाहिरात ब्लॉगवर प्रसिद्धीसाठी देतात यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. लिखाणाची आवड जोपासली जाते आणि त्यातून अर्थाजन झाल्याने दोन्ही प्रकारचा आनंद मिळतो. तसेच ब्लॉगर म्हणून सामाजिक प्रतिष्ठाही मिळते. उत्तम जनसंपर्क, लिखाणाची वेगळी शैली असल्यास व्यावसायिक ब्लॉगर हा एक मोठा फायद्याचा मार्ग ठरू शकतो. उद्योगातील अनेक नामचीन समूहांना अशा तरुणांची गरज भासते.

स्कूबा डाइविंग

आज जोखीम पत्करून करिअरचा मार्ग निवडणाऱ्या तरुणांची आपल्याकडे कमी नाही. ज्यांना धाडसी आव्हानात्मक कामे करायला आवडतात अशांना हा एक उत्तम मार्ग होऊ शकतो. देशाला पर्यटनाचा मोठा समृद्ध वारसा आहे आणि अफाट निसर्ग सौंदर्य असणारा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे. स्कूबा ड्राइवर्स, अंडर वॉटर ड्राइवर्स यांची मागणी वाढते आहे. समुद्रशास्त्राच्या अभ्यासाकरिता अशा प्रशिक्षित लोकांची गरज अलिकडे मोठ्या प्रमाणात भासते. या क्षेत्रातील प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत असून गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची.

गिफ्ट रॅपर

लोकांचे राहणीमान बदलते त्यानुसार त्यांच्या गरजांचा क्रमही बदलत असतो. आर्थिक स्तर उंचावल्याने समाजात नवे नीतीनियम रूढ झाल्याचे आपणास पहावयास मिळते. कोणताही सण, समारंभ, वाढदिवस असला की भेट देण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. भेट वस्तू देताना ती आकर्षकरीत्या पॅकिंग करणे गरजेचे असते. असे काम सुंदररीत्या करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे कौशल्याचे काम असल्याने त्यास खास प्राधान्य दिले जाते. अनेक मोठे व्यावसायिक हाऊसेज आणि ऑफिसमध्ये या क्षेत्रातील लोकांना उत्तम संधी उपलब्ध आहेत.

चॉकलेटीयर

चॉकलेट हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत चॉकलेट खाणारे अनेकजण आपणास दिसत असतात. चॉकलेट आर्टीस्टलाच चॉकलेटीयर म्हटले जाते. नामांकित चॉकलेट कंपन्यात अशा प्रशिक्षित लोकांची मागणी असते. या पदार्थातील निर्मितबरोबर त्याच्यातील वैविध्यपूर्ण बाबींचा त्यांचा अभ्यास असतो. नोकरीबरोबर स्वत:चे चॉकलेट पार्लर काढू शकता. आजकाल शहरातील नाक्यांवर मोक्याच्या ठिकाणी असे पार्लर दिसून येतात. वेगळेपण आणि सतत प्रयोगशील राहिल्यास या क्षेत्रात मोठे नाव कमावण्याची संधी उपलब्ध होते.

मित्रहो, कधीकधी अनेकांना उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही तेव्हा त्यांनी निराश न होता आपल्यातील कलागुण आणि आवड याचा शोध घेऊन त्याला व्यावसायिक रुप दिल्यास चांगल्या पद्धतीने करिअर करता येऊ शकते. सतत नवे काहीतरी करण्याची उर्मी आणि संशोधकवृत्ती असल्यास आणि कोणत्याही कामाला कमी न समजण्याचा स्वभाव असल्यास यश निश्चित गाठता येते. कोणतेही काम कमी नसते याची शिकवण आपल्याला असते त्यानुसार कौशल्य विकसित केल्यास नवे मार्ग, नवे प्रवाह निश्चितच यश देतील.

- सचिन के.पाटील,  संपर्क-९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate